शिवसेनेची सेंटिंग राज्यातील जनतेशी असल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.
आमचा मित्रपक्ष सत्तेसाठी कोठे काँग्रेससोबत तर राष्ट्रवादीसोबत सेटिंग करतोय, या मुख्यमंत्र्यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात करत शिवसेनेची सेंटिंग राज्यातील जनतेशी असल्याचे स्पष्ट केले. आमच्या सोबत आहे तो मित्र आणि समोर उभा राहिलेला शत्रू असून, मैत्री गेली खड्डयात जनतेशी आमची बांधिलकी आहे. यापुढे कोणाशीही युती नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपला सुनावले. भाजपने दि. १६, २०, २१ फेब्रुवारीला ‘सामना’ वृत्तपत्र बंद करण्याची मागणी निवडणूक आयोगाला केली आहे. त्यांच्या या मागणीचा उद्धव यांनी समाचार घेत सामना वृत्तपत्रावर बंदी घालणे म्हणजे आणीबाणी नव्हे का, असा सवाल केला.
पुणे महापालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी ठाकरे यांची आज (बुधवार) पुण्यात जाहीर सभा झाली. या वेळी ते बोलत होते. राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार निलम गो-हे, जिल्हा संपर्क प्रमुख अमोल कोल्हे, माजी मंत्री शशीकांत सुतार, माजी आमदार आणि शहर प्रमुख विनायक निम्हण, महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे आदी उपस्थित होते. या वेळी पुणेरी पगड़ी आणि तलवार देऊन उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.
ठाकरे म्हणाले, मागील २५ वर्षे भाजपच्या चांगल्या आणि वाईट काळात त्यांच्या सोबत राहिलो आणि आज हे खोटे आरोप करत आहेत. महापालिका निवडणुकीत जागा वाटपामध्ये मागेल तिथे जागा आम्ही द्यायच्या. हे काय चाललंय असे म्हणत, हा काही गाजर हलवा नाही, असा टोलाही लगावला. जागावाटपामुळेच युती तोडल्याचे स्पष्ट करत या पुढील काळात युती होणार नसून कोणाचे ही आम्हाला ओझे नको, अशी भूमिका त्यांनी मांडली. पंतप्रधान मोदींच्या नावाचा उल्लेख न करता त्यांची लाट विधानसभा निवडणुकीत संपली असून जर आमचा टेकू नसता तर तुमची खुर्ची वाचली असती का ? असा सवाल मुख्यमंत्र्याना केला. राज्यातील सरकार नोटीस पिरियडवर असून शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची घोषणा करा, मी लगेच पाठिंबा देतो, असे सूचक विधान त्यांनी केले.
पुण्यात सिहंगडावर महापालिकेच्या पारदर्शक कारभारासाठी भाजप उमेदवारांना शपथ देण्यात आली. हीच शपथ राज्याच्या कारभारात देखील पाहिजे. पंतप्रधान मोदी हे राष्ट्रवादीवर ‘नॅचरल करप्ट पार्टी’ म्हणून टीका करतात. तर दुसरीकडे बारामतीमध्ये जाऊन पवारांचे बोट धरून आपण राजकारणात आल्याचे सांगतात. याला काय म्हणायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधानांनी देशात नोटाबंदी जाहीर केली. त्यातून काय साध्य झाले. दहशतवाद संपलेला नाही. उलट पाकिस्तानमधून खोट्या नोटा येत आहेत, असे ते म्हणाले.
..तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांनी तोंड बंद ठेवावे
१६, २०, २१ फेब्रुवारीला सामना वृत्तपत्र बंद करणे ही आणीबाणी आहे असे ते म्हणाले. सामना छापायचा नसेल तर मुख्यमंत्री, पंतप्रधान यांनी तोंड बंद ठेवावे. आणीबाणीबाबत इंदिरा गांधी यांच्यावर टीका करण्याचा भाजपला काहीच अधिकार नसल्याचे त्यांनी या वेळी ठणकावून सांगितले.