साईनाथ भोईर
नवी मुंबई : एका बाजूला बेरोजगारांची मोठी संख्या आणि दुस-या बाजूला कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची कमतरता देशात, राज्यात व आपल्या नवी मुंबईतही दिसून येत असून उद्योग, व्यवसाय, सेवाक्षेत्र यांच्या गरजेनुसार आपले कौशल्य विकसित केले तर निश्चित रोजगार उपलब्ध होऊ शकतो असा विश्वास देत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री.तुकाराम मुंढे यांनी आगामी वर्षात नवी मुंबई महानगरपालिका मोठ्या प्रमाणावर कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रम हाती घेत असल्याची माहिती दिली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 16 वाशी येथे जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व दिनदयाळ अंत्योद्य योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “भव्य रोजगार मेळावा व लाभार्थी नोंदणी अभियान” प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.यावेळी अतिरिक्त आयुक्त (शहर) श्री. अंकुश चव्हाण आणि समाज विकास विभागाच्या उप आयुक्त श्रीम. तृप्ती सांडभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
युवकांनी आपल्यामधील क्षमता ओळखून कौशल्य विकसित केले तर रोजगाराच्या विविध संधी निश्चित मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. केवळ त्या संधींपर्यंत पोहचण्याची गरज आहे. याकरीता आपल्या आवडीच्या क्षेत्रात मार्केटच्या गरजा ओळखून कौशल्य प्राप्त केले, अभ्यासू वृत्ती ठेवली आणि पुढे जाण्याचा ध्यास ठेवला तर अनेक संधी उपलब्ध आहेत असे सांगत महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी रोजगार मिळविताना सरकारी नोकरी अथवा खाजगी नोकरी अशा मर्यादा स्वत:वर घालून घेऊ नका, तर स्वत:मधील गुण लक्षात घेऊन विविध पर्याय खुले ठेवा अशा मौलीक सूचना केल्या.
नोकरी / व्यवसाय सुरु केल्यानंतरही अभ्यास करणे थांबवू नका. नवनवीन शिकत रहा त्याचा उपयोग निश्चितच प्रगतीसाठी होतो असे सांगत आयुक्तांनी ज्यांची आज निवड होणार नाही त्यांनी आपल्यामधील कमतरतांचा शोध घ्या व त्या दूर करण्याचा प्रयत्न करा असे मार्गदर्शन त्यांनी केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या वर्षात कौशल्य आणि उद्योजकता विकास कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येत असून त्यामध्ये विविध क्षेत्रातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणानंतर उद्योग / व्यवसाय उभारण्यासाठी अर्थसहाय्य स्वरुपात मदत तसेच नोकरीसाठी सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.त्याचीही नोंदणी याठिकाणी होत असून त्यालाही उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
रोजगार निर्मिती तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी नोंदणी हा रोजगार मेळाव्याचा उद्देश 3 हजारहून अधिक उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घेऊन सफल केला. सकाळपासूनच या रोजगार मेळाव्याला भरघोस प्रतिसाद लाभला. दुपारच्या सत्रापर्यंत400 हून अधिक युवकांना नोकरीची निवडपत्रे व व्दितीय मुलाखतीकरीता पत्रे देण्यात आली.
सन 2017-18 या आर्थिक वर्षात महापालिका अंदाजपत्रात कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून या रोजगार मेळाव्यात उपस्थित राहिलेल्या उमेदवारांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. या मेळाव्यात आदित्य बिर्ला ग्रुप, कामत हॉटेल्स, तुंगा हॉटेल, अपोलो हॉस्पिटल, श्रीराम ट्रांन्सपोर्ट फायनान्स, युरेका फोर्बस, कोटक महिंद्रा बॅंक, आय.सी.आय.सी.आय. बँक अशा नामांकीत28 उद्योग / व्यवसायिकांचा समावेश होता. यामधून उपस्थित तरूण, तरूणींना वैद्यकीय,बॅंकींग, हॉस्पिटॅलीटी, सेवाक्षेत्र अशा विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या.
त्याचप्रमाणे इन्स्टिट्युट ऑफ कॅटरींग एज्युकेशन, थ्री सिक्स्टी डिजीटल हब प्रा.लि., कॉलेज ऑफ आय.टी., गजानन चॅरीटेबल संस्था, एज्युवे अकादमी, जी स्पा,ॲपरल ट्रेनींग ॲण्ड डिझायन सेंटर, डेझाव्हू स्कील डेव्हलपमेंट, सॉफ्ट कन्स्पेप्ट टेक्नॉलॉजी प्रा.लि. अशा 20 तंत्रशिक्षण संस्थांनी उपस्थित उमेदवारांना विविध व्यवसाय प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन केले.