दोषींवर कडक शासन करण्याची मनसेची पोलीस आयुक्तांकडे मागणी.
साईनाथ भोईर
नवी मुंबई : २८ फेब्रुवारी २०१७ रोजी नवी मुंबईतील दिघा येथे न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत इमारतींवर होत असलेल्या कारवाईचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या झी२४तास वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधी स्वाती नाईक व कॅमेरामन संदीप भारती यांच्यावर तेथील भू-माफिया व गुंडांनी प्राणघातक हल्ला केला. हा प्रकार निंदनीय असून संताप आणणारा आहे व या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीर निषेध करीत असल्याचे नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. सदर प्रकरणातील दोषींवर कठोर शासन करण्याची मागणी मनसेने नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत काटकर व मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा दिघ्यात असूनही हल्ला झालाच कसा असा प्रश्न नवी मुंबई मनसेने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात विचारला आहे. या सर्व प्रकरणात पोलिसांची भुमिका संशयी असल्याचे मनसे महिला सेनेच्या डॉ.आरती धुमाळ यांनी म्हटले आहे. कॅमेरामन संदीप भारती अजूनही ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये दाखल आहेत. मात्र या घटनेला २४ तास उलटूनही पत्रकार स्वाती नाईक व संदीप भारती यांची भेट घेण्याची तसदी नवी मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडून झाली नसल्याचे मनसे विद्यार्थी सेनेचे संदेश डोंगरे व सनप्रीत तुर्मेकर यांनी म्हटले आहे. २४ तासांनंतर जबाब घेण्यासाठी पोलीस गेले यावरूनच पोलिसांना या घटनेचे किती गांभीर्य आहे असा उपरोधिक सवाल मनसेने प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.
याच दरम्यान आज दिवसभरामध्ये नवी मुंबई पत्रकारांच्या वतीने वाशी शिवाजी चौकात झालेल्या धरणे आंदोलनाला ही मनसेचे गजानन काळे व मनसे सैनिक उपस्थित होते. त्यांनी या धरणे आंदोलनाला पाठींबा दिला. तसेच पत्रकारांसमवेत शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रकार स्वाती नाईक यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
हा हल्ला कोण्या व्यक्तीवर नसून हा हल्ला म्हणजे लोकशाहीचा चौथा स्थंब असणाऱ्या संपूर्ण मिडीयावरचा हल्ला आहे. त्यामुळे उद्या एखाद्या बातमीचे वृत्तांकन करताना पत्रकारांनी पोलीस सरंक्षण मागवून वृत्तांकनाला जावे का असा खडा सवाल मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण गंभीरपणे घ्यावे व सदर गावगुंडांना कडक शासन करावे व सदर हल्ला होत असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या पोलिसांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.