ठाणे : महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमताचा आकडा गाठणाऱ्या शिवसेनेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द प्रमाण मानत मानपाडा परिसरातून सलग तीन वेळा निवडून आलेल्या मीनाक्षी शिंदे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ टाकण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. उपमहापौरपदाचे उमेदवार म्हणून दिव्यातील ज्येष्ठ नगरसेवक रमाकांत मढवी यांची निवड करण्यात आली आहे. हे दोघेही कट्टर शिंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. स्पष्ट बहुमताचा आकडा गाठताच ठाण्यातील काही नेत्यांनी आपल्या नातेवाईकांची या पदासाठी वर्णी लागावी यासाठी मातोश्रीवर मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र, ‘मातोश्री’वरूनही घराणेशाहीऐवजी ‘शिंदेशाही’लाच प्राधान्य देण्यात आले.
राज्यभर भाजपला मोठा विजय मिळत असताना ठाण्यात मात्र शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली. ठाणे महापालिकेवर गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता राहिली आहे. मात्र, महापालिकेच्या इतिहासात प्रथमच या पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला आहे. या विजयात पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या तब्बल २८ नगरसेवकांचा वाटा मोठा राहिला आहे. त्यामुळे िशदे कृपेवर ठाण्याचा महापौर ठरेल अशी शक्यता अगदी सुरुवातीपासूनच व्यक्त केली जात होती. तरीही या स्पर्धेत पक्षातील काही बडे नेते उतरल्याने महापौरपदाबाबत उत्सुकता होती.
ठाण्याचे यंदाचे महापौरपद महिलांसाठी राखीव झाले आहे. त्यातच अनेक नेतेमंडळींच्या कुटुंबातील महिला यंदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याने महापौर पदाची पक्षांतर्गत चुरस वाढली होती. या स्पर्धेत नंदिनी राजन विचारे, जयश्री रवींद्र फाटक आणि परिषा प्रताप सरनाईक यांची नावे पुढे आल्याने पुन्हा एकदा घराणेशाहीची चर्चा सुरू झाली होती. यापैकी परिषा सरनाईक यांनी हक्काचा प्रभाग सोडून सुधाकर चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात उडी घेत विजय खेचून आणला होता. तसेच नव्या ठाण्याचा एक भाग असलेल्या या प्रभागात विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले मताधिक्य होते. त्यामुळे घराणेशाहीपेक्षा परिषा यांचा विजय अधिक संघर्षमय होता, असा दावा त्यांचे समर्थक करत होते. परंतु, एकनाथ शिंदे यांनी आपल्या कट्टर समर्थक मीनाक्षी शिंदे यांच्या बाजूने कौल दिला.
महापौर आणि उपमहापौर अशा दोन्ही पदांसाठी एकनाथ शिंदे यांनी सुचविलेल्या नावांना मातोश्रीने हिरवा कंदील दाखविला असून ठाण्यात शिंदे यांच्या नेतृत्वावर यानिमित्ताने मातोश्रीने पुन्हा शिक्कामोर्तब केले आहे.