सुजित शिंदे
नवी मुंबई : नवी मुंबईत विविध खेळांप्रमाणे कुस्तीचेही आकर्षण युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असून स्थानिक कुस्तीगीरांना आपल्यातील क्रीडागुण प्रदर्शित करण्याची संधी मिळावी तसेच राज्यातील नामांकीत कुस्तीगीरांचा खेळ बघून त्यामधून त्यांना बरेच काही शिकता यावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी महापौर चषकांतर्गत राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून यावर्षीही स्पर्धेला खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचा मिळालेला मोठा प्रमाणावरील प्रतिसाद बघता आयोजनाबद्दल समाधान वाटते असे मत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती श्री. लिलाधर नाईक यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयाच्या क्रीडांगणात उभारण्यात आलेल्या आधुनिक मॅट स्वरूपातील आखाड्यावर खेळविण्यात येत असलेल्या दोन दिवसीय ‘नवीमुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धे’ च्या उद्घाटन समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीतहोते. यावेळी व्यासपिठावर समाजकल्याण समिती सभापती श्री. रमेश डोळे, नगरसेवक सर्वश्री. देविदास हांडेपाटील, शंकर मोरे, सुनिल पाटील, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, महाराष्ट्र राज्य तालीम संघाचे खजिनदार श्री. सुरेशदादा पाटील, कल्याण कुस्तागीर असोसिएशनचे सचिव श्री. पंढरीनाथ ढोणे, नवी मुंबई तालीम संघाचे पदाधिकारी श्री. शिरगावकर व श्री.कृष्णा रासकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
ही स्पर्धा पुरूष व महिला अशा दोन गटांमध्ये होत असून पुरूष गटात राज्यस्तरीय 3 वजनी गट असणार आहेत. यामध्ये राज्यस्तरीय महापौर चषक विजेत्यास एक लाख रूपयांचे पारितोषिक व मानाची गदा प्रदान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ठाणे व रायगड जिल्ह्याकरीता 2 वजनी गट तसेच नवी मुंबई परिसर मर्यादीत 2 वजनी गट असणार आहेत. सध्या महिला कुस्तीगीरही मोठ्या प्रमाणावर कुस्ती खेळामध्ये कर्तबगारी गाजवित आहेत हे लक्षात घेऊन या स्पर्धेत महिलांकरीता 1 विशेष वजनी गट समाविष्ट आहे.
अशाप्रकारे एकूण 8 वजनी गटांत स्पर्धा खेळवली जाणार असून सर्व वजनी गटातील प्रथम चार क्रमांकांना चषक, प्रशस्तिपत्र तसेच एकूण 3 लक्ष 40 हजार रक्कमेची पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. रविवारी 5 मार्चला अंतिम लढतीनंतर सायं. 7 वा. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील भारत देशाचे प्रतिनिधित्व करणारे नामांकीत कुस्तीपट्टू सहभागी झाले असून नवी मुंबईकर कुस्ती शौकिनांना नवी मुंबईतील उदयोन्मुख कुस्तीगीरांसमवेत देशभर गाजणा-या राज्यातील दिग्गज कुस्तीगीरांचा खेळ अनुभवता येणार आहे.
तरी या संधीचा फायदा घेऊन कुस्तीशौकिनांनी राज्यातील नामवंत कुस्तीगीरांचा खेळ बघून त्यांचे कौतुक करण्यासाठी तसेच नवी मुंबईतील होतकरू कुस्तीगीरांना प्रोत्साहित करण्यासाठी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.