राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सुरज पाटील यांचा टोला
* आमदार संदीप नाईक सदैव दिघावासियांच्या पाठीशी
सुजित शिंदे / नवी मुंबई
एकीकडे प्रकल्पग्रस्तांसह नवी मुंबईच्या विवीध समस्यांवर आक्रमक भूमिका घेत लोकनेते गणेश नाईकांनी काढलेला विशाल मोर्चा तर दुसरीकडे भाजपाच्या बेलापुरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेतून डागलेली तोफ यामुळे नवी मुंबईचे राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाच गणेश नाईकांचे कडवट अनुयायी व नवी मुंबईच्या राजकारणात ‘कुकशेतचा ढाण्या वाघ’ म्हणून ओळखल्या जाणार्या नवी मुंबई राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरज पाटील यांनी ‘आमदार संदीप नाईकांविषयी कोणतीही टिपण्णी जाहिर करण्यापूर्वी खातरजमा करून घ्यावी, उगाचच नवी मुंबईकरांसमोर आपले अज्ञान प्रगट करू नये’ असा टोला भाजपाच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांना लगावला आहे.
आमदार मंदाताई म्हात्रे आणि कुकशेतचा ढाण्या वाघ सुरज पाटील यांच्यात राजकारणात असलेले हाडवैरी जगजाहीर आहे. कुकशेतवासियांकरिता मंदाताई करत असलेले कार्य व सुरज पाटलांनी गेल्या दशकभरात झिजविलेल्या चपला या पार्श्वभूमीवर हा राजकीय संघर्ष टोकाला जावून पोहोचला आहे. त्यातच मंदाताईंनी पत्रकार परिषदेतून नाईकांवर तोफ डागताच आक्रमक स्वभावाच्या सुरज पाटलांनी संदीप नाईकांनी दिघावासियांकरता आजवर काय केले याची मालिकाच पत्रकारांसमोर सादर केली.
शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिघाप्रश्न पेटत असताना आमदार संदीप नाईक कुठे होते?असा निरर्थक प्रश्न विचारुन भारतीय जनता पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पुन्हा एकदा आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन केले आहे, असा टोला हाणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक सुरज पाटील यांनी दिघावासियांची घरे नियमित करावीत तसेच त्यंाना न्याय मिळावा म्हणून आमदार नाईक पावला पावलावर या पिडित रहिवाशांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत, असे म्हंटले आहे. स्थानिक आमदार म्हणून त्यांनी विधानसभेत लक्षवेधी सुचना, तारांकीत प्रश्न, औचित्याचा मुदद या माध्यमातून दिघावासियांच्या भावनांना आणि मागणीला जोरदार वाचा फोडली आहे. त्यावर कार्यवाहीचे शासनाकडून आश्वासन मिळविले आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, संबधीत खात्याचे मंत्री, सचिव, विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, दोन्ही सभागृहाचे विरोधीपक्षनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार आदींना प्रत्यक्ष भेटून तसेच लेखी निवेदने देवून या प्रश्नी पाठपुरावा केला आहे. जानेवारी २०१६ रोजी राज्यपाल, मुख्यमंत्री यांची भेट घेतली. ऑगस्ट २०१५ आणि सप्टेंबर २०१५मध्ये संबधींतांना लेखी निवेदने दिली आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात आमदार नाईक यांच्या पुढाकाराने सप्टेंबर २०१५ रोजी एक बैठक घेण्यात आली होती. यामध्ये एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यानंतर सभापतींच्या निर्देशानुसार संबंधीत प्राधिकरणाला दिघावासियांच्या अडचणी समजून घेण्यासाठी बैठक घेण्याची सुचना सभापतींनी केली होती. डिसेंबर २०१५च्या विधीमंडळ अधिवेशनात आमदार संदीप नाईक यांनी दिघावासियांसाठी लक्षवेधी सुचना उपस्थित केली होती. नगरविकास खात्याचे राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी या लक्षवेधीला उत्तर देताना अनधिकृत बांधकामांबाबत सरकार नविन धोरण आणत असल्याचे सांगितले होते. अशीच लक्षवेधी सुचना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार विद्याताई चव्हाण, आमदार नरेंद्र पाटील यांनी विधान परिषदेत मांडली होती त्यांवर विधानपरिषदेचे तत्कालिन उपसभापती वसंत डावखरे यांनी सरकारला निर्देश देत जोपर्यंत अनधिकृत बांधकामविषयक नविन धोरण येत नाही तोपर्यंत दिघ्यातील बांधकामांवर कारवाई करण्यास स्थगिती दिली होती. दिघ्यातील कारवाईविरोधात दिघा घर बचाव संघर्ष समितीने महापे येथील एमआयडीसी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात आमदार संदीप नाईक स्वतः सहभागी झाले होते. जुलै २०१६च्या अधिवेशनात आमदार नाईक यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर अनधिकृत बांधकामाबाबतचे धोरण लवकरात लवकर आणू आणि उच्च न्यायालयाची मंजुरी घेवू असे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होेते. या धोरणाचा लाभ दिघावासियांना मिळणार असल्याचा उल्लेखही केला होता, याचेही स्मरण सुरज पाटील यांनी यानिमित्ताने मंदाताई म्हात्रे यांना करून दिले आहे.
१९ जुलै २०१६च्या विधीमंडळ अधिवेशनात तारांकीत प्रश्न मांडला होता. त्यावर शासनाने दिलेल्या लेखी उत्तरात अनधिकृत बांधकामांबाबतच्या धोरणास मंत्री मंडळाने मंजुरी दिली असून शासनस्तरावर पुढील कायदेशिर बाबी तपासत असल्याचे लेखी उत्तर देण्यात आले होते. दिघा तसेच गावठाणात सिडको, महापालिका आणि एमआयडीसीने सुरु केलेल्या कारवाईबाबत जुलै २०१६व डिसेंबर २०१६ च्या अधिवेशनात औचित्याचा मुददा देखील उपस्थित केला होता. संदीप नाईकांनी दिघावासियांकरीता काय केले याची माहिती घेवूनच आपले मत मांडावे, असा सल्लाही सुरज पाटील यांनी यावेळी केला.