* आ. संदीप नाईकांनी विधानभवनाच्या पायर्यावरच बसत केलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्राचे नवी मुंबईच्या समस्यांकडे वेधले लक्ष
सुजित शिंदे
नवी मुंबई : शुक्रवार, दि. 10 मार्च रोजी काढण्यात येणार्या मोर्चाकडे नवी मुंबईचेच नाही तर उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहीले आहे. नवी मुंबईचे शिल्पकार व ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ना. गणेश नाईक यावेळी स्वत: रस्त्यावर उतरून या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. या मोर्चामध्ये किती माणसे सहभागी होतात, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहीले आहे. नवी मुंबईचा ओबामा या नावाने महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखल्या जाणार्या आमदार संदीप नाईकांनी 9 मार्च रोजी विधानभवनाच्या पायर्यावरच आंदोलन छेडत नाईक परिवार नवी मुंबईतील ग्रामस्थांसोबत, प्रकल्पग्रस्तांसोबत विधानभवनासह रस्त्यावरही सोबत राहणार असल्याचे दाखवून दिले आहे.
सिडको, एमआयडीसी, नवी मुंबई महापालिका आणि राज्य शासनाकडून सतत नवी मुंबईकरांवर होणार्या अन्यायाविरुध्द पुन्हा एकदा नवी मुंबईतील राजकीय मंडळींनी एल्गार पुकारला आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली 10 मार्च रोजी सीबीडी बेलापूर मधील कोकण भवनवर निर्धार मोर्चा काढण्यात येणार आहे.
यावेळी शासनाच्या अन्यायकारक भूमिकेविरोधात नवी मुंबईकरांकडून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. सिडको आणि महापालिकेने नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधकामाविरोधात तीव्र मोहिम सुरु केली आहे. प्रकल्पग्रस्तांबरोबरच झोपडपट्टीधारक, दिघावासीय, माथाडी कामगारांची घरे, धार्मिक स्थळे, फेरीवाले, व्यापारी, एपीएमसीतील गाळेधारक आणि इतर घटकांवर नेहमीच सिडको, नवी मुंबई महापालिका, एमआयडीसी आणि राज्य शासनाकडून अन्याय केला जात आहे.
निर्धार मोर्चा आज 10 मार्च रोजी सकाळी 9 वाजता सीबीडी येथील क्रोमा शोरुम येथून सिडको भवन आणि कोकण भवन कार्यालयावर नेण्यात येणार आहे. या निर्धार मोर्चा मध्ये नवी मुंबईतील हजारो नागरिक सहभागी होऊन त्यांच्यावर होणार्या अन्यायाविरोधात आक्रोश व्यक्त करत सिडको, महापालिका, एमआयडीसी आणि राज्य शासनाचा निषेध करणार आहेत.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त, झोपडपट्टीवासिय, दिघावासिय आणि सिडको वसाहतीत राहणारे नागरिक, व्यापारी, फेरीवाले यांच्यावर सिडको आणि महापालिकेकडून सुरु असलेल्या अन्यायाविरोधात रस्यावर उतरण्यासाठी येथील राज्यकर्त्यांना उशीरा जाग आल्याबद्दल नवी मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे निर्धार मोर्चामध्ये किती नवी मुंबईकर सहभागी होतील याकडे शासकीय यंत्रणेचे देखील लक्ष लागून राहिले आहे.
नवी मुंबईतील गावगावठाण क्षेत्रात प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी आजतागायत बांधलेली सर्व घरे कायम करताना ग्रामस्थांशी चर्चा करुन सर्वसमावेशक योजना आणावी आणि सदर गरजेपोटी बांधकामे तोडण्याबाबत सुरु असलेली अन्यायकारक कारवाई थांबवावी, गावठाण विस्तार योजनेअंतर्गत सामाजिक सुविधेसाठी भूखंड उपलब्ध करुन द्यावेत, मिठागर कामगार, बारा बलुतेदार आणि भूमिहीन शेतकर्यांना त्वरीत भूखंड वितरीत करावेत, प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना विद्यावेतन सुरु ठेवावे, आदी मागण्यांसह सिडको वसाहतीमध्ये मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुर्नविकास करणे, डीम्ड कनव्हेन्स लागू करणे,सर्वधर्मीयांसाठी प्रार्थनास्थळे, स्मशानभूमी आणि कब्रस्तानसाठी जागा उपलब्ध करुन देणे, दिघा मधील घरे नियमित करुन रहिवाशांना दिलासा देणे, राज्य शासन, एमआयडीसी आणि सिडको जागेवरील झोपडपट्टीचा पुर्नविकास करणे आदी मागण्यांचे निवेदन मोर्चेकरांद्वारे कोकण आयुक्तांना देण्यात येणार आहे.
चौकट
लोकनेते गणेश नाईकांनी समस्त नवी मुंबईतील प्रत्येक घटकावर होणार्या अन्यायाच्या विरोधात या मोर्चाचे आयोजन केले आहे. ग्रामस्थांपासून सिडको सदनिकाधारकांपर्यत, व्यापार्यांपासून ते गोरगरीब माथाडींपर्यत सर्वचजण या अन्यायामध्ये भरडला जात आहे. नवी मुंबईकरांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात प्रशासनाला आपला संताप दाखवून देण्यासाठी, आपल्या समस्यांचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी हा मोचार आयोजित करण्यात आला आहे. नवी मुंबईकरांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याने मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होवून आपल्यावर होत असलेला अन्याय प्रशासनाच्या लक्षात आणून देणे आवश्यक आहे.
– सौ. सुजाताताई सुरज पाटील
कार्यसम्राट नगरसेविका, प्रभाग 85
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष