नवी मुंबई – मी लाटेत निवडून आले,मला कामे करता येणार नाहीत असा माझ्या विरोधकांचा एकंदरीत भ्रम झाला होता.मात्र मी माझ्या कामांचा धडाका जोरात सुरूच ठेवल्याने माझ्या विरोधकांच्या छातीत कळा येऊ लागल्या आहेत.त्यामुळेच नैराश्यातून निर्धार मोर्चा काढत असल्याची टीका बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नवी मुंबईचे नेते गणेश नाईक यांचे नाव न घेता शुक्रवारी बेलापूर येथे केली.बेलापूर येथील के.स्टार. हॉटेल येथे शुक्रवारी दुपारी 3 वाजता आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.याप्रसंगी आमदार मंदा म्हात्रे बोलत होत्या.गेल्या 15 वर्ष सत्तेत असतानासुद्धा विरोधकांना प्रकल्पग्रस्तांच्या,फेरीवाल्यां च्या व झोपडपट्टीवासीयांच्या समस्या सोडविता आल्या नाहीत.ते मी दोन वर्षात केले व यापुढेही करत राहणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.निर्धार मोर्चे काढून विरोधक नवी मुंबईकरांची दिशाभूल करत आहे. विरोधकांनी शुक्रवारी काढलेल्या निर्धार मोर्चात नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त सहभागी झाले नसून मुंबई ,ठाणे,कल्याण,डोंबिवली येथून निर्धार मोर्चात भाड्याने नागरिक आणले असल्याचा आरोप आमदार मंदा म्हात्रे यांनी यावेळी केला.यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत,जिल्हा महामंत्री डॉ.राजेश पाटील,जिल्हा महामंत्री विजय घाटे,नगरसेवक दीपक पवार,भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
बॉक्स…
वैभव नाईक यांच्यावर बहिष्कार…
आगरी कोळी युथ फाउंडेशनच्यावतीने दि.14 मार्च रोजी पुकारण्यात आलेल्या उपोषणात आपण व आपल्या पक्षाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत का ? असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला असता,याबाबत आम्ही अद्याप कोणताच निर्णय घेतला नसल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.भाजपचे युवा नेते वैभव नाईक या उपोषणात सहभागी होणार आहेत असे समजले आहे याबाबत आपले काय म्हणणे आहे.तसेच वैभव नाईक हे भाजपमध्ये आहेत की नाही ? असा प्रश्न पत्रकारांनी यावेळी उपस्थित केला.वैभव नाईक हे पक्षाच्या कोणत्याच बैठकीला व कार्यक्रमांना उपस्थित राहत नाही.त्यामुळे वैभव नाईक यांना पक्षाच्या कोणत्याच बैठकांना व कार्यक्रमांना निमंत्रित न करण्याचा पक्षश्रेष्टींचा आदेश आहे.पक्षश्रेष्टींच्या आदेशाचे पालन करून वैभव नाईक यांच्यावर बहिष्कार टाकला असल्याचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी सांगितले.