साईनाथ भोईर
नवी मुंबई : शिक्षण हक्क अधिनियमानुसार* दुर्बल व वंचित घटकातील २५% टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्याबाबत मनसेने आवाज उठविल्यानंतर मनपा शिक्षणाधिकारी संदीप संगवेंना जाग येऊन *दि.०५ फेब्रुवारीला* ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होऊन देखील त्यांनी मनपा वेबसाईट वर प्रवेश पात्र शाळांची यादीच मुळी *दि.०७ फेब्रुवारी* रोजी वेबसाईटवर दोन दिवस उशिराने टाकली. इतकेच नव्हेतर शिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले १२ मदत, सहाय्य केंद्रे नुसते कागदावर असून प्रत्यक्षात तेथे असलेले सर्व केंद्र समन्वयक हे निवडणूक कामात व्यस्त असल्याचे लक्षात येते. शिक्षणाधिकारी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दि.२१ फेब्रुवारी २०१७ ऑनलाईन प्रवेशाची शेवटची तारीख असल्याचे जाहीर केले असले तरी मात्र राज्यशासनाने ही तारीख दि.२५ फेब्रुवारी केल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांना माहित नाही का ? असा सवाल मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी केला आहे. त्यामुळे अर्धवट माहिती असलेल्या RTE २५% टक्के प्रवेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी न करणाऱ्या शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी मनविसे *शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे* यांनी मनपा आयुक्त श्री.तुकाराम मुंढे यांच्याकडे केली आहे.
संपूर्ण नवी मुंबईत RTE २५% टक्के प्रवेशाच्या एकूण ४,२१६ जागा असून फक्त त्यातील १,६७३ अर्ज स्वीकृत होऊन म्हणजे या मोहिमेला फक्त ३९% टक्के यश येऊनही स्वतःची पाठ थोपटून घेणारा शिक्षणाधिकारी संगवे यांचे डोके ठीकाण्यावर नाही. दि.१० जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार नवी मुंबईतील १०७ शाळांनी RTE २५% टक्के प्रवेश प्रक्रिये बाबतचा संपूर्ण माहिती फलक शाळेच्या दर्शनी भागात लावणे गरजेचे असताना ए.पी.जे., डी.पी.एस., डी.ए.व्ही. सारख्या ९०% खाजगी शाळांनी हा फलक अद्याप लावलेला नाही. नागरिक व पालकांसाठी शाळेत स्वतंत्र कक्ष स्थापन केलेला नाही. प्रवेशाबाबत शाळांनी व्यापक प्रसिद्धी केलेली नाही. मात्र या शाळांवर कोणतीही कारवाई करताना शिक्षणाधिकारी दिसत नाही. इतकेच काय शासन निर्णयात स्पष्ट उल्लेख असताना स्वच्छ भारत अभियान आणि वॉक विथ कमिशनरचे शेकडो बॅनर, फलक लावणाऱ्या मनपाने या RTE २५% टक्के प्रवेश प्रक्रियेचा एकही बॅनर, फलक नवी मुंबई शहरात लावलेला दिसत नाही. शासन निर्णयातील या व अशा इतर अनेक बाबींची अंमलबजावणी शिक्षणाधिकाऱ्यांकडून झाली नसल्याचे मनविसे *उपशहर अध्यक्ष संदेश डोंगरे* यांनी कळविले आहे.
अशा खोटारड्या व शासन निर्णयाला केराची टोपली दाखविणाऱ्या शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांना प्रामाणिक व कार्यक्षम आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कायद्याचा बडगा दाखवावा अशी मागणी मनविसे *उपशहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर* यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.