नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाकरिता नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार आहे. महापौरपद ओबीसीकरिता राखीव असल्याने हे पद मिळविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेतील अनेक नगरसेवक गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झाले आहेत. सध्या महानगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असून कॉंग्रेसच्या नगरसेवकांचे त्याला टेकू आहे. स्थायी समिती सभापतीपद शिवसेनेने मिळविल्यापासून शिवसेनेच्या महत्वाकांक्षा वाढीस लागल्या आहेत.महापालिका सभागृहात स्पष्ट बहूमतासाठी राष्ट्रवादी कॉंग्र्रेसला जेमतेम दोन-तीन नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने कॉंग्र्रेसला उपमहापौर व एक विषय समिती सभापतीपद देवून सभागृहात राजकीय अस्थितरता निर्माण होणार नाही याची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. तथापि कॉंग्र्रेसला व अपक्षांना सोबत घेवून महापौरपद मिळविण्यासाठी शिवसेनेने आतापासूनच मोर्चेबांधणीस सुरूवात केल्यामुळे येणारी महापौरपदाची निवडणूक ही सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्र्रेस आणि विरोधी पक्षातील शिवसेना दोन्हीसाठी राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा विषय बनली आहे.
नवी मुंबईचे राजकारण हे १९८५ सालापासून गणेश नाईक याच नावासभोवताली आजतागायत केंद्रीत झालेले आहे. १९८५ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत गणेश नाईकांचा निसटता पराभव झाला असला तरी त्या निवडणूकीनंतर नवी मुंबईच्या राजकीय सारीपाटावर गणेश नाईक पर्वाचा शुभारंभ झालेला आहे. १९९०, १९९५ साली गणेश नाईकांनी विधानसभेत नवी मुंबईचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. १९९९ साली पुन्हा एकवार अवघ्या २७०० मतांनी गणेश नाईक पराभूत झाले.त्यानंतर पुन्हा एकवार २००४ आणि २००९ साली गणेश नाईक विधानसभेत नवी मुंबईचे प्रतिनिधीत्व करू लागले. मोदी लाटेमध्ये महाराष्ट्रातील अनेक रथी-महारथींना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामध्ये गणेश नाईकांचाही समावेश होता. अवघ्या १२०० मतांनी गणेश नाईक पराभूत झाले. १९८५,१९९९,२०१४ साली गणेश नाईकांचा विधानसभा निवडणूकीत झालेला पराभव हा अवघ्या १००० ते २००० फरकाने झालेला आहे.
१९९२ साली नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली. १९९५ साली महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या. तेव्हापासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाच सार्वत्रिक निवडणूका संपन्न झाल्या. पहिल्या व दुसर्या सभागृहात संख्याबळाअभावी कोणालाही स्पष्ट बहूमत नसतानाही गणेश नाईकांनी महापालिका सभागृहावर एकहाती वर्चस्व कायम ठेवले. तिसर्या व चौथ्या सभागृहात नवी मुंबईकरांनी गणेश नाईकांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास दाखवित स्पष्ट बहूमत राष्ट्रवादी कॉंग्र्रेसला दिले. पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीपूर्वी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. लोकसभा निवडणूकीमध्ये देशाच्या कानाकोपर्यात मोदी लाट होती. लोकसभा निवडणूकीत खासदार संजीव नाईकांना दोन लाख ८४ हजार इतक्या फरकाने दणदणीत पराभूत होण्याची वेळ आली. नवी मुंबई हा गणेश नाईकांचा राजकीय बालेकिल्लाच. ‘गणेश नाईक बोले आणि नवी मुंबई डोले’ अशी येथील राजकारणाची भाषा होती. पण लोकसभा निवडणूकीत याच निवडणूकीत ऐरोली आणि बेलापुर विधानसभा निवडणूकीत तब्बल ४७ हजारांनी संजीव नाईक पिछाडीवर होते. लोकसभा निवडणूक निकालानंतर गणेश नाईक संपले अशी हाकाटी मोठ्या प्रमाणावर नवी मुंबईच्या राजकीय क्षेत्रात पिटण्यास सुरूवात झाली. गणेश नाईक समर्थकांमध्ये चलबिचल सुरू झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसची सुरू झालेली वाताहत आणि गणेश नाईकांच्या घटत्या जनाधाराबाबत विरोधकांनी निर्माण केलेले चित्र या पार्श्वभूमीवर गणेश नाईकांच्या सभोवताली फिरणार्यांनी आपल्या राजकीय भविष्यासाठी पडद्याआडून हालचाली सुरू केल्या.विधानसभा निवडणूकीत गणेश नाईक पराभूत झाले आणि गणेश नाईकांचा झेंडा खांद्यावर घेवून नाचण्यात आपली हयात घालविणार्यांनी नवीन घरोबा शोधण्याच्या उघडपणे हालचाली सुरू केल्या.मोठ्या संख्येने गणेश नाईकांचे समर्थक धनुष्याच्या व कमळाच्या सावलीत जावून विसावले. परप्रातिंय मतदारांचाही कमळाकडे स्पष्टपणे कल झुकलेला होता. या पार्श्वभूमीवर गणेश नाईक राष्ट्रवादी कॉंग्र्रेसमध्ये उरलेल्या आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीला सामोरे गेले. १११ संख्याबळ असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहात नवी मुंबईकरांनी राष्ट्रवादी कॉंग्रेेसचे ५३ नगरसेवक निवडून पाठविले. दोन ते तीन अपक्षांनी मतमोजणीच्या दिवशीच राष्ट्रवादी कॉंग्र्रेसला समर्थन दिले. तथापि कोणतीही राजकीय अस्थिरता राहू नये यामुळे कॉंग्र्रेसला सत्तेत गणेश नाईकांनी सहभागी करून घेतले. त्यामोबदल्यात उपमहापौरपद व एक विषय समिती सभापतीपद कॉंग्र्रेसला दिले.
स्थायी समिती निवडणूकीपूर्वी नाट्यमय घडामोडी घडल्याने एक वर्षाकरिता राष्ट्रवादी कॉंग्र्रेसला स्थायी समिती पद गमवावे लागले. शिवसेनेच्या शिवराम पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेेसच्या जयवंत सुतारांना पराभूत केले. स्थायी समिती मिळाल्यापासून शिवसेनेच्या राजकीय महत्वाकांक्षा वाढीस लागल्या आहेत. कॉंग्र्रेस, भाजपा व अन्य अपक्षांची मोट बांधून महापौरपद राष्ट्रवादी कॉंग्र्रेसकडून हिरावून घेण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरु झाल्या आहेत. त्यातच महापौरपद ओबीसी राखीव झाल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्र्रेसमधील अनेकांच्या महत्वाकांक्षा जाग्या झाल्या आहेत. शिवसेनेत विरोधी पक्षनेते विजय चौगुले, गोवा सहसंपर्कप्रमुख नामदेव भगत, एम.के.मढवी, सोमनाथ वासकर यांच्यापासून डझनावारी ओबीसी समाजाचे नगरसेवक आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही तेच चित्र आहे. जयवंत सुतार, सुजाता सुरज पाटील, गिरीश म्हात्रेंंपासून ते थेट माजी महापौर तुकाराम नाईकांच्या कन्या वैशाली नाईकांपर्यत डझनावारी ओबीसी नगरसेवक आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक नगरसेवक तर आताच सभागृह नेते जयवंत सुतारांना उघडपणे भावी महापौर याच नावाने उल्लेख करू लागले आहेत. जयंवत सुतार हे परिपक्व व एका प्रगल्भ विचारसरणीचे नेते आहेत. स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणूकीत झालेल्या पराभवापासून त्यांनी नक्कीच बोध घेतला असावा. ज्या ज्या वेळी जयवंत सुतारांचा मोठ्या पदासाठी उल्लेख होतो, त्या त्यावेळी जयवंत सुतारांना एकतर पराभवाचा सामना करावा लागतो अथवा राजकारणातून काही काळ अलिप्तता घेण्याची वेळ येते, हे पालिका राजकारणात यापूर्वी नवी मुंबईकरांना पहावयास मिळालेले आहे.
महापालिकेच्या चौथ्या सभागृहाचे महापौरपद खुल्या गटासाठी आरक्षित झाल्यावर जयवंत सुतार आणि शशिकांत बिराजदार या जोडीचा भावी महापौर म्हणून उल्लेख होवू लागला व प्रत्यक्षात काय घडले हे सर्वांनाच माहिती आहे. चौथ्या सार्वत्रिक निवडणूकीत बिराजदार व जयवंत सुतारांना पराभूत होवून पाच वर्षे घरी बसण्याची वेळ आली. सागर नाईकांसारख्या युवा नेतृत्वाला महापौर बनण्याची संधी मिळाली. कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांचे सध्याच्या राजकीय वातावरणात बोनकोडेशी कमालीचा जिव्हाळा आहे. दशरथ भगत यांच्याच घरात तीन नगरसेवक असून कॉंग्रेेसचे अन्य तीन नगरसेवक दशरथ भगत म्हणतील ती पूर्व दिशा अशा पठडीतील असल्याने दशरथ भगत हे सहा नगरसेवक आजच खिशात घेवून फिरत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्र्रेसला स्पष्ट बहूमतासाठी जेमतेम चार नगरसेवक कमी पडत असल्याने दशरथ भगतांच्या मैत्रीमुळे शिवसेनेचा महापौर होणे तुर्तास शक्य नाही. त्यातच तीन नगरसेवक घरात असतानाही मागच्या वेळी उपमहापौरपद न मिळाल्याने वाशीमध्ये असलेली नाराजी लपून राहीलेली नाही. यावेळी वाशीकर कोणत्याही परिस्थितीत उपमहापौरपद मिळविण्याची संधी सोडणार नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ऐनवेळी फोडाफोडीच्या राजकारणाचा खेळ खेळला जाण्याचीू शक्यता नाकारता येत नाही. पालिकेच्या दुसर्या सभागृहात १६ नोव्हेंबर २००२ रोजी झालेल्या महापौरपदाच्या निवडणूकीत संजीव नाईकांकडे अवघे १६ नगरसेवक असल्यामुळे त्यांचा पराभव निश्चित मानला जात होता. महापौर निवडणूकीच्या अगोदर काही दिवसच डी.आर.पाटील आपल्या नऊ समर्थक नगरसेवकांसह कॉंग्रेेसमध्ये दाखल झाले होते. पण महापौर पदाकरिता मतदान झाले. संजीव नाईकांना ४२ मते मिळाली. त्यामुळे बोनकोडेचे राजकारण समजण्या व उमजण्यापलिकडचे आहे. शिवसेनेने कॉंग्रेस व अपक्षांच मोट बांधून महापौरपद मिळविण्यासाठी आताच मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या नोव्हेंबर महिन्यात महापौरपदाच्या निवडणूकीकरिता आतापासूनच बैठकांना प्रारंभ झाला आहे.