साईनाथ भोईर
़नवी मुंबई : “वॉक विथ कमिशनर” उपक्रमातून नागरिकांशी थेट संवाद साधता येतो, त्यांच्या अपेक्षा जाणून घेता येतात तसेच नागरी सुविधांविषयी असलेल्या त्यांच्या तक्रारींची व सूचनांची माहिती मिळते आणि याचा उपयोग नागरिकांना अपेक्षित असलेली विकास कामे प्राधान्याने करताना होतो असे सांगत महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी महानगरपालिका आपले कर्तव्य पार पाडीत असताना नागरिकांनीही नागरी सुविधांचा वापर करताना आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी असे आवाहन केले. वाशी से.14 येथील गोरक्षनाथ पालवे उद्यानात नागरिकांच्या उत्साही गर्दीत संपन्न झालेल्या वॉक विथ कमिशनर उपक्रमाप्रसंगी त्यांनी नागरिकांशी खुला संवाद साधला.
़नवी मुंबई : “वॉक विथ कमिशनर” उपक्रमातून नागरिकांशी थेट संवाद साधता येतो, त्यांच्या अपेक्षा जाणून घेता येतात तसेच नागरी सुविधांविषयी असलेल्या त्यांच्या तक्रारींची व सूचनांची माहिती मिळते आणि याचा उपयोग नागरिकांना अपेक्षित असलेली विकास कामे प्राधान्याने करताना होतो असे सांगत महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी महानगरपालिका आपले कर्तव्य पार पाडीत असताना नागरिकांनीही नागरी सुविधांचा वापर करताना आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी असे आवाहन केले. वाशी से.14 येथील गोरक्षनाथ पालवे उद्यानात नागरिकांच्या उत्साही गर्दीत संपन्न झालेल्या वॉक विथ कमिशनर उपक्रमाप्रसंगी त्यांनी नागरिकांशी खुला संवाद साधला.
नवी मुंबईतील स्वच्छता अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे अभिप्राय नागरिकांनी यावेळी व्यक्त केल्यानंतर आयुक्तांनी यामध्ये महानगरपालिकेप्रमाणेच नागरिकांचाही मोठा सहभाग असल्याचे मत व्यक्त केले. सार्वजनिक ठिकाणी कचरा केला नाही तर आपोआपच शहर स्वच्छ राहील व कचरा संकलन आणि वाहतुकीवर होणा-या खर्चात बचत होऊन हा निधी नागरी सुविधांसाठी वापरला जाईल असे सांगितले. ओला आणि सुका कचरा घरापासूनच वेगवेगळा ठेवला जाणे व महानगरपालिकेच्या कचरा गाड्यात वेगवेगळा देणे अत्यावश्यक असून अजूनही काही प्रमाणात यामध्ये सुधारणा होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्लास्टिक हे मानवी जीवनाला व पर्यावरणाला घातक असून नागरिकांनी दैनंदिन जीवनात प्लास्टिकला प्रतिबंध करावा, अगदी रोजच्या खरेदीसाठीही प्लास्टिक बॅग न वापरता खुप दिवस टिकणारी कागदी किंवा कापडी बॅग वापरण्याची सवय लावून घ्यावी असेही ते म्हणाले.
अनेक ठिकाणी इमारत लिकेजचे कारण सांगून बेकायदेशीररित्या इमारतींवर पत्र्याचे छप्पर टाकल्याचे आढळून येत आहे. लिकेजेस थांबविण्यासाठी पत्रे टाकणे हा पर्याय नसून त्यासाठी तांत्रिक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने अशा सोसायट्यांनी / इमारत मालकांनी पावसाळी कालावधीपूर्वी लिकेजेसवर योग्य उपाययोजना करावी व आपल्या टेरेसवरील पत्र्याचे छप्पर स्वत:हून काढून टाकावे असे त्यांनी स्पष्ट केले. अशा छपरांखाली होणा-या वाणिज्य वापरावर प्रथमत: धडक मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील पार्कींगची समस्या मोठ्या प्रमाणावर असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी नो-पार्कींग झोन, वन वे पार्कींग, इव्हन – ऑड डे पार्कींग असे विविध उपाय नवीन पार्कींग पॉलीसी अंतर्गत योजिले जात असून नागरिकांनीही आपल्या गाड्या सोसायटीच्या आवारात / आपल्या मालकीच्या जागेत पार्क करून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. आवश्यक ते नवे बस मार्ग सुरु करून प्रवासी वाहतूक सेवा वाढविण्याकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे सांगत आयुक्तांनी पदपथ व रस्ते मोकळे व चालण्यायोग्य सुधारणा करून वॉकॅबिलिटी वाढविण्यावर भर दिला जात असल्याचे स्पष्ट केले.
मोरबे धरणात पुरेसा पाणीसाठा असून नवी मुंबईकरांना पाण्याची कोणत्याही प्रकारे अडचण भासणार नाही असे आश्वस्त करीत आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना मुबलक पाणी मिळत असले तरी त्याचा वापर गरजेपुरताच करावा असे आवाहन केले. फेरीवालेमुक्त रस्ते, पदपथ ही महानगरपालिकेची भूमिका असून फेरीवाल्यांविरोधात मोहीमा सातत्यांने हाती घेण्यात येत आहेत. यामध्ये नागरिकांचाही संपूर्ण सहभाग अपेक्षीत असून नागरिकांनी फेरीवाल्यांकडून खरेदी न केल्यास ते व्यवसाय करायला बसणारच नाहीत त्यामुळे नागरिकांनी त्यांच्याकडून खरेदी करू नये असे आवाहन आयुक्तांनी केले.
महानगरपालिकेच्या कोणत्याही कार्यालयात न जाता नागरिकांना घर बसल्या महानगरपालिकेशी संबंधीत कर भरणा करणे, 31 प्रकारचे दाखले – परवाने – प्रमाणपत्रे मिळविणे, नागरी सुविधांविषयी तक्रारी / सूचना करणे आदी सुविधा www.nmmc.gov.in या महापालिकेच्या वेबसाईटवर एका क्लिकवर उपलब्ध असून नागरिक आपल्या हातातील स्मार्ट फोनमध्येही nmmc e-connect हे मोबाईल ॲप डाऊनलोड करून अगदी सहजपणे या सुविधा उपलब्ध करून घेऊ शकतात. यामधील तक्रार निवारण प्रणाली (Grieavance redressal system) मध्ये नागरिक फोटोसह तक्रारी / सूचना डाऊनलोड करू शकतात व त्यावरील कार्यवाहीच्या सद्यस्थितीची माहितीही घेऊ शकतात. ही अत्यंत प्रभावी व निर्णयक्षम प्रणाली असल्याने नागरिकांनी हे मोबाईल ॲप डाऊनलोड करून या सर्व सुविधांचा वापर करावा असेही आवाहन त्यांनी केले.
वॉक विथ कमिशनरच्या निमित्ताने विविध वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने आयुक्तांशी संवाद साधण्यासाठी सकाळी पावणेसहा वाजल्यापासून उत्सुकतेने उपस्थित होते. विशेषत्वाने स्वच्छता व नागरी सुविधा कामांमध्ये सकारात्मक प्रगती दिसत असल्याबद्दल अनेकांनी आयुक्तांचे हस्तांदोलन करीत अभिनंदन केले.