साईनाथ भोईर
नवी मुंबई : सानपाडा येथील माध्यमिक विद्यालय विवेकानंद संकुल माजी विद्यार्थी महासंघ आणि सानपाडा युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सानपाडा येथे सामाजिक कार्यकर्ते कै.सुबोध गडेकर यांची शनिवारी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. अतिशय शोकाकुल वातावरणात हि शोकसभा पार पडली.यावेळी सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज पाडवी, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे,शिवसेनेचे उपविभाग प्रमुख रामचंद्र पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सानपाडा प्रभाग क्रमांक 74 चे वॉर्ड अध्यक्ष राजेश ठाकूर,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नवी मुंबई जिल्हा सचिव गणेश पालवे,मोहित बिलापट्टे,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नवी मुंबई शहर सचिव निखिल गावडे,भारतीय विद्यार्थी सेना नवी मुंबई उपशहर संघटक अमोल सावंत,रविराज गव्हाणे,गणपत वाफारे,भिवसेन पिंगळे,चेतन खैरनार,ज्येष्ठ नागरिक,शाळेतील शिक्षक वृंद,माजी विद्यार्थी व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुबोध गडेकर यांच्या समाज कार्याचे कौतुक करत शोकसभेसाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सुबोधच्या निधनावर शोक व्यक्त केला.त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षक वृंद,माजी विद्यार्थी व मित्र परिवारांनी सुबोधच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सुबोध विषयी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी सर्वांच्याच अश्रूंचा बांध फुटला.दोन मिनिटे जागेवर शांत उभे राहुन सुबोध गडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सुबोध गडेकर यांचे वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात उपचार घेत असताना अल्पशा आजाराने दि.26 फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले होते.सुबोध गडेकर हे माध्यमिक विद्यालय विवेकानंद संकुल माजी विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष व सानपाडा युथ फाउंडेशनचे संस्थापक खजिनदार होते.सामाजिक प्रश्नांची जाण असणारे सुबोध गडेकर हे एक संवेदनशील व्यक्तिमत्व होते.तळागाळातील लोकांशी सुबोध गडेकर यांचा दांडगा संपर्क होता.दिवाळी पहाट या उपक्रमांतर्गत दरवर्षी आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ,शालेय साहित्य,कपडे आदी वस्तूंचे वाटप,रक्तदान शिबिर यांसारख्या सामाजिक उपक्रमांतून सुबोध गडेकर यांनी लोकांची मने जिंकली होती.