प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला मनसेचा जाहीर पाठींबा
साईनाथ भोईर / नवी मुंबई
नवी मुंबईतील गावठाण विस्तारित गावठाणातील घरांचा आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून दि.१४ मार्च २०१७ रोजी होणार्या बेमुदत आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठींबा दिला असून राजकीय जोडे बाजूला ठेऊन या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे पत्र आगरी-कोळी युथ फाऊंडेशनचे निलेश पाटील यांना दिल्याचे गजानन काळे यांनी म्हटले आहे.
या बेमुदत उपोषणाच्या माध्यमातून आगरी-कोळी युथ फाऊंंडेशनने केलेल्या सगळ्या मागण्या रास्त असून, राज्य शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता या मागण्या मान्य कराव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांना देखील पत्र पाठविणार असल्याचे मनसेचे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांच्या त्यागावर हे नवी मुंबई शहर उभे आहे. मात्र गेली २०/३० वर्षे उलटूनही आपल्या मागण्यांसाठी येथील प्रकल्पग्रस्तांना लढा द्यावा लागतो ही खेदाची बाब आहे. याअगोदर कॉंग्रेस-राष्ट्रवादीने व आता भाजपा-सेनेने मतांसाठी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न भिजत ठेवले असून, स्वयंघोषित प्रकल्पग्रस्त नेत्यांच्या कचखाऊपणामुळे आजही हे प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी केला आहे. मुळातच सिडको व मनपाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर राज्य सरकारकडे फक्त दिखाऊपणाचा पाठपुरावा करणार्या या नेत्यांना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाशी काहीही देणे घेणे नाही असेही मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. महिन्याभरात शासन निर्णय आणण्याची दर्पोक्ती करणार्या व सत्कार सोहळे करणार्या येथील स्वयंघोषित नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाचे राजकारण थांबवावे असे मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी म्हटले आहे.
या बेमुदत उपोषणाची भाषा राज्य सरकारला न कळाल्यास प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढावा. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते लाठ्या काठ्या खाण्यासाठी सगळ्यात अग्रेसर असतील असेही नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.