रायगड जिल्हा परिषदेसाठी पनवेल तालुक्यात झालेल्या मतदानात शेकापने दोन्ही ठिकाणी आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ८ जागांपैकी शेकापने ६ खिशात घातल्या असून भाजपला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. पंचायत समितीच्या १६ जागांवर भाजपने शेकापला चांगलीच टक्कर दिली असून ६ जागांवर विजय मिळवला आहे, तर शेकापला ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या दोन पक्षांतील संघर्षांत काँग्रेसने तीन जागा खिशात टाकत आपले महत्त्व अधोरेखित केले आहे. शिवाय पंचायत समितीमध्ये तीन जागांच्या बळावर काँग्रेस निर्णायक ठरणार आहे. शेकाप काँग्रेसला जवळ करणार आहे. राज्यातील कानाकोपऱ्यात कितीही स्थित्यंतरे झाली तरी रायगड जिल्हा म्हणजे शेकापचा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र त्याला आता सुरुंग लागल्याचे चित्र आहे. कधीकाळी शेकापमध्ये असलेले ठाकूर कुटुंब प्रथम काँग्रेस नंतर भाजपमध्ये डेरेदाखल झाल्याने रायगडमधील शेकापच्या कार्यकर्त्यांचा कल भाजपकडे वळू लागला आहे. त्यामुळे जिल्हा व पंचायत समितीत आता शेकापला भाजपच्या रूपात चांगला प्रतिस्पर्धी मिळाला आहे.
भविष्यात पक्ष निदान रायगडपुरता तरी राखून ठेवण्याची मोठी जबाबदारी शेकापच्या नेतृत्वावर आहे. भाजपचा चंचूप्रवेश होऊ लागला असून, पनवेल महापालिकेच्या निमित्ताने या पक्षाचा खरा कस लागणार आहे. पनवेलमधील शहरी व ग्रामीण भागाचे राजकरण पूर्णपणे वेगळे असले तरी उलव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊनही गव्हाण जिल्हा परिषद भाजपला खेचून आणता आली नाही. रामशेठ ठाकूर यांची बहीण रत्नप्रभा घरत यांचा गव्हाणमध्ये निसटता विजय झाला. तो ठाकूर कुटुंबीयांना भूषणावह नाही. त्यामुळे येत्या काही महिन्यांत होणाऱ्या पालिका निवडणुकीत भाजपने मतदारांना गृहीत धरून चालणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. पनवेलमधील राजकारण हे शेकाप व भाजपमध्ये सुरू असले तरी त्याला पाटील व ठाकूर कुटुंबाच्या संघर्षांची किनार आहे. त्यामुळे पक्ष कोणताही असो पाटील व ठाकूर कुटुंबांचा या निवडणुकीत कस लागला हे निश्चित!