नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना नवी मुंबईतील स्थानिक आगरी-कोळी प्रकल्पग्रस्त समाजाचा विरोध आहे. महापालिका सभागृहातील सर्वपक्षीय नगरसेवकांचाही मुंढे यांना कडवट विरोध आहे. भाजपा नगरसेवकांचाही मुंढे यांना विरोध असला तरी देवेंद्राचे तुकारामावर असलेले जगजाहिर प्रेम पाहून येथील भाजपाच्या नगरसेवकांना अविश्वास ठरावाच्या वेळी आपल्या मनाविरोधी भूमिका घ्यावी लागली होती. आता तर इमारतीच्या छतावरील बसविलेले पत्रेच काढण्याचा निर्णय तुकाराम मुंढेंनी घेतला आहे. मुंढेंच्या या निर्णयामुळे आता सिडकोच्या तसेच साडे बारा टक्के भुखंडावरील इमारतींमधील सर्वसामान्य मध्यमवर्गीय मुंढेंच्या विरोधात उभा ठाकण्याची दाट शक्यता आहे. ज्यावेळी गोरगरीब रस्त्यावर उतरतो, त्यावेळी त्याची फार मोठी किमंत प्रस्थापितांना मोजावी लागतो.
तुकाराम मुंढेंना मंत्रालयीन पातळीवरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाच पाठिंबा असल्यामुळे नवी मुंबईतील राजकारणी, प्रकल्पग्रस्त समाज हतबल झाला आहे. त्यांनी गरजेपोटी बांधलेल्या बांधकांमांना अनधिकृत ठरवून महापालिका व सिडको हातोडा चालवून ती बांधकामे उध्दवस्त करत आहे. मात्र याच प्रकल्पग्रस्तांच्या इमारतीशेजारी असणार्या सरकारी भुखंडावर असणार्या झोपड्या मात्र अधिकृत झाल्या आहे. एकेकाळी या जमिनीचा मालक असणारा येथील प्रकल्पग्रस्त बेघर होवू लागला आहे आणि बाहेरच्या राज्यातून आलेले परप्रातिंय अनधिकृत झोपड्या बांधून नवी मुंबईत राहू लागले व आता तर त्यांच्या झोपड्याही नियमित झाल्या आहेत.
सध्या नवी मुंबईतील अधिकांश घराघरामध्ये मुंढेविरोधात गरळ ओकली जावू लागली आहे. त्याला कारणही तसेच घडले आहे. नवी मुंबई शहरामध्ये फेरफटका मारला असता अधिकांश इमारतींच्या छतावर पत्रे बसविलेले पहावयास मिळतात. अर्थात हे पत्रे कोणी इमारतीची शोभा वाढविण्यासाठी बसविलेले नाहीत. उलट ते पत्रे बसविल्याने इमारतीच्या सौंदर्याला काही अंशी गालबोटच लागत आहे. नवी मुंबई शहराची निर्मिती खाडी किनार्यावर झालेली असल्याने खार्या पाण्याचा इमारतीच्या बांधकामावर परिणाम होत आहे. इमारतीच्या भिंतींना खार्या वातावरणामुळे तडे जात आहेत. त्यातच सिडकोने नवी मुंबईत केलेल्या बांधकामांपैकी किमान ९९ टक्के बांधकामे ही निकृष्ठ दर्जाची आहेत. केवळ इमारतीच नाहीत तर सिडकोने बांधलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केटदेखील अल्पावधीतच निकृष्ठ बांधकामाचा उत्कृष्ठ नमुना ठरला आहे.
नवी मुंबई कार्यक्षेत्रात अधिकांश इमारती आज धोकादायक घोषित होण्याच्या मार्गावर आहेत. त्याला कारण खारे वातावरण तसेच निकृष्ठ दर्जाचे बांधकाम असले तरी पावसाळ्याच्या कालावधीत छतातून पडणारे पाणी हे मुख्य कारण आज इमारतीच्या बकालपणाला व धोकादायक घोषित करण्याच्या परिस्थितीतीला जबाबदार आहे. पावसाळ्याच्या कालावधीत छताखाली असणार्या सदनिकांमध्ये महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चार महिने वास्तव्य करून दाखवावे. त्यांना या समस्येचे गांभीर्य व हे लोक पावसाळा कालावधीत कसे दिवस काढतात याची भयावहता अनुभवयास मिळेल. पावसाळा सुरू झाला की छताखाली असणार्या सदनिकाधारकांच्या पोटामध्ये खर्या अर्थांने भीतीचा गोळा उठतो. कारण थोडा जरी पाऊस छतावर पडला की छताखाली असणार्या सदनिकांमध्ये पाणी येण्यास सुरूवात होते. भिंती पाझरतात, कोठे तरी पाण्याची धार लागते. घराचा कलर उडण्यास सुरूवात होते. भिंतीना आंबूस वास येतो. एक वेगळ्या जाळ्या तयार होतात. भिंतीतून साबणाचा फेस निघावा तसे पाण्याचे तवंग येतो. घरातील सर्वच घटकांचे मानसिक स्वास्थ्यच या कालावधीत बिघडून जाते. एकप्रकारचे रोगट वातावरण तयार होते. अर्थात यामुळे केवळ छताखालील सदनिकांनाच त्रास सहन करावा लागतो अशातला प्रकार नाही. पाण्याला जिकडे जागा मिळते, पाणी त्या दिशेने वाटचाल करत असते. अनेकदा पावसाळा कालावधीत पहिल्या, दुसर्या इतकेच नाही तर तळमजल्यावरील सदनिकांच्याही भिंती पाझरताना आपणास पहावयास मिळतात. केवळ भिंतीना लिकेज इतपतच ही समस्या थांबत नाही, भिंतीतून पाझरणार्या पाण्यामुळे विद्युतच्या समस्या निर्माण होतात. भिंतींना शॉक लागणे, वायरींमध्ये स्पार्कींग होणे असे प्रकार घडू लागतात. घरात लादी साफ करण्यासाठी पाणी वापरले तर त्या लादीवर चालतानाही शॉक बसतो. मुळात लिकेजच्या समस्येने आज नव्वद टक्के इमारतीमधील सदनिकाधारक त्रस्त झाले आहेत.
लिकेजच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आजवर गृहनिर्माण सोसायट्यांनी हजारो नव्हे तर लाखोच्या घरात खर्च केले आहेत. गृहनिर्माण सोसायट्यांचा आजवरचा वार्षिक ताळेबंद तपासून पाहा, दरवर्षी छताचे लिकेज काढण्यासाठी केलेला खर्च स्पष्टपणे पहावयास मिळेल. दरवर्षीच लिकेजवर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करावा लागत असल्याने अखेरिला कायमचा तोडगा म्हणून छतावर पत्रे बसविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अर्थात छतावर पत्रेदेखील कोणी स्वखुशीने बसविले नाही. प्रत्येक सदनिकाधारकाला याकरिता पंचवीस ते चाळीस हजार रूपये मोजावे लागलेले आहेत. छतावर पत्रे बसविण्याकरिता छताखाली राहणार्या सदनिकाधारकांना त्याकरिता मोठा संघर्षही सोसायटी आवारात अन् य सदनिकाधारकांसोबत करावा लागलेला आहे. छताखालील सदनिकांना लिकेजचा त्रास होत आहे, आम्हाला त्याचे काय अशी आडमुठी भूमिका तळमजला, पहिल्या व दुसर्या मजल्यावरील सदनिकाधारकांनी घेतल्यामुळे छतावर पत्रे बसण्यास विलंब झाला. पावसाळा कालावधीत लिकेजच्या समस्येने शॉक सर्किट, शॉक बसणे यासह सतत काही ना काही समस्या निर्माण होवून घरातील सदस्यांच्या जिविताला धोका निर्माण झालेला आहे.
तुकाराम मुंढे यांनी आता हेच छतावरील पत्रे काढण्याचा निर्णय घेतल्यामुळे छताखालील सदनिकांधारकांच्या पोटात पुन्हा एकवार भीतीचा गोळा उठला आहे. पुन्हा एकवार मागे भोगलेल्या नरकयातना पुन्हा भोगण्याचे संकट त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. पावसाळा आता जेमतेम दोन महिन्यावर आलेला आहे. मुंढेंच्या या निर्णयाविरोधात काही सदनिकाधारकांनी न्यायालयात जाण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तुकाराम मुंढेंनी किमान छतावरील पत्रे काढण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तेथील गृहनिर्माण सोसायट्यांमधील सदनिकाधारकांशी चर्चा करणे आवश्यक आहे. पत्रे काढण्यापूर्वी मुंढेंनी आमच्या छतावरील लिकेज थांबविण्यासाठी ठोस तोडगा काढावा की जेणेकरून लिकेज होणार नाही व आम्हालाही त्रास होणार नाही. असा तोडगा काढल्यास आम्हीच स्वत:हून पत्रे काढून टाकू असा सूर रहीवाशांकडून आळविण्यात येवू लागला आहे. मुळातच छतावर बसलेल्या पत्र्यांमुळे लिकेजची समस्या कायमचीच संपुष्ठात आली आहे. इमारतीचे आयुष्यही वाढले आहे.लिकेज थांबल्यामुळे छताखालील सदनिकांधारकांनी घराची रंगरंगोटी केली आहे. फर्निचरचेही कामही केले आहे. पत्रे काढल्यास सदनकेच्या सजावटीवर खर्च केलेला लाखो रूपये खर्च पाण्यात जावून लिकेजचे पाणी पुन्हा घरात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुंढेंनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करणे आवश्यक आहे. छतावर पत्रे बसविल्यामुळे कोठेही शासकीय तसेच खासगी जमिनीवर अतिक्रमण झालेले नाही. छतावरील या पत्र्यांमुळे कोठेही वाहतुक कोंडी होणार नाही. मग हे पत्रे काढण्याचा मुंढेंचा अट्टहास कशासाठी असा संतप्त प्रश्न नवी मुंबईकरांकडून विचारण्यात येत आहे. मुंढेंनी निर्णय घेण्यापूर्वी पाहणी करावी, समस्येची सत्यता जाणून घ्यावी. नवी मुंबईत आजमितीला ३० हजाराहून अधिक इमारतींच्या छतावर पत्रे बसले आहे. साध्या एलआयजीच्या घरावरही पत्रे बसले आहेत. मुंढेंनी या निर्णयाचा फेरविचार न केल्यास सर्वसामान्य नवी मुंबईकर मुंढेविरोधात आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरेल आणि मुंढेंना पाठीशी घालणार्या मुख्यमंत्री फडणवीसांना पर्यायाने त्यांच्या भाजपाला याची फार मोठी किंमत नवी मुंबईत मोजावी लागेल. आधीच नवी मुंबईत भाजपाला फारसा जनाधार नसल्याचे पालिका निवडणूकीत पहावयास मिळाले आहे. विधानसभा निवडणूकीत भाजपाच्या मंदा म्हात्रेंना अवघ्या १२०० मतांनी निसटता विजय मिळाला आहे. मोदी लाट नसती तर येथे भाजपाचा आमदार कधीच निवडून आला नसता. मुंढेंनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करणे आवश्यक आहे.
– संदीप खांडगेपाटील
८३६९९२४६४६
दै. जनशक्तिमध्ये प्रकाशित झालेला वृत्तसंपादक संदीप खांडगेपाटील यांचा लेख नवी मुंबई लाईव्ह.कॉमच्या वाचकांसाठी जसाच्या तसा प्रकाशित करत आहोत. संदीप खांडगेपाटील हे १९९२ पासून पत्रकारितेमध्ये कार्यरत असून कॉलेज वार्ताहर ते संपादक अशा विविध पदांवर त्यांनी २५ वर्षामध्ये काम केले आहे. राजकीय क्षेत्रासह कामगार, शिक्षण या विषयांवर त्यांचे लिखाण विशेष प्रभावी आहे.
गणेश इंगवले – कार्यकारी संपादक
नवी मुंबई लाईव्ह.कॉम
८०८२०९७७७५