नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे रूजू झाले, तेव्हा सर्वसामान्य नवी मुंबईकरांकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. कारण त्यांच्या नावाचा बोलबाला होता. त्यामुळे तुकाराम मुंढे नवी मुंबईसाठी खूप काही भरीव योगदान देतील, अशी भोळीभाबडी अपेक्षा नवी मुंबईकरांनी बाळगली होती. पण प्रत्यक्षात मुंढे नावाची मार्केटींग झाली, पण नवी मुंबईकरांच्या पदरी काही पडले नाही. मुंढे यांना प्रसिध्दी मिळाली. समस्या मात्र ‘जैसे थे’च राहील्या. राजकारण्यांना अंगावर घेण्याची धमक दाखविणार्या मुंढेंनी ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरे पाडण्याशिवाय विशेष कामगिरी केली नाही. आजही अतिक्रमणे शहरात कायम आहेत. चायनीजच्या दुकानांना सील लावले तरी त्याच टपर्यांवर चायनीजची खुलेआम ग्राहकांना विक्री होत आहे. एकेकाळी चर्चेचा विषय बनलेले ‘वॉक विथ कमिशनर’चा प्रयोगही आता अयशस्वी ठरू लागला आहे. थोडक्यात एकेकाळी चर्चेत असलेल्या तुकाराम मुंढे नावाचा करिश्मा आता नवी मुंबईत ओसरला असल्याचे उघडपणे पहावयास मिळत आहे.
राजकारण्यांना अंगावर घेतले अथवा राजकारण्यांच्या विरोधात दंड थोपटले की सर्वसामान्यांची सहानूभूती मिळविता येते हे तंत्र ओळखलेल्या तुकाराम मुंढेंनी नवी मुंबईतही प्रशासनाचा गाढा हाकताना हाच प्रयोग केला. महापौरांना भेटायला जाणार नाही अशी पहिल्याच दिवशी मुंढेंनी ताठर भूमिका घेतल्यामुळे स्वाभिमानी आयुक्त प्रस्थापित राजकारण्यांना, पक्षीय पदाधिकार्यांना, पालिकेतील नगरसेवकांनी ‘भीक’ घालणार नसल्याचा भोळाभाबडा आशावाद नवी मुंबईकरांकडून व्यक्त करण्यात आला. पण या भोळ्याभाबड्या आशावादाचा अल्पावधीतच भ्रमनिरास झाला. तुकाराम मुंढेंचा तो ‘स्वाभिमान’ नव्हता, तर त्यांच्या स्वभाव गुणांचा तो एक भाग होता, हे अनुभवाअंती तुकाराम मुंढेंच्या बाबतीत नवी मुंबईकरांना समजून उमजूनही चुकले. तुकाराम मुंढेंच्या विक्षिप्त स्वभावामुळे व ताठर भूमिकेमुळे आज नवी मुंबईचा विकास ठप्प झाला आहे. सभागृहात विकास कामांच्या प्रस्तावाचे तीन तेरा वाजले आहे. आयुक्त व लोकप्रतिनिधी हे पालिका कारभाराच्या रथाची दोन चाके असतात. एकाच चाकाच्या आधारावर पालिका रथाचा कारभार हाकणे शक्य नसल्याचे तुकाराम मुंढेंना समजले नाही. आयुक्तपदाच्या तोर्यात वावरणार्या मुंढेंनी सुरूवातीपासून ‘हम करे सो’ कायदा ही कार्यप्रणाली अंगिकारण्यास स्वीकारण्यास सुरूवात केली. भेटीसाठी आलेल्या नगरसेवकांना तसेच आमदारांनाही भेटीसाठ ताटकळत ठेवणे, महापालिका अधिकारी व कर्मचार्यांशी बोलताना अरेरावी दाखविणे असा खाक्याच मुंढेंनी दाखविण्यास सुरूवात केली.
आज मुंढे यांच्यावर केवळ राजकारणीच नाही तर पालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी, तसेच नवी मुंबईकरही कमालीचे नाराज झाले आहेत. नवी मुंबईकरांचे स्वमालकीचे मोरबे धरण असतानाही प्रती माणसी केवळ १३५ लीटरच पाणी देण्याचा निर्णय मुंढेंनी घेतला आणि या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणीही केली. परंतु अंमलबजावणी करताना कोणाच्या घरात किती माणसे राहतात याची चौकशी करण्याची तसदीही मुंढेंनी घेतली नाही. सिडकोच्या ए टाईपच्या सोसायटीत कमी पाणीपुरवठा आणि टोलेजंग टॉवरमध्ये मुबलक पाणी पुरवठा हे गणित पाणी वापराच्या बाबतीत अंगिकारण्यात आले. वास्तविकपणे ए टाईपच्या घरांमध्ये गोरगरीबांचे व मध्यमवर्गियांचे वास्तव्य असल्याने एका एका घरात पाच ते आठजण असतात. टॉवरमध्ये घराचा एरिया मुबलक असला तरी माणसे कमी असतात, हे साधे समाजव्यवस्थेचे गणित आयएएस झालेल्या मुंढेंना सोडविता आले नाही. त्यामुळे गोरगरीबांना पाण्याचा दुष्काळ आणि श्रीमंतांकरिता पाण्याचा ओला महापुर हे चित्र या नवी मुंबईत निर्माण झाले. पालिकेच्या महासभेत ए टाईपच्या घराबाबत नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी याप्रकरणी गोरगरीबांच्या, मध्यमवर्गीयांच्या बाजूने आवाज उठवित पालिका प्रशासनाला त्यांच्याकडून होत असलेली चूक निदर्शनास आणून दिली.
अतिक्रमणमुक्त नवी मुंबई हे अभियान राबविताना केवळ प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवरच ‘हातोडा’ चालविण्याचा एककलमी उद्योग तुकाराम मुंढेंनी राबविला. आजही नवी मुंबई शहरामध्ये मार्जिनल स्पेसची समस्या कायम आहे. दुकानदारांनी मार्जिनल स्पेसच्या नावाखाली दुकानापुढील जागा गिळकृंत केली आहे. ते तुकाराम मुंढेंच्या अतिक्रमण विभागाला चालते. नेरूळ सेक्टर आठमध्ये समाधान हॉटेलनजीक असलेल्या अंबिका शॉपिंग कॉम्पलेक्समध्ये चायनीजच्या टपर्यांचे वर्षानुवर्षे अतिक्रमण कायम आहे. अतिक्रमण विभाग या चायनीजच्या टपर्यांकडे कानाडोळा करत या अतिक्रमणाला ‘पालिकाश्रय’ देत आहे. आता तर या चायनीजच्या टपर्यांवाल्यांनी धाडस दाखवित नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि अतिक्रमण विभागाला आपण जुमानत नसल्याचे नेरूळवासियांना दाखवून दिले आहे. चायनीजच्या टपर्यांना पालिकेने ‘सील’ लावलेले असताना सांयकाळनंतर खुलेआमपणे जणू काही झालेच नाही अशा थाटात चायनीजचा व्यवसाय जोरात सुरु आहे. पालिका अधिकारी व कर्मचार्यांनी यापूर्वी अनेक वर्षे नियमितपणे या चायनीजच्या टपर्यांकडून ‘मिठाई’ घेतलेली असल्याने त्याच ‘मिठाई’ला जागत आजही चायनीजच्या टपर्यांवर कारवाई करण्याची पालिकेच्या अतिक्रमण विभागामध्ये धमक राहीलेली नाही. तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘एल’ मार्केट परिसरात सिडकोने दिलेल्या टपर्यांनी मुळ जागेपेक्षा दुप्पटपेक्षा अधिक जागेवर खुलेआमपणे आपल्या व्यवसायासाठी अतिक्रमण केले आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाला हे अतिक्रमण आजतागायत दिसलेले नाही. विशेष म्हणजे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा गाडा हाकणारा पालिकेचा अधिकारी कोणत्या ‘कैलास’ पर्वतावर राहत असून जवळच राहतो. नेरूळ सेक्टर सहा परिसरातही तेच चित्र आहे. पामबीच मार्गालगत असलेल्या झामा व नुक्कड नेशन, बार बी क्यू नेशन, स्नॅक अटॅक या खाऊ गल्लीचेही अतिक्रमण वाढले आहे. खवय्यांची वाहने रस्त्यावर उभी राहू लागल्याने वाहतुक कोंडी होवू लागली आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे या श्रीमंतांच्या दुकानावर विशेष प्रेम असल्याने कारवाई होत नाही. त्या बाजूलाच असलेल्या टायरवाल्याने सरळसरळ मार्जिनल स्पेसवर व्यवसाय थाटला आहे. हेच चित्र नवी मुंबईत सर्वत्र आहे. दुकानांच्या अतिक्रमणावर, फेरीवाल्यांवर कारवाई न करता अतिक्रमणचा वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असलेला एक अधिकारी शिवसेनेच्या नेरूळ गावातील नगरसेवकाचे पद रद्द होणार असल्याचे प्रसिध्दीमाध्यमांना सांगण्यात व्यस्त आहे. नेरूळ रेल्वे स्थानकाजवळ रात्री ८ -९ ला गेले तरी या रेल्वे स्थानक परिसराला फेरीवाल्यांचा विळखा आपणास पहावयास मिळेल. पालिका अतिक्रमणची जबाबदारी असणारा डॉक्टर अधिकारी नेरूळमधील घराजवळची अतिक्रमणे उघड्या डोळ्यांनी पाहण्यात समाधान मानत आहे.
आज प्रकल्पग्रस्त व ग्रामस्थांच्या घरावर कारवाई करून त्यांना देशोधडीला एकीकडे लावले जात असतानाच दुसरीकडे दुकानदार व फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा केला जात आहे. ‘वॉक विथ कमिशनर’मध्ये समस्या सुटत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे लोक आता या अभियानाकडे पाठ फिरवू लागले आहे. पाणीचोरीवर तोडगा काढताना अनधिकृत नळजोडण्या तोडण्यात आल्याचे सांगण्यात आले, परंतु याच अनधिकृत नळजोडण्या कारवाई झाल्यावर अवघ्या तासाभरात पुन्हा जोडण्यात आल्या, हे पाहण्याची तसदी तुकाराम मुंढेंनी घेतली नाही.
लोकप्रतिनिधींशी वाद ओढविण्यात तुकाराम मुंढे अग्रेसर असल्यामुळे नवी मुंबईच्या विकासकामांचे तीन तेरा वाजले आहेत. नवी मुंबईत बकालपणा वाढीस लागला आहे. तुकाराम मुंढेंना नवी मुंबईचा विकास नाही तर केवळ प्रसिध्दी हवी आहे, असा नाराजीचा सूर सर्वसामान्य नवी मुंबईकरांकडून आळविला जावू लागला आहे.
दै. जनशक्तिमध्ये प्रकाशित झालेला वृत्तसंपादक संदीप खांडगेपाटील यांचा लेख नवी मुंबई लाईव्ह.कॉमच्या वाचकांसाठी जसाच्या तसा प्रकाशित करत आहोत. संदीप खांडगेपाटील हे १९९२ पासून पत्रकारितेमध्ये कार्यरत असून कॉलेज वार्ताहर ते संपादक अशा विविध पदांवर त्यांनी २५ वर्षामध्ये काम केले आहे. राजकीय क्षेत्रासह कामगार, शिक्षण या विषयांवर त्यांचे लिखाण विशेष प्रभावी आहे.
गणेश इंगवले – कार्यकारी संपादक
नवी मुंबई लाईव्ह.कॉम
८०८२०९७७७५