मुंबई : पालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी दोन, तर काँग्रेसच्या वाटय़ाला एक नामनिर्देशित नगरसेवकपद आले आहे. नामनिर्देशित नगरसेवकपदी वर्णी लावून पालिकेमध्ये चंचुप्रवेश मिळविण्यासाठी निवडणुकीत पराभूत झालेल्या आणि नेते मंडळींची हुजरेगिरी करणाऱ्या काही मंडळींनी प्रयत्न सुरू केले आहेत. पालिकेत सत्ता स्थापन होण्यापूर्वीच नामनिर्देशित नगरसेवकपदासाठी सुरू झालेल्या स्पर्धेमुळे सर्वच पक्षातील नेते हैराण झाले आहेत.
पालिका निवडणुकीत शिवसेनेचे ८४, भाजपचे ८२, तर काँग्रेसचे ३१ नगरसेवक विजयी झाले आहेत. या संख्याबळानुसार शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी दोन नामनिर्देशित नगरसेवकांची पालिकेत नियुक्ती करता येणार आहे. तर काँग्रेसच्या खात्यातही एक नामनिर्देशित नगरसेवक पद पडले आहे. पालिकेमध्ये महापौर पदाची निवडणूक पार पडल्यानंतर नामनिर्देशित नगरसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नामनिर्देशित नगरसेवकांना मतदानाचा हक्क नसला तरी मिळणाऱ्या नगरसेवक निधीतून मुंबईमधील कोणत्याही विभागात विकास कामे करता येतात. तसेच पालिका सभागृहात विविध प्रश्न मांडून धासासही लावता येतात.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस पक्षातील बहुतांश सर्वच दिग्गज विद्यमान नगरसेवकांना पराभव पत्करावा लागला. त्यात स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, तृष्णा विश्वासराव, अनुराधा पेडणेकर, माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, सुरेंद्र बागलकर, विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा, शीतल म्हात्रे, रितू तावडे, विनोद शेलार आदी दिग्गजांचा समावेश आहे. पालिका निवडणुकीत निवडून येण्याची शक्यता नसलेले, परंतु नगरसेवक होण्याची इच्छा असलेले अनेक कार्यकर्ते शिवसेना, भाजप आणि काँग्रेसमध्ये आहेत. या मंडळींनी नामनिर्देशित नगरसेवकपदावर आपली वर्णी लागावी यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये नेत्यांच्या जवळच्या काही समर्थकांचाही समावेश आहे. आपली वर्णी पालिकेत लागावी म्हणून या इच्छुकांनी नेते मंडळींकडे खेटे घालण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही, शिवसेनेला काँग्रेस पाठींबा देणार की नाही, महापौर निवडणुकीत कोणाचा विजय होणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पालिकेत आपला महापौर विजयी व्हावा यासाठी शिवसेना आणि भाजप संख्याबळाच्या गणिताची जुळवाजुळव करीत आहेत. तर काँग्रेसने विरोधी पक्षांची मोट बांधून महापौर पदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर पदाच्या निवडणुकीपर्यंत विविध घडामोडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांतील नेते मंडळींचे निवडून आलेल्या नगरसेवकांवर बारीक लक्ष आहे. असे असताना शिवसेना आणि भाजपला मिळणारी प्रत्येकी दोन, तर काँग्रेसला मिळणाऱ्या एका नामनिर्देशित नगरसेवक पदासाठी पराभूत उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
‘अभ्यासू नगरसेवकाचा शोध’
निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये अभ्यासू नगरसेवकांची संख्या कमी आहे. शिवसेना आणि भाजपची युती होऊ शकली नाही, तर सत्तास्थानी बसणाऱ्या राजकीय पक्षाला विरोधकांचा विरोध मोडून काढण्यासाठी अभ्यासू आणि उत्तम वक्ता असलेल्या नगरसेवकाची गरज भासणार आहे. त्यामुळे नामनिर्देशित नगरसेवकपदी अशा एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करता येईल का याची चाचपणी राजकीय पक्षांकडून सुरू झाली आहे. मात्र पालिकेत चंचुप्रवेश मिळविण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी ‘नामनिर्देशित नगरसेवक’ पदाचा मंत्र जपत आपल्या नेते मंडळींना हैराण करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नामनिर्देशित नगरसेवकपदावरील नियुक्ती शिवसेना, भाजप आणि काँग्रेससाठी डोकेदुखी बनण्याची शक्यता आहे.