साईनाथ भोईर
़नवी मुंबई : सिडकोच्या अखत्यारीतील जमिनीवरील भाडेपट्टा धारकांकडून अकृषिक दराने जमीन महसूल वसुली अन्यायकारक असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य शासनाच्या निदर्शनात आणून दिले आहे. महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या कराला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. त्यासंदर्भातील आदेश राज्यशासनाने जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत.
गेल्या कांही दिवसात सिडको वसाहतीमधील सदनिका धारकांना पनवेल तहसीलदारांनी अकृषिक कर भरण्याबाबत नोटिसा पाठविण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको हद्दीतील सोसायट्यांमध्ये ना गरिकांशी संवाद साधताना हा कर रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे वचन दिले होते. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांनी हि बाब शासनाच्या निदर्शनात आणून दिली.महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि पनवेल तालुक्यातील व संपूर्ण नवीमुंबई मधील जवळजवळ सर्व वसाहती सिडकोकडून वितरित करण्यात आलेल्या भूखंडावर वसविण्यात आलेल्या आहेत. सदर भूखंड हे सिडकोकडून लिज हक्काने वितरित करण्यात आलेले असून त्यापोटी मूळ लिज हक्कधारकांकडून भाडेपट्यांची रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. त्याशिवाय पुढे हस्तांतरण होताना वेगळे शुल्क सुद्धा सिडकोने आकारलेले आहे. त्याचबरोबर सिडकोने इच्छुक खरेदीदारांना सदनिका भाडेपट्याने देताना कांही रक्कम खरेदीदारांकडून घेतलेली आहे. यासर्वांसोबत सर्व सदनिकाधारकांकडून सिडको वार्षिक कर आकारात असते असेही त्यांनी आपल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे.जमीन महसूल संहितेमधील तरतुदीनुसार गावठाणातील निवासी इमारतींना अकृषिक कर माफ आहे याबाबीकडे आमदार प्रशांत ठाकूर यांनी महसूल मंत्र्यांचे लक्ष वेधत याचप्रकारची तरतूद सिडको हद्दीतील भूखंडांसाठी करावी अशी मागणी त्यांनी केली. सदर बाब गांभीर्याने घेत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अकृषिक कराला स्थगिती दिली आहे.
पनवेलमध्ये या निर्णयाचे स्वागत नागरिकांकडून होत आहे. अकृषिक करातून मुक्तता केल्याबद्धल नागरिक आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानीत आहेत.
चौकट
पनवेलमध्ये अकृषिक कराला विरोध करून राजकीय पोळी भाजू इच्छिणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला महसूल मंत्र्यांच्या या निर्णयामुळे चांगलीच चपराक बसली आहे. या अन्यायकारक कराची अंमलबजावणी जनहितयाचिका क्रमांक ५८/२००४ च्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार करण्यात आली होती.१९ जून १९९९ साली तत्कालीन शासनाचा शासन निर्णय हा या याचिकेचा विषय होता. मात्र प्रश्नाच्या मुळाशी न जाता केवळ नागरिकांची मने भडकावणे हे शेकापचे नेहमीचे धोरण राहिले आहे.त्याचाच कित्ता गिरवत शेकाप नेत्यांनी अकृषिक कराविरोधात भाजप सरकारवर टीका करनारे परिपत्रक काढले होते. भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना विश्वासात घेत सरकारदरबारी नागरिकांची बाजू लावून धरली त्यामुळे हा प्रश्न निकाली निघाला आहे.