नवी मुंबई : राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ५५ हजार घरांपैकी १५ हजार १५२ घरांच्या संकुलाचे बांधकाम सिडको लवकरच सुरू करणार आहे. हे बांधकाम सध्या व्हॅलिशिल्पसारख्या सिडकोच्या अनेक गृहप्रकल्पांचे काम करणाऱ्या बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. पहिल्या सहा महिन्यांत ही कंपनी या घरांचा आराखडा, रचना यांची जुळवणी करणार आहे. ही सर्व घरे ही अल्प व अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी आहेत.
नवी मुंबईत पाच वर्षांत ५५ हजार घरे सिडको बांधेल, असे राज्य शासनाने मागील अधिवेशनात जाहीर केले होते. पाच हजार घरांची उभारणी विविध प्रकल्पांद्वारे केल्यानंतर एकदाच १५ हजार १५२ घरांचा आराखडा सिडकोने तयार केला आहे. घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या सिडकोच्या नोडमध्ये ही घरे बांधली जाणार आहेत. त्यांची निविदा प्रक्रिया नुकतीच पार पडली. बी. जी. शिर्के या कंपनीला काम देण्यात आले आहे. ३६ महिन्यांत हा गृहप्रकल्प उभा राहणार असून पहिले सहा महिने बांधकाम कंपनी संरचना, आराखडा आणि इतर तयारी करेल. त्यानंतर या संकुलांच्या कामांना एकाच वेळी पाच ठिकाणी सुरुवात होईल. कामाला सुरुवात झाल्यानंतर विक्रीसाठी अर्ज प्रसिद्ध केले जातील. अल्प उत्पन्न गटासाठी ५ हजार ३२९ घरे आहेत तर अत्यल्प उत्पन्न गटासाठी ९ हजार ८२३ घरांची आखणी करण्यात आली आहे. याशिवाय ३१३ दुकाने देखील या संकुलात बांधण्यात येणार आहेत.
ठिकाण एकूण घरे
तळोजा ४२७५
कळंबोली ९१४
घणसोली १५३२
द्रोणागिरी २५२७
दुकाने ३१३
कमी दराची निविदा टाकल्याने शिर्केना मिळाले हे काम
सिडकोच्या पातळीवर या प्रकल्पाला सुरुवात झाली असून प्रत्यक्षात दिवाळीपर्यंत बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या गृहप्रकल्पाचा संपूर्ण आराखडा तयार आहे. १५ हजार घरांच्या प्रकल्पाची निविदा नुकतीच जाहीर झाली आहे. बी. जी. शिर्के यांची निविदा कमी दराची असल्याने त्यांना हे काम देण्यात आले आहे. पहिले सहा महिने तयारी करण्यासाठी दिले जातील. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
– के. के. वरखेडकर, मुख्य अभियंता, सिडको, नवी मुंबई