साईनाथ भोईर
़नवी मुंबई : नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजाने आजवर प्रशासन दरबारी झालेली उपेक्षा व सातत्याने होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात एकत्र येत आगरी-कोळी युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून सिडको, एमआयडीसी, महापालिकेविरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे. गुरूवारी उपोषणाचा तिसरा दिवस असला तरी उपोषणकर्त्याचा उत्साह तोच कायम असल्याचे पहावयास मिळाले.
महाराष्ट्र शासनाने १५ मार्च रोजी एक पत्र पाठवून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी १६ मार्च रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीस बेलापुरच्या भाजपा आमदार मंदा म्हात्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ऐरोलीतील आमदार संदीप नाईक, विधान परिषद सदस्य नरेंद्र पाटील आणि आगरी-कोळी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील यांना चर्चेसाठी निमंत्रित केले. या पत्रानंतर उपोषणकर्त्यांमध्ये आणि उपोषणाला पाठिंबा देणार्या घटकांच्या चेहर्यावर एक आगळेवेगळे समाधान पहावयास मिळाले. परंतु त्यानंतर थोड्याच वेळामध्ये पुन्हा लगेचच महाराष्ट्र शासनाकडून दुसरे पत्र आले, त्यात ही बैठक स्थगित करण्यात आली असून आगामी बैठकीची वेळ कळविण्यात येईल, असे त्या पत्रातून सांगण्यात आले. एकाच दिवसामध्ये शासनाकडून दोन पत्रे आल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये कोठे तरी शासनाला जाग येत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले. परंतु शासनाने बैठक स्थगित केली असली तरी पुन्हा नव्या जोमाने लढा देण्याचा व शासनाकडून लेखी स्वरूपात मागण्या मान्य झाल्याचे आश्वासन मिळत नाही तोपर्यत उपोषण चालूच ठेवण्याचा निर्धार यावेळी उपोषणकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला.
बुधवारी रात्रीच्या १२ वाजताही उपोषणकर्त्यांच्या चेहर्यावर एक आगळेवेगळे तेज पहावयास मिळाले. रात्रीचे १२ वाजून गेले तरी उपोषणकर्ते जागेच होते. उपोषणकर्त्यांच्या समर्थनार्थ असलेला जमावही हजार-बाराशेच्या घरात असल्याने हे आंदोलन निर्णायक ठरणार असल्याचे संकेत पहावयास मिळाले. व्यासपिठावर असलेले दि.बा.पाटलांचे छायाचित्र उपोषणकर्त्यांचे उत्साह वाढवित असल्याचे दिसून आले. व्यासपिठावर भाजपाचे युवा नेते वैभव नाईक, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, नगरसेवक गिरीश म्हात्रे, नगरसेवक घनशाम मढवी, राजेश मढवी, कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांच्यासह अन्य उपोषणकर्ते आता माघार नाही, खूप झाली उपेक्षा, मरण आले तरी कवटाळू, घरे तोडल्याने बेघर झालोय, शासनाकडून मागण्या मान्य झाल्याचे लेखी ग्वाही येत नाही तोपर्यत उपोषण कायम ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांकडून व्यक्त होत असल्याने हे आंदोलन चिघळणार असल्याचे स्पष्ट संकेत पहावयास मिळाले.
व्यासपिठावर डॉक्टर रात्रीच्या १२ वाजताही उपोषणकर्त्यांची वैद्यकीय चाचणी करत होते. उपोषणकर्त्यांना आपल्या परिचितांशी, कार्यकर्त्यांशी बोलण्यास मनाई करत होते. उपोषणस्थळापासून काही अंतरावर शौचालयाची व्यवस्था असल्याने उपोषणकर्ते शौचासाठी, लघुशंकेसाठी व्यासपिठावरून खाली उतरल्यावर तात्काळ संपर्क साधून संभाषण करत होते.
रात्री उशिरापर्यत कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, माजी नगरसेवक दिपक पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे नवी मुंबई अध्यक्ष देवा म्हात्रे यांच्यासह अन्य पक्षाचे पदाधिकारी घटनास्थळी कोणताही तणाव निर्माण होणार नाही याची पाहणी करत होते. घटनास्थळी रूग्णवाहिका, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, सभोवतालच्या परिसरात दुचाकी व चार चाकी वाहनांची मोठ्या संख्येने पार्किग, प्रकल्पग्रस्त नागरिक रस्त्यावर जागोजागी बसलेले यामुळे उपोषणाची व्याप्ती कळून आली.
शासनाकडून चर्चेची तयारी पुढे ढकलण्यात आली असली तरी चर्चा कधीही होवो, पण लेखी स्वरूपात मागण्या मान्य झाल्याचे शासन जाहिर करत नाही, तोपर्यत उपोषण सुरूच राहणार आणि आमच्यापैकी कोणीही व्यासपिठावरून खाली उतरणार नसल्याचे भाजपाचे नेते व उपोषणकर्ते वैभव नाईक यांनी सांगितले.
रात्रीच्या दोन-अडीच वाजता उपोषणकर्त्यांपैकी काही झोपले होते, तर काही झोपण्याची तयारी करत होते. पंरतु त्यांच्या समर्थनार्थ असलेला जमाव पाचशे ते सहाशेच्या संख्येेने होते. बंदोबस्ताला असलेले पोलिस त्यांना घरी जा, सकाळी लवकर या, असे सांगत होते. पण आम्हा प्रकल्पग्रस्तांसाठी आमचेच बांधव आमरण उपोषणाला बसले असताना आम्ही त्यांच्यासाठी जागरणही करू नये का, असा प्रतिप्रश्न संबंधित प्रकल्पग्रस्तांकडून यावेळी करण्यात येत होता.