सर्वार्थाने लोकाभिमुख असल्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे प्रतिपादन
सुजित शिंदे
नवी मुंबई : नागरिकांच्या शहराविषयी असलेल्या संकल्पना व सूचना ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाच्या माध्यमातून थेट समजून घेता येतात. त्यामधील वैशिष्ट्यपूर्ण व शहरासाठी लाभदायक सूचनांचा अंतर्भाव आगामी सन 2017-18 वर्षाच्या अर्थसंकल्पात करण्यात आला असून हा अर्थसंकल्प ख-या अर्थाने लोकाभिमुख आहे असे सांगत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी नागरिकांच्या हाती शहराचे भविष्य आहे त्यामुळे सामाजिक दायित्व लक्षात घेऊन नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता होणार नाही याची दक्षता घ्यावी, योग्य ठिकाणी पार्किंग करावे, पार्किंगच्या नियमांचे पालन करावे, प्लास्टिकचा वापर टाळावा, ओला व सुक्या कच-याचे घरापासूनच वर्गीकरण करावे अशा छोट्या छोट्या गोष्टीतून ख-या अर्थाने नवी मुंबई 21 व्या शतकातील शहर साकारण्यासाठी संपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन केले. पामबीच मार्गाजवळील वझिराणी स्पोर्टस् क्लब जवळील चौकात संपन्न झालेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी जनतेशी सुसंवाद साधताना आयुक्तांनी विशेषत्वाने भेडसावणारा पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करीत जेवढी जागा कायदेशीररित्या ग्राह्य आहे तेवढीच वाहने नागरिकांकडे असावीत असे सांगितले. रस्त्यांवरील फेरीवाल्यांमुळे नागरिकांना होणा-या अडचणी दूर करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत धडक कारवाया करण्यात येत आहेत. यामध्ये नागरिकांनी फेरीवाल्यांकडून खरेदी करणेच थांबविले तर आपोआप फेरीवाले कमी होतील. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांचीही संपूर्ण साथ हवी असे आवाहन त्यांनी केले.
नवी मुंबईत मागील सहा महिन्यांपासून स्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे आणि आपण अधिक चांगल्या स्वच्छ व सुंदर शहराकडे वाटचाल करीत आहोत. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी महानगरपालिका पार पाडीत आहे मात्र यामध्ये शहरात घाण होणार नाही याची काळजी नागरिकांनी घेतल्यास स्वच्छतेच्या दृष्टीने अधिक गतीमान व चांगले परिणाम दिसून येतील असे ते म्हणाले. शहर स्वच्छतेमुळे आपल्या आरोग्यावरही चांगला परिणाम होईल असे सांगत ठिकठिकाणी सार्वजनिक व सामुदायिक शौचालये मोठ्या प्रमाणावर बनवून आपण हागणदारीमुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात आणत असून आता पामबीच रोडवरही ठिकठिकाणी इ-टॉयलेटची सुविधा कऱण्यात आलेली आहे. यापुढील काळात उद्यानातही इ-टॉयलेट सुविधा दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्लास्टिक हजारहून अधिक वर्षे नष्ट होत नसल्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा आणि मानवी जीवनाचा प्लास्टिक हा सर्वात मोठा शत्रू आहे हे लक्षात घेऊन प्रत्यकाने स्वत:च्या जीवनातूनप्लास्टिक हद्दपार केले पाहिजे असे सांगत आयुक्तांनी’प्लास्टिकमुक्त नवी मुंबई’ ही संकल्पना आपल्याच हिताची आहे याचे भान ठेवून प्रत्येक माणसाने प्लास्टिकचा वापर टाळावा असे आवाहन केले.
इमारतींवरील वेदरशेडची परवानगी नियमानुसार पावसाळी कालावधीपुरती देण्यात येते. मात्र अनेक इमारतींवर वर्षोनुवर्षे इमारतीच्या लिकेजला पर्याय असे कारण दाखवित वेदरशेड टाकण्यात आल्या असल्याचे दिसून येते. लिकेजला वेदरशेड हा पर्याय नाही हे लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्या इमारतींवरील वेदरशेड स्वत:हून काढून टाकाव्यात व पावसाळ्यापूर्वी आगामी तीन महिन्याच्या कालावधीत इमारतींच्या लिकेजेसची योग्य पध्दतीने दुरुस्ती करून घ्यावी असेही आवाहन त्यांनी केले.
नागरिकांना महानगरपालिकेशी संबंधीत कामांसाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज भासू नये याकरीता महापालिकेने nmmc e-connect हे मोबाईल ॲप विकसित केले असून यावरून नागरिक महानगरपालिकेचे कर भरू शकतात तसेच जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी तसेच विविध परवाने, परवानगी, प्रमाणपत्रे, दाखले अशा 31 प्रकारच्या सुविधा नागरिकांसाठी एका क्लिकवर उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे यावरील ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली (Public Grieavance system) व्दारेनागरिक महानगरपालिकेशी संबंधीत कोणत्याही स्वरुपाची तक्रार छायाचित्रासह दाखल करू शकतात. या प्रणालीचे वैशिष्ट्यम्हणजे तक्रारीशी संबंधीत विभाग माहित नसेल तरी तक्रार योग्य विभागाकडे जाऊन त्यावर झालेली कार्यवाही नागरिकांनातपासता येते तसेच त्यावरील कार्यवाहीची माहिती नागरिकांना दिली जाते.
या ॲपमध्ये आता NMMT Tracker ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून याव्दारे नागरिकांना NMMTबसव्दारे प्रवास करावयाचा असेल तर जवळचा बस थांबा कोठे आहे तसेच ज्या ठिकाणाहून बसप्रवास सुरु करावयाचा आहे त्या ठिकाणाहून कोणत्या बस कुठे जातात याची माहिती आणि कोणती बस किती वेळानंतर त्या बस स्टॉपवर येईल याचीही माहिती एका क्लिकमध्ये कळणार आहे. यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन करणे सोयीचे होणार असून त्यामुळे त्यांना आपल्या वेळेचेही नियोजन सहज करता येईल. त्याचप्रमाणे बसमधून या ॲपव्दारे ते आपल्या कुटुंबियांना, मित्रांना आपण करीत असलेल्या बस प्रवासाची माहिती एस.एम.एस. व्दारे पाठवू शकत असल्याने हा बस प्रवास सुलभ व सुरक्षित होणार आहे.
nmmc e-connect हे ॲप इतक्या मोठ्या प्रमाणावर सोयी सुविधा उपलब्ध करून देणारे एकमेव ॲप असून देशातील सर्वोत्तम ॲप असल्याचे महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट करीत नागरिकांनी या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.