साईनाथ भोईर
नवी मुंबई : गेली अनेक वर्षापासून रेंगाळत असलेला तुर्भे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न व तेथील रहिवाशाच्या आरोग्याशी होत असलेला खेळ या समस्यांसंदर्भात आज बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे व नगरसेवक सुरेश कुलकर्णी, नगरसेविका राधा कुलकर्णी, नगरसेविका संगीता वास्के, मुद्रिका गवळी यांनी महसूल, मदत-पुनर्वसन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंडमुळे तेथील परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्याच्या दुर्गंधीने तेथे वस्ती असलेल्या सुमारे लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर डम्पिंग ग्राउंड इतरत्र हलविण्यासंदर्भात आमदार मंदाताई म्हात्रे यांनी चर्चा केली असता या डम्पिंग ग्राउंड करिता पर्यायी जागा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव लवकरच तयार करण्यात येईल व सदर डम्पिंग ग्राउंड त्या जागेवर हलविण्यात येईल असा सकारात्मक निर्णय कॅबीनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंड संदर्भात बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी व औचित्याच्या मुद्याद्वारे मागणी केली होती, तसेच शासन दरबारीही अनेक वेळा पत्रव्यवहार केला होता. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश येऊन प्रशासनाने या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेकडे अहवाल सादर करण्यास सांगितले होते. परंतु महापालिकेने सादर केलेला अहवाल महाराष्ट्र शासनाचा दिशाभूल करणारा असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी खडसावून सांगितले. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डम्पिंग ग्राउंड संदर्भात दिलेल्या निर्णयाने तुर्भेवासियांमध्ये आनंदाचे वातावरण असून तुर्भे येथील नागरिकांनी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानले.
याप्रसंगी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांजसमवेत भाजप ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मारुती भोईर, महाराष्ट्र प्रदेश कार्यालय सचिव सुरेश गायकवाड, माजी नगरसेवक प्रल्हाद शेलार, गुलाब भिडे आदी उपस्थित होते.