नवी मुंबई : रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहने पार्किग केल्यामुळे रहदारीला अडथळा होत आहे. स्थानिक रहीवाशांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार मागणी करूनही वाहतुक पोलिसांकडून रस्ता नो पार्किग घोषित करण्यास विलंब होत आहे. नेरूळ सेक्टर 4 परिसरातील सनराईज सोसायटी व ग्रेट इस्टर्न गॅलेरिया येथील नो पाोर्किगबाबत नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी वाहतुक विभागाच्या पोलीस उपायुक्तांकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर 4 परिसरातील सनराईज सोसायटी व ग्रेट इस्टन गॅलरिया गेस्ट समोरील रस्ता तातडीने नो पार्किग करणेबाबत रवींद्र सावंत सातत्याने वाहतुक पोलीस व नवी मुंबई महापलिका प्रशासनाकडे लेखी स्वरूपात पाठपुरावा करत आहेत.
नेरूळ सेक्टर चार परिसरात आपण अंर्तगत भागात फिरल्यास आपणास कोठेही पदपथ पहावयास मिळणार नाहीत. अंर्तगत रस्ते छोटेखानी असतानाही आपणास येथील पदपथावर दोन्ही बाजूला वाहने पार्क केलेली दिसून येतील. वाहन पार्किगची समस्या इतकी भयावह झाली आहे की, पदपथावर वाहने व पादचारी रस्त्यावर हे चित्र या ठिकाणी बाराही महिने पहावयास मिळते. रस्त्यावरून येणारी चार चाकी वाहने, विशेषत: अंर्तगत भागातही वेगाने धावणारी दुचाकी वाहने यांचा ससेमिरा चुकविताना पादचार्यांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा अपघाताच्या घटनाही घडल्या असल्याचे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
नेरूळ सेक्टर 4 मध्ये सनराईज को-ऑप. हौसिंग सोसायटीच्यासमोर ग्रेट इस्टर्न गॅलरियामध्ये कामानिमित्त येणारी माणसे आपली वाहने पार्क करत असतात. त्यामुळे सोसायटीतील लोकांना आपली वाहने बाहेर काढताना अथवा सोसायटीत नेताना अडथळ्याची शर्यत पार पाडावी लागते. समस्या दिवसेंगणिक भयावह होत चालली असून या समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण या ठिकाणी दोन्ही बाजूला नो पार्किगचे फलक लावावेत व हा परिसर नो पार्किग परिसर घोषित करावा. आपण स्वत: या ठिकाणी भेट दिल्यास आपणास समस्येचे गांभीर्य व आमच्या म्हणण्यातील सत्यता निदर्शनास येईल, असे रवींद्र सावंत यांनी म्हटले आहे. गेल्या 5 वर्षापासून सावंत याप्रकरणी पाठपुरावा करत आहे.
वाहतुक विभागाचे तत्कालीन पोलीस उप आयुक्त विश्वास पांढरे यांनी 16 डिसेंबर 2014 रोजी एक परिपत्रक काढून याबाबत हरकती मागविल्या होत्या. स्थानिक नागरिकांनी हरकती नोंदवित आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत हा रस्ता नो पार्किग करण्याची मागणीही केली होती. या घटनेला दोन वर्षाचा कालावधी झाला तरी प्रशासनाकडून काहीही कारवाई झालेली नाही. या ठिकाणी अंर्तगत भागात स्कूल व्हॅन व रूग्णवाहिकाही जावू शकत नाही. याप्रकरणी तात्काळ निर्णय घेवून या रस्त्यावर नो पार्किगचे फलक तात्काळ लावण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.
नेरूळ सेक्टर 4 परिसरातील सनराईज सोसायटी व ग्रेट इस्टर्न गॅलेरिया येथील नो पाोर्किगबाबत नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी वाहतुक विभागाच्या पोलीस उपायुक्तांसह नवी मुंबई महापालिका आयुक्त, नवी मुंबई पोलीस आयुक्तांनाही स्वतंत्र निवेदन सादर केले आहे.