साईनाथ भोईर
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने मागील दहा वर्षांपासून पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या उदंड प्रतिसादात आयोजित करण्यात येणारे झाडे, फुले, फळे, भाजीपाला यांचे प्रदर्शन आणि स्पर्धा याही वर्षी 3 ते 5 मार्च 2017 रोजी वंडर्स पार्क, से.19 ए, नेरूळ येथे संपन्न होत आहे.
आधुनिक शहराला साजेसे प्रकल्प उभारताना च नवी मुंबई महानगरपालिकेने शहराच्या पर्यावरणाकडे विशेष लक्ष दिले असून नवी मुंबई शहराची ओळख ‘पर्यावरणशील शहर’ अर्थात ‘इको सिटी’ अशी व्हावी यादृष्टीने विविध सुविधांकडे लक्ष दिले जात आहे. या अनुषंगाने नवी मुंबईकर नागरिकांमध्ये वृक्षप्रेम वाढीस लागावे आणि यातून पर्यावरण विषयक कामांमध्ये प्रत्यक्ष नागरी सहभाग लाभावा याकरीता अकरावे झाडे, फुले, फळे, भाजीपाला यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येत असून लोकसहभागाच्या दृष्टीने याविषयीच्या 24 विविध विभागांतील स्पर्धांचे व उद्यान स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात निसर्गाने मुक्तहस्ताने निर्मिलेली झाडे, फुले, फळे, भाजीपाला यामधील आकर्षक विविधता एकाच छताखाली अनुभवता येणार असून या प्रदर्शनात नामवंत उद्योगसमुह, शैक्षणिक संस्था, विद्यालये, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, पर्यावरणप्रेमी नागरिक सहभागी होत आहेत. या ठिकाणी फुलांची रांगोळी, फळे, फुले, भाज्या यांच्या कलात्मक रचना, बोन्साय, उद्यान रचना असे निसर्ग वैभव व वैविध्य अनुभवता येणार असून उद्यानाशी संबंधित विविध साहित्य, विविध वृक्ष रोपे, वेली, पूरक खते आदी बाबींचे स्टॉलही उपलब्ध असणार आहेत.
नागरिकांना निसर्गाची विविधता जवळून प्रत्यक्ष अनुभवता यावी व त्यांच्यामध्ये वृक्षप्रेम रूजावे आणि यातून त्यांनी आपल्या परिसरात वृक्ष लागवड करावी तसेच त्यांचे संवर्धन करावे हा हेतू नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात अथवा स्पर्धेत सहभागी होण्याकरीता अधिक माहितासाठी नागरिकांनी सहा. उद्यान अधिकारी यांचेशी दूरध्वनी क्रमांक 022- 27566063 किवा 022- 27567064 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे सूचित करण्यात येत आहे.
3 मार्च रोजी दुपारी 12 ते रात्रौ 9 वा. पर्यंत तसेच दि. 4 व 5 मार्च रोजी सकाळी 8.30 ते रात्रौ 9 पर्यंत वंडर्स पार्क, से.19 अ, नेरूळ हे प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य खुले असून या प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी व त्यातही शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भेट द्यावी आणि निसर्गातील विविधतेचा अनुभव घ्यावा असे आवाहन वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येत आहे.