बस सेवेतील विविध गोष्टींचा समावेश असणारी आय.आय.टी.एस. ही देशातील सर्वोत्तम कार्यप्रणाली
साईनाथ भोईर
नवी मुंबई : ई-गव्हर्नन्सच्या दृष्टीने गतीमान वाटचाल करीत असताना आणखी एक यशस्वी पाऊल टाकत नवी मुंबई महानगरपालिकेने NMMT Bus Tracker (एन.एम.एम.टी बस ट्रॅकर) हे प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त असे मोबाईल ॲप विकसित केले असून आज महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी विशेष पत्रकार परिषदेत या मोबाईल ॲपविषयी सादरीकरणाव्दारे माहिती दिली. सप्लाय बेस सर्व्हिस कडून डिमांड बेस सर्व्हिस देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात असून केवळ दीड महिन्यांच्या कालावधीत आय.आय.टी.एस. (Intelligent Intigrated Transport System) या प्रणालीवर आधारीत हा प्रकल्प कार्यान्वित करणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका असल्याचे त्यांनी सांगितले. जास्तीत जास्त नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करून या ॲपच्या वापराव्दारे आपल्या प्रवासाचे नियोजन करावे व आपला वेळ वाचवावा तसेच या ॲपमधील विशेष एस.एम.एस. सेवेव्दारे सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन केले.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत NMMC e-connect हे मोबाईल ॲप कार्यान्वित असून त्यावर कर भरणा करण्यासोबतच विविध दाखले, प्रमाणपत्रे, परवाने अशा 21 प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या सेवांमध्येच आणखी वाढ करत सध्या महानगरपालिकेशी संबंधीत 31 सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून NMMC e-connect या मोबाईल ॲपवर NMMT Bus Tracker ची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे ज्यांनी या पूर्वीच NMMC e-connect हे मोबाईल ॲप डाऊनलोड केले असेल, ते फक्त अपडेट केल्यावर ही सुविधा उपलब्ध होईल अशी माहिती महापालिका आयुक्तांनी यावेळी दिली.
या ॲपच्या माध्यमातून एन.एम.एम.टी प्रवाशांचा प्रवास विनासायास सुलभ होणार आहे. या ॲपव्दारे प्रवाशांना जवळचा बस थांबा कोठे याची माहिती उपलब्ध होणार असून ज्या ठिकाणाहून बसप्रवास सुरु करावयाचा आहे त्या ठिकाणाहून कोणत्या बस कुठे जातात याची माहिती तसेच कोणती बस किती वेळानंतर त्या बस स्टॉपवर येईल याची माहिती एका क्लिकमध्ये कळणार आहे. यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन करणे सोयीचे होणार असून त्यामुळे त्यांना आपल्या वेळेचेही नियोजन सहज करता येईल.
त्याचप्रमाणे हे ॲप प्रवाशांना Multimodal Transport (रेल्वे, मेट्रो, बस) चा वापर करण्यास उपयुक्त ठरणार आहे. बसचे वेळापत्रक व बस थांब्यावर येणारी बस कोणत्या बस थांब्यावर आहे याची माहितीही या ॲपव्दारे उपलब्ध होणार आहे. या अनुषंगाने सर्व बस स्थानकांवर 81 ठिकाणी एल.इ.डी. डिस्प्ले लावण्यात येणार असून त्यामुळे प्रवाशांना बस थांब्यांवर बसच्या येण्याच्या वेळेची माहिती उपलब्ध होणार आहे. लवकरच प्रवासाकरीता डिजीटल टिकीटिंग आणि स्मार्ट कार्डचा वापर करण्याची सुविधा या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले.
सद्यस्थितीत 445 एन.एम.एम.टी. बसेस प्रवासी सेवा पुरवित असून लवकरच ही संख्या 500 बसेसपर्यंत नेण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. सप्लाय बेस सर्व्हिस कडून डिमांड बेस सर्व्हिस देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केले जात असून केवळ दीड महिन्यांच्या कालावधीत आय.आय.टी.एस. (Intelligent Intigrated Transport System) प्रकल्प कार्यान्वित करणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका ते म्हणाले. याव्दारे दर्जात्मक सेवेला प्राधान्य दिले जात असून या प्रणालीतील ‘एन्ड टू एन्ड सोल्युशन’ आणि लोकोपयोगी ‘फिचर्स’ अशाप्रकारच्या इतर प्रणालींपेक्षा वेगळे व देशात अभिनव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ही आय.आय.टी.एस. (Intelligent Intigrated Transport System) प्रणाली प्रभावीपणे राबविण्याकरीता सी.बी.डी. बेलापूर येथील बेलापूर भवनात आठव्या मजल्यावर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत असून या ठिकाणाहून बसेसचे प्रवासी मार्ग, त्यांचा वेग, त्यांची स्थानके अशा सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बसेस संचलन नियोजनबध्द करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. यामुळे बसेसच्या कार्यक्षमतेचा पुरेपुर वापर करता येणार असून परिवहन उपक्रमाच्या कामकाजात पारदर्शकता येणार आहे व आपत्कालीन व्यवस्थापन व नियोजन करता येणार आहे. याव्दारे उपक्रमाच्या सेवेचा दर्जा निश्चित उंचावेल असा विश्वास महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.
NMMT Bus Tracker या ॲपव्दारे एन.एम.एम.टी. बस प्रवाशांना आपल्या हातातील मोबाईलवरून स्वत:च्या प्रवासाचे नियोजन करता येणे शक्य होईल आणि त्यांना वाट पहावी लागणार नाही व वेळेतही मोठ्या प्रमाणावर बचत होईल असे सांगत महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी जास्तीत जास्त प्रवाशांनी हे ॲप डाऊनलोड करून आपला प्रवास सुखकर व नियोजनबध्द आणि सुरक्षित करावा असे आवाहन केले.