सुजित शिंदे
नवी मुंबई : नवी मुंबईची ओळख दोनशेच्या आसपास उद्याने व हरित पट्टयांमुळे ‘गार्डन सिटी’ अशीही करून दिली जात असून यामध्ये वृक्षप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांचे मोठे योगदान असल्याचे सांगत नवी मुंबईचे महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणामार्फत मागील दशकापासून सातत्याने आयोजित केल्या जाणा-या झाडे, फुले, फळे प्रदर्शनामुळे येथील नागरिकांमध्ये वृक्षांविषयी आवड निर्माण झाली आहे व याचा परिणाम नवी मुंबईतील वृक्षांच्या संख्यावाढीत झाला असल्याचे मत व्यक्त केले. आगामी काळात विशिष्ट रंगांची फुले येणारी झाडे सलग रितीने एखाद्या रस्त्यास लावल्यास पिंक रोड, यलो रोड, रेड रोड असे आकर्षक फुल झाडांनी सजलेले रस्ते नवी मुंबईत निर्माण करून नवी मुंबई शहराच्या सौंदर्यात भर घालण्याची संकल्पना त्यांनी मांडली.
नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वंडर्स पार्क नेरूळ येथे 3 ते 5 मार्च 2017 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 11 व्या झाडे, फुले, फळे, भाजीपाला यांचे प्रदर्शन आणि उद्यान स्पर्धा उद्घाटन प्रसंगी त्यांनी आपल्या भावना प्रकट केल्या. उद्घाटनप्रसंगी महापौर महोदयांसमवेत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, सभागृह नेता श्री. जयवंत सुतार, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती श्री. लिलाधर नाईक, आरोग्य समिती सभापती श्रीम. सलुजा सुतार, नगरसेवक सर्वश्री रविंद्र इथापे, डॉ. जयाजी नाथ, श्री. देविदास हांडे पाटील, श्री. सुनिल पाटील, श्री.एम.के.मढवी, श्रीम. उषा पाटील, अतिरिक्त आयुक्त शहर श्री. अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त सेवा श्री. रमेश चव्हाण, प्रशासन विभागाचे उप आयुक्त डॉ. सुहास शिंदे, वृक्ष प्राधिकरण सचिव तथा उद्यान उप आयुक्त श्री. तुषार पवार, परिमंडळ 1 चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, शिक्षणाधिकारी श्री. संदिप संगवे, पर्यावरण तज्ज्ञ तथा परीक्षक समिती प्रमुख श्री. व्ही.ए.रोडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दरवर्षी नवी मुंबई महानगरपालिका आयोजित करीत असलेल्या या प्रदर्शनामुळे नागरिकांना एक चांगली संधी उपलब्ध होते असे सांगत या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच यामुळे विद्यार्थी आणि मुलांमध्ये वृक्षांविषयी प्रेम वाढीस लागते आणि पर्यावरणशील नवी पिढी तयार होते असे मत मांडले.
अतिरिक्त आयुक्त श्री. रमेश चव्हाण यांनी या प्रदर्शनाच्या आयोजनातून पर्यावरण पुरक शहर निर्माण करण्याचा व त्यादृष्टीने लोकांची मनोभूमिका तयार करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न असल्याचे सांगत याठिकाणी निसर्गातील झाडे, फुले, फळे, भाजीपाला यांचे विविध प्रकार एकाच छताखाली अनुभवायला मिळतील त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांसह जरूर या प्रदर्शनाला भेट द्यावी व स्वत:सह नव्या पिढीच्या मनात निसर्गाविषयी आवड वाढवावी असे मत व्यक्त केले.
आज 3 तारखेपासून रविवारी 5 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सेक्टर 19 येथील नवी मुंबईचे आकर्षण केंद्र असलेल्या वंडर्स पार्क याठिकाणी संपन्न होत असून या 3 दिवसात प्रदर्शनाला भेट देणा-या नागरिकांना वंडर्स पार्कमध्ये विनामुल्य प्रवेश आहे. या प्रदर्शनाच्या अनुषंगाने विविध स्पर्धा घेण्यात येणार असून त्यांचा पारितोषिक वितरण सोहळा 5 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वा. महापौर श्री. सुधाकर सोनवणे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या प्रदर्शन / स्पर्धेमध्ये सुर्यप्रकाशात वाढणारी कुंड्यांमधील बहुवर्षीय फुलझाडे, सावलीत वाढणारी कुंड्यांमधील बहुवर्षीय फुलझाडे, कुंड्यांमध्ये वाढविलेल्या फळभाज्या व फळझाडे, भाजीपाला फळभाज्या शेंगभाज्या मुळभाज्या, फळ फळावळ, कुंड्या व परड्यांमधील हंगामी फुलझाडे, कुंड्यांतील फुलझाडे, कुड्यांमधील शोभिवंत पानांची झाडे झुडपे, कुंड्यांमधील सुगंधीत व औषधी उपयुक्त वनस्पती, विविध प्रकारचे गुलाब, दांडीसह मोसमी फुले, दांडीसह वार्षिक फुले, निवडुंग मदवृक्ष व अननस वर्गीय वनस्पती, आमरी (ऑर्कीड), नेचे, झुलत्या झाडांच्या परड्या, वामनवृक्ष (बोन्साय), भाज्या फळे फुले यांच्या कलात्मक रचना, निसर्ग व पर्यावरणावर आधारीत चित्रे, उद्यानाची प्रतिकृती, खास विद्यार्थ्यांसाठी पाने, फळे, फुले, भाजीपाला यांची ओळख स्पर्धा, बाग स्पर्धा तसेच स्टॉल्स असे 24 विभाग असून या प्रदर्शनात एकाच छताखाली वृक्षप्रेमी नागरिकांना निसर्गातील वैविध्य बघण्याची व स्पर्धांतून स्वत:चे नैसर्गिक कलागुण सिध्द करणयाची आणि त्यामधून निसर्गाशी जवळीक साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
तरी रविवारपर्यंत 3 दिवस चालणा-या या झाडे, फुले, फळे, व भाजीपाला प्रदर्शनाला नागरिकांनी तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भेट देऊन निसर्गातील विविधतेचा एकाच ठिकाणी अनुभव घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येत आहे.