सुजित शिंदे
नवी मुंबई : महाराष्ट्रातील पारंपारिक खेळ म्हणून कुस्तीला लोकप्रियता व लोकमान्यता आहे. अगदी नवी मुंबई या आधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणा-या शहरातही अनेक उदयोन्मुख कुस्तीगीर आपल्या कुस्ती खेळाचे कसब पणाला लावताना दिसतात. अशा नवी मुंबईतील व महाराष्ट्र राज्यातील कुस्तीगीरांना प्रोत्साहन मिळावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका दरवर्षी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा तालिम संघाच्या सहकार्याने नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करीत असते. याही वर्षी शनिवार दि. 4 व रविवार 5 मार्च रोजी रा.फ.नाईक विद्यालय, से.8, कोपरखैरणे येथे “नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा”संपन्न होत आहे.
शनिवार दि. 4 मार्च 2017 रोजी, सायं. 5.00 वा. नवी मुंबईचे महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांच्या शुभहस्ते या स्पर्धेचा शुभारंभ होणार असून सोमवार, दि. 5 मार्च 2017 रोजी, रात्री. 07.00 वा. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे. याप्रसंगी महापौर महोदयांसमवेत ठाणे लोकसभा सदस्य खा. श्री. राजन विचारे, ऐरोली विधानसभा सदस्य आ. श्री. संदीप नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आ. सौ. मंदा म्हात्रे, विधानपरिषद सदस्य आ. श्री.नरेंद्र पाटील, उपमहापौर श्री. अविनाश लाड, महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे, स्थायी समिती सभापती श्री. शिवराम पाटील, सभागृह नेते श्री. जयवंत सुतार, विरोधी पक्ष नेते श्री. विजय चौगुले आणि इतर महापालिका पदाधिकारी,नगरसेवक – नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेमध्ये राज्यातील दिग्गज व भारत देशाचे प्रतिनिधित्व करणारे नामांकीत कुस्तीपट्टू सहभागी होणार असून या माध्यमातून नवी मुंबईकर कुस्ती शौकिनांना नवी मुंबईतील उदयोन्मुख तसेच राष्ट्रीय स्तर गाजविणा-या नामवंत कुस्तीगीरांचा खेळ पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
ही स्पर्धा पुरूष व महिला अशा दोन्ही विभागात होणार आहे. पुरूष विभागात राज्यस्तरीय 3 वजनी गट, ठाणे व रायगड जिल्ह्याकरीता 2 वजनी गट तसेच नवी मुंबई परिसर मर्यादीत 2 वजनी गट त्याचप्रमाणे महिलांकरीता 1 विशेष वजनी गट अशा एकूण 8 वजनी गटांत स्पर्धा खेळवली जाणार आहे. सर्व वजनी गट मिळून प्रथम चार क्रमांकांना चषक, प्रशस्तिपत्र व एकूण 3 लक्ष 40 हजार रक्कमेची पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
कुस्तीप्रेमी रसिकांनी या स्पर्धेच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तर गाजविणा-या
महाराष्ट्रातील नामांकीत कुस्तीगीरांचा खेळ बघण्यासाठी तसेच नवी मुंबईतील होतकरू कुस्तीगीरांना प्रोत्साहीत करण्यासाठी रा.फ.नाईक विद्यालय, से.8, कोपरखैरणे येथे 4 व 5 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती श्री. लिलाधर नाईक व उप सभापती श्रीम. श्रध्दा गवस आणि समिती सदस्यांच्या वतीने करण्यात येत आहे.