मुंबई महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर भाजप-शिवसेना यांच्यात जोरदार सत्तासंघर्ष सुरू होता. महापौर कोणत्या पक्षाचा असेल, याबाबत दोन्ही पक्षांमध्ये जोर बैठका सुरू होत्या. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आज, शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस होता. शिवसेनेने आपल्या उमेदवारांची नावे जाहीरही केली होती. भाजप महापौरपदासाठी उमेदवार देणार का, याबाबत कमालीची उत्सुकता होती. पण संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक भाजप लढणार नाही, असे जाहीर केले. याशिवाय स्थायी, बेस्टसह कोणत्याही समितीची निवडणूक लढणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप गरज पडल्यास शिवसेनेला मतदान करू. शिवसेनेशिवाय इतर कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाला लेखाजोखा मांडला. राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. राज्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. जवळपास १ कोटी २० लाख ११ हजार ५९७ मते मिळाली आहेत. विधानसभेचा विचार केल्यास जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकांमध्ये अधिक मतदान भाजपला मिळाले आहे. लोकांनी भाजपवर प्रचंड विश्वास दाखवल्याचे यातून दिसते. राज्यातील जनतेने भाजपला क्रमांक एकचा पक्ष केला आहे. त्याबद्दल जनतेचे आभार मानतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. देशात मोदींनी पारदर्शकता आणि विकासाचा अजेंडा राबवला आहे. त्याला देशासह महाराष्ट्रातील जनतेने पाठिंबा दिला आहे. राज्यात आमच्यावर विश्वास ठेवला आहे, असेही त्यांनी सांगितले. मुंबई महापालिकेची निवडणूक पारदर्शकतेच्या मुद्द्यावर लढवली. मुंबईकरांमुळे प्रचंड मोठे यश आम्हाला मिळाले आहे. मागील वेळी ३१ जागा जिंकल्या होत्या. यावेळी ८२ जागा जिंकल्या. मुंबईच्या जनतेने पारदर्शकतेला कौल दिला. पालिकेत बहुमतासाठी ११४ जागा हव्या होत्या. पण कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. शिवसेनेला ८४ आणि भाजपला ८२ जागा जिंकता आल्या. खरेतर दोन्ही पक्षांनाही कौल सारखाच मिळाला आहे. पण शिवसेनेला दोन जागा अधिक मिळाल्या. भाजपच्या कोअर कमिटीने सध्याच्या परिस्थितीवर विचार केला. आठ महापालिकांमध्ये भाजपचा महापौर बसणार आहे. मुंबई महापौरपदासाठी दावा करणार आहोत की नाही, यावरही बैठकीत चर्चा झाली. त्यात बहुमत नसल्यामुळे कोणत्या तरी एका पक्षाची मदत घ्यावी लागणार होती. तसे संकेत मिळत होते. त्यावर कोअर कमिटीने विचार केला. मुंबईच्या जनतेने पारदर्शकतेला कौल दिला आहे. त्यांचा अनादर करणार नाही. त्यामुळे मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक लढणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. याशिवाय स्थायी, बेस्टसह इतर समित्या आणि प्रभागांची निवडणूक लढणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले. पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून आम्ही महापालिकेत जबाबदारी पार पाडणार आहोत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पारदर्शकतेला प्राधान्य असेल. मुंबईसाठी स्वतंत्र उपलोकायुक्त नेमणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.