ठाणे,: आठ निष्णात शिक्षकांचे पॅनेल समोर बसलेले, दुर्गा त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे तितक्याच आत्मविश्वासाने उत्तर देत होती. अवघ्या सव्विस वर्षाच्या या तरूणीने आपल्या आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर मुलाखत घेणारयांची मने जिंकली. अशिक्षित आई आणि चौथी पास वडीलांची ही कोकणीपाडयांतील लेक आज सर्व प्रतिकुलतेवर मात करत सिग्नल शाळेत शिक्षिका बनली. ‘ते आज पुलाखाली आहेत आणि मी कालपर्यंत कोकणीपाडयातील कुडाच्या घरात होते पण असे वाटते त्यांची आणि माझी परिस्थिती सारखीच होती. शिक म्हणून आमच्या आई,वडीलांनी प्रोत्साहन दिले. या मुलांमध्ये मला वीस वर्षांपुर्वीची दुर्गा दिसते माझ्यातील दुर्गा जशी सरस्वती बनु शकते तसेच पुलाखालील मुलं,मुली एक दिवस यशस्वी होतील’ असे करारीपणे सांगणारी दुर्गा आज सिग्नल शाळेतील मुलांना घडविण्याचे काम करीत आहे.
ठाण्यातील तीन हात नाका येथे सिग्नलवरील मुलांसाठी सिग्नलशाळा हा अभिनव उपक्रम राबविला जातो. सकाळी एक ते चार अशा वेळेत चालणारया या शाळेची वेळ मुलांनी शाळा सुटल्यांनतर पुन्हा भीक मागु नये व शाळेत सकाळच्या सत्रात झालेल्या अभ्यासाची उजळणी व्हावी म्हणून शाळेची वेळ आता सकाळी ११ ते ७ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. यासाठी नव्या चार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. सिग्नल शाळेच्या मुलांची पार्श्वभुमी लक्षात घेत त्यांना शिक्षक देखील तितकेच ध्येयवेढे लागणार होते. याच शोधात समर्थ भारत व्यासपीठाला दुर्गा गवसली.
कोकणीपाडयातील आजची स्थिती त्यामानाने बरी असली तरी दुर्गा जेव्हा तिचे प्राथमिक शिक्षक घेत होती त्यावेळी मुलींनी शिक्षण घेणे हे मोठे धाडसाचे होते. मात्र आपल्या अशिक्षित आई आणि चौथी पास वडीलांनी दुर्गाच्या पंखामध्ये बळ भरले. सहावी पर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ५० मध्ये शिक्षण घेतल्यांनतर उर्वरित शिक्षणासाठी रोजची ठाणे शहरापर्यंतची पायपीट दुर्गा करीत राहिली. हातात पैसा नसल्याने कोकणीपाडया लगतच्या खाजगी शाळामध्ये जाणे शक्य नसल्याने इयत्ता ७ ते १० पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या कन्याशाळेत तर बारावी पर्यंतचे शिक्षण न्यू गर्ल स्कुलमध्ये घेतले. मुलीच्या शिक्षणातील प्रगती पहाता घरातल्यांनी दुर्गाला माजीवडा महाविद्यालयात पदवीपर्यंत शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले. या दरम्यान दुर्गाने आपण शिक्षिका होऊन विद्यादान करायचे असा निश्चय केला. एैरोलीतील एका महाविद्यालयात तिने बीएड पुर्ण केले.
बीएड झाल्यानंतर तिने पहिला मोर्चा वळवला तो आपलेच शिक्षण झालेल्या ठाणे महानगरपालिकेतील शाळा क्रमांक ५० मधील अप्रगत मुलांना शिकविण्यासाठी, जवळपास एक व्रत म्हणून दुर्गा या अप्रगत मुलांना शिकविण्यासाठी जवळपास दोन वर्षे अविश्रांत प्रयत्न करीत होती. सिग्नल शाळेतील मुलांसाठी शिक्षकांची गरज लक्षात घेत दुर्गा मुलाखतीसाठी आली आणि आठ निष्णात पॅनेलने दुर्गाच्या मुलांप्रती असलेल्या आत्ममियतेमुळे, तिच्यातील आत्मविश्वास आणि संवेदनशिल पाहून दुर्गाची निवड केली. आज दुर्गा सकाळी आपल्या कोकणीपाडयातून थेट तीन हात नाक्याचा सिग्नल गाठते आणि आपल्या सारख्या आणखी दुर्गा तयार व्हाव्यात यासाठी परिश्रम घेत आहे.
अर्धवट शिक्षण सोडण्यारया मुलींचे प्रमाण एकीकडे वाढत असतांना दुर्गा सारख्या नेटाने प्रतिकुलतेशी लढणारया मुलींमळे कोकणीपाडयातील अनेक मुलींना पुढील शिक्षणाचे बळ मिळत आहे.