पेट्रोल आणि सीएनजी पंपांचे मालक आणि स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅसचे वितरक आयकर विभागाच्या रडारवर येणार आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतरचे व्यवहार संशयास्पद असल्याने आता आयकर विभागाकडून पेट्रोल आणि सीएनजी पंप मालकांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्यण जाहीर झाल्यानंतरच्या कालावधीत देशभरातील ५ हजार पेट्रोल पंपांकडून त्यांच्या याआधीच्या सरासरीपेक्षा २०% जास्त रक्कम बँकांमध्ये जमा केली. ही सर्वच्या सर्व रक्कम रद्द करण्यात आलेल्या पाचशे आणि हजारा रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे. नोटाबंदीनंतरच्या कालावधीत देशातील अनेक पेट्रोल पंपांच्या विक्रीत ‘अचानक’ वाढ झाली आहे. त्यामुळे यामध्ये काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आयकर विभागाला आहे.
मुंबई : ‘नोटाबंदीनंतरच्या कालावधीत अनेक पेट्रोल पंपांच्या बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा करण्यात आली. या रकमेचे प्रमाण मागील महिन्यांच्या तुलनेत जास्त आहे. याआधी पेट्रोल पंपांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बँकांमध्ये जमा केली गेली होती. त्यामुळे अचानक नोटाबंदीनंतर पेट्रोल पंपांवरील विक्रीत कशी वाढ झाली आहे, याची चौकशी करण्यात येईल. यामध्ये मोठे गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. चौकशीतून हे घोटाळे समोर आल्यास संबंधित पेट्रोल पंपांचा परवाना रद्द केला जाऊ शकतो,’ अशी माहिती आयक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
‘अर्थव्यवस्थेतील गैरकारभार शोधून काढण्याचा आणि त्यावर कारवाई करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे या प्रकरणांच्या मुळाशी जाण्यासाठी सखोल चौकशी केली जाईल. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये दोषी पेट्रोल पंप चालकांवर आणि गॅस वितरकांवर कारवाई करण्यात येईल,’ अशी माहिती आयकर विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.
‘पेट्रोल विक्री आणि त्या विक्रीतून येणारा पैसा यांचा मेळ चुकलेल्या पेट्रोल पंपांची संख्या मोठी आहे. विक्री आणि विक्रीतून मिळणारा पैसा यांचा ताळमेळ चुकलेल्या पेट्रोल पंपांचा नेमका आकडा किती आहे, याची माहिती आमच्याकडे आहे. त्यामुळे याबद्दल कठोर कारवाई केली जाईल,’ अशी माहिती आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा ८ नोव्हेंबरला चलनातून बाद केल्या. मात्र या नोटांचा वापर पेट्रोल, डिझेल आणि गॅससाठी खरेदी करण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली होती. यावेळी अनेकांनी त्यांच्याकडे असणाऱ्या बेहिशेबी पैशांचा वापर केला. पेट्रोल पंप आणि दागिन्यांच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा करण्यात आला.