* शिक्षणमंडळाकडून १२ मदत केंद्र सुरु
* मनपा हद्दीत RTE च्या एकूण ४,२१६ जागा
साईनाथ भोईर
नवी मुंबई : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१)(सी) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित खाजगी शाळांमध्ये किमान २५% टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद असून, या अधिनियमानुसार २५% टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नवी मुंबईत प्रभावीपणे न राबविल्यास शिक्षणाधिकाऱ्यांना बेशरमेची झाडे भेट देऊ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दि.०६ फेब्रुवारी २०१७ ला शिक्षण अधिकारी संदीप संगवे यांना पत्राद्वारे दिला होता. मनसेच्या या इशाऱ्यानंतर तात्काळ दि.०७ फेब्रुवारीलाच शिक्षणाधिकाऱ्यांकडून RTE २५% टक्के प्रवेशपात्र १०७ शाळांची यादी nmmc.gov.in वर टाकण्यात आली आहे, तसेच RTE २५% टक्के प्रवेशासाठी विद्यार्थी पालकांना येणाऱ्या समस्यांसंदर्भात शिक्षण मंडळाकडून नवी मुंबई शहरात १२ मदत व सहाय्य केंद्रे सुद्धा सुरु करण्यात आल्याचे मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी सांगितले आहे.
दि.१० जानेवारी २०१७ शासन निर्णयानुसार वरील दोन्ही अधिनियमांची जरी अंमलबजावणी झाली असली तरी,या १०७ शाळांनी आपल्या शाळेच्या दर्शनी भागात पालक व नागरिकांना सहज दिसेल असे २५% टक्के प्रवेशाचा माहिती फलक अद्याप पर्यंत लावलेला नाही. शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रवेशासंदर्भात जनजागृतीसाठी नवी मुंबई शहरात अद्यापपर्यंत कोणीतीही भित्तीपत्रके अथवा बॅनर लावलेला नाही, पालकांना ऑनलाईन अर्ज करताना येणाऱ्या समस्या विचारात घेऊन त्यावर आधारित प्रशिक्षणाचे नियोजन केलेले नाही, या व इतर अनेक बाबींची अंमलबजावणी अजूनही शिक्षणाधिकाऱ्यांकडून होणे गरजेचे असल्याचे मत मनविसे उपशहर अध्यक्ष संदेश डोंगरे यांनी मांडले आहे.
त्याचबरोबर दि.०९ फेब्रुवारी ते दि.२१ फेब्रुवारी २०१७ पर्यंतच हे RTE २५% टक्के ऑनलाईन प्रवेश होणार असून, ही १२ दिवसांची मुदत अत्यल्प अशी असून या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री, प्रधान सचिव व शिक्षण संचालक यांना पत्र पाठवून ही मुदत वाढवण्याची मागणी करणार असल्याचे सुद्धा मनविसे उपशहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.