नवी मुंबईचा इतिहास लिहिताना सटवाईने तुकाराम मुंढे नावाचे पर्व जाणिवपूर्वक लिहीले असल्याचा संशय येवू लागला आहे. या शहराने राजकारण्यांची एकाधिकारशाही जवळून पाहिली आहे. अनुभवली आहे. भरतीनंतर ओहोटीचा नियम आहे. वर्षानुवर्षे राजकारण्यांच्या एकाधिकारशाहीची सवय अंगी बाणलेल्या या शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्राला आता प्रशासनातील मुंढेनामक एकाधिकारशाहीची सवय गेल्या काही महिन्यापासून अनुभवयास मिळत आहे. शनिवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी तुर्भेत ‘वॉक विथ कमिशनर’ अभियान राबविताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तुर्भेतील डम्पिंग ग्राऊंड हलविले जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितल्याने तुर्भेकरांचे धाबे दणाणले आहे.
मुळातच डम्पिंग ग्राऊंड हे कोणत्याही शहरातील नागरिकांना आपल्या जवळ नको असते. प्रत्येकाला आपल्या निवासी परिसरापासून डम्पिंग ग्राऊंड लांब हवे असावे असे वाटत असेल तर डम्पिंग ग्राऊंड ठेवायचे कोठे हा आता नव्याने विषय निर्माण होवू लागला आहे. डम्पिंग ग्राऊंडमुळे दुर्गंधी येते, डोळ्यांची जळजळ होते, श्वसनांचे विकार होतात, जिवितावर मृत्यूची टांगती तलवार कायम असते अशा समस्यांचा ढोल वाजवित डम्पिंग ग्राऊंड स्थंलातरणाची मोहीम सुरू होते. तशीच मोहीम गेल्या काही महिन्यापासून तुर्भे परिसरात सुरु आहे. जनआंदोलनाला राजकीय ढाल मिळाल्यानंतर तुर्भेतील डम्पिंग ग्राऊंडचा विषय चव्हाट्यावर येवू लागला आहे. मुळातच सुनियोजित नवी मुंबईत तुर्भेतील डम्पिंग ग्राऊंडची जागा सुनियोजित होती. हे माहिती असतानाही त्या सभोवतालच्या परिसरात थोड्या प्रमाणात अधिकृत तर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या, चाळी वसलेल्या आहेत. तुर्भे परिसर हा स्लम परिसर म्हणून ओळखला जातो. गोरगरीबांचा परिसर अशीच तुर्भे परिसराची नवी मुंबई परिसरात ओळख आहे. परिस्थिती गरीब असल्याने डम्पिंग सभोवतालच्या परिसरात निवासी वास्तव्य करायचे आणि नंतर आरोग्याचा प्रश्न उपस्थित करून डम्पिंगला विरोध करायचा, असाच काहीसा प्रकार तुर्भेतील डम्पिंगबाबत सुरू झाला आहे.
नवी मुंबईत सुरूवातीला कोपरखैराणे, सेक्टर 23 परिसरात होते. अर्थात ती डम्पिंगची तात्पुरती करण्यात आलेली व्यवस्था होती. तुर्भेतील डम्पिंग व्यवस्था कार्यान्वित होईपर्यत पालिका व सिडको प्रशासनाने केलेली ती तात्पुरती तजवीज होती. कोपरखैराणेतील खाडीकिनारी भागात हे तात्पुरत्या स्वरूपात डम्पिंग सुरू करण्यात आले. अर्थात पालिका प्रशासनाने कोपरखैराणेतून तुर्भेमध्ये डम्पिंग सहजासहजी स्थंलातरीत केले नाही; तुर्भेत डम्पिंगची व्यवस्था होवूनही कोपरखैराणेतून डम्पिंग स्थंलातरीत करण्यास पालिका प्रशासनाकडून चालढकलच केली जात होती. कोपरखैराणे सेक्टर 23 परिसरासह संपूर्ण कोपरखैराणे नोड मृत्यूच्या आहारी जात असतानाही पालिकेची डम्पिंग स्थंलातरणाबाबत उदासिनता कायम होती. त्याविरोधात स्थानिक जनतेला मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारावे लागले. रास्ता रोको करावा लागला. मनपा ते मंत्रालय प्रशासनदरबारी पाठपुरावा करावा लागला. कोपरखैराणे सेक्टर 23 परिसरातील आकाशगंगा या सिडको सोसायटीतील बीपीटीमध्ये काम करणार्या देविदास हांडेपाटील नामक सामाजिक कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे हे शक्य झाले. रस्त्यावर उतरून जनआंदोलन करणे, प्रशासनदरबारी पाठपुरावा करणे आदी कामांंमध्ये देविदास हांडेपाटील यांचे योगदान कोपरखैराणेवासियांना कदापि विसरता येणार नाही. सर्वसामान्य माणूस जेव्हा आंदोलनाचे नेतृत्व करतो, तेव्हा त्या आंदोलनाची दखल सर्वांनाच घ्यावी लागते.
आज तुर्भेतील लोकांनी डम्पिंग स्थंलातरणाचा लढा सुरू केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे त्या भागातील मातब्बर राजकीय प्रस्थ व पालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्यासह तुर्भेतील त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी याप्रकरणी पालिकेच्या महासभेतही गदारोळ घालण्यास सुरूवात केली आहे. पालिका प्रशासनाची डम्पिंग हटविण्याची कोणतीही मानसिकता नसल्याचे मुंढे यांच्या शनिवारच्या ‘वॉक विथ कमिशनर’ अभियानातून स्पष्ट झालेली आहे. मुळातच डम्पिंगसाठी राखीव असलेल्या जागेतून अन्य जागेत डम्पिंग स्थंलातरीत होणे शक्यच नाही. नवी मुंबई ही सुनियोजित शहर आहे. या शहरामध्ये प्रत्येक जागेचे आरक्षण निश्चित आहे. तुर्भेचे डम्पिंग स्थंलातरीत करण्याचे ठरविले तरी अन्यत्र कोठेही नवी मुंबईत जागा उपलब्ध नाही. यामुळे डम्पिंग स्थंलातरीत होणे शक्यच नाही. तुर्भेवासियांचा लढा योग्य कारणासाठी असला तरी त्यांनी निवासी वास्तव्याकरिता निवडलेली जागा चुकीची आहे. स्वस्तात जागा मिळते म्हणून त्यांनी तुर्भे पर्याय निवडला. गरज असताना मृत्यूचा सहवास स्विकारला आणि डम्पिंग हटविण्याचा लढा म्हणजे दगडावर डोके आपटून घेण्याचा प्रकार आहे. मुळातच डम्पिंगसाठी नवी मुंबईत लांबवर कोठे रिकामी जागा असती तर प्रशासनाने निश्चितच डम्पिंग स्थंलातरीत केले असते. पण आता हे शक्य नाही. नवी मुंबईमध्ये दिघा ते बेलापुरदरम्यान कोठेही जागा शिल्लक नाही. सर्वत्र निवासी परिसर पसरलेला आहे. डोंगराळ भाग, खाण परिसर सर्वत्रच लोकांनी घरे बांधली आहेत. एमआयडीसी, सिडको व पालिका सर्वच प्रशासनाच्या कोठेही मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त नाही. मुळातच आता डम्पिंगसाठी टाहो फोडणार्या तुर्भेवासियांना आता आपली अतिक्रमणे वाचविण्यासाठी नव्याने धावपळ करावी लागणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी येत्या तीन ते चार दिवसामध्ये तुर्भेतील अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात करणार असल्याचे जाहिर केल्याने अतिक्रमण माफियांचे धाबे दणाणले आहे. अतिक्रमणातून दरमहा मिळणार्या भाड्यातून त्यांचे आर्थिक उत्पन्न विस्तारले आहे. आता त्याच्यावरच संक्रात येणार आहे. तुर्भेतील अतिक्रमण विरोधी मोहीम पालिका प्रशासनाने राबविण्यास सुरूवात केल्यावर तुर्भे परिसर बर्यापैकी रिकामा होईल आणि डम्पिंगच्या स्थंलातरप्रकरणी निर्माण झालेले वादळ काही काळ तुर्तास थंडावेल.
– संदीप खांडगेपाटील
8369924646
संदीप खांडगेपाटील
८३६९९२४६४६
दै. जनशक्तिमध्ये प्रकाशित झालेला वृत्तसंपादक संदीप खांडगेपाटील यांचा लेख नवी मुंबई लाईव्ह.कॉमच्या वाचकांसाठी जसाच्या तसा प्रकाशित करत आहोत. संदीप खांडगेपाटील हे १९९२ पासून पत्रकारितेमध्ये कार्यरत असून कॉलेज वार्ताहर ते संपादक अशा विविध पदांवर त्यांनी २५ वर्षामध्ये काम केले आहे. राजकीय क्षेत्रासह कामगार, शिक्षण या विषयांवर त्यांचे लिखाण विशेष प्रभावी आहे.
गणेश इंगवले – कार्यकारी संपादक
नवी मुंबई लाईव्ह.कॉम
८०८२०९७७७५