सिडको एम.डी. भूषण गगराणी यांची राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला माहिती
साईनाथ भोईर
नवी मुंबई : सिडकोनिर्मित इमारतींच्या जमिनी फ्री होल्ड कराव्यात आणि असोसिएशनसाठी बांधलेल्या कार्यालयांचे मालकी हक्क नाममात्र दराने असोसिएशनला देण्यात यावेत या प्रमुख मागण्यांसह सिडकोनिर्मित इमारतीमधील रहिवाश्यांच्या उर्वरित मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिष्ठमंडळ सोमवारी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी याना भेटले. सिडकोच्या जमिनी फ्री होल्ड करण्यासाठी सिडको सकारात्मक असून या संबंधीचा मसुदा निर्मितीचे काम सुरु असल्याची माहिती श्री गगराणी यांनी शिष्टमंडळाला दिली आणि हा मसुदा तयार करून लवकरच शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई पालिकेतील पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ, राष्ट्रवादीचे नगरसेवक अशोक गुरखे, नगरसेवक घनश्याम मढवी, माजी नगरसेवक विनीत पालकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रभागअध्यक्ष विजय साळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अशोक नरबागे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. सिडकोने नवी मुंबई क्षेत्रात मध्यम आणि अल्पउत्पन्न आणि इतर गटांसाठी गृहप्रकल्प उभे केले. सदनिकांची रक्कम सिडकोला अदा करूनही इमारती खालील जमिनींची मालकी सिडकोकडे आहे. संबंधित गृहनिर्माण संस्था आणि सदनिका धारकांना अद्यापही मालकी हक्क प्राप्त झालेला नाही. सदरच्या जमिनी लीजवर देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे इमारतींमधील घरासंबंधीच्या कोणत्याही कामासाठी सिडको कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. गृहनिर्माण संस्था आणि सदनिका धारकांची अडवणूक केली जाते. आणि आर्थिक भुर्दंडही पडतो. त्यामुळे या घटाकांमध्ये सिडको विरोधात संतापाची भावना आहे. त्यामुळे सिडकोनिर्मित इमारतींखालील जमिनी फ्री होल्ड कराव्यात अशी लेखी मागणी १५ मार्च २०१७ रोजी दिलेल्या लेखी पत्रात राष्ट्रवादीच्या वतीने या अगोदरच करण्यात आली आहे त्या अनुषंगाने सोमवारची बैठक पार पडली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक यांनी औरंगाबादच्या धर्तीवर नवी मुंबईतील सिडकोच्या जमिनी फ्री होल्ड कराव्यात अशी मागणी सर्व प्रथम केली होती. आमदार संदीप नाईक यांनी देखील सिडको आणि राज्य शासन यांच्याकडे ही मागणी लावून धरली आहे. सिडकोच्या जुन्या इमारतींमध्ये असोसिएशनसाठी सिडकोने इमारतींमध्येच कार्यालये बांधलेली आहेत. या कार्यालयांचे मालकी हक्क सिडकोकडे आहेत. ही कार्यालये नाममात्र दराने मिळावीत यासाठी गेली अनेक वर्षे असोसिएशन मागणी करीत आहेत. ही कार्यालये असोसिएशनच्या नावावर करावीत अशी मागणी देखील शिष्ठमंडळाने केली आहे. सिडकोच्या सदनिका विकताना सिडकोकडे हस्तांतरण शुल्काचा भरणा करावा लागतो. सर्वसामान्य सदनिका धारकांना हा एक प्रकारचा आर्थिक फटकाच आहे. त्यामुळे सिडकोने हस्तांतरणशुल्क रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रभाग अध्यक्ष विजय साळे यांनी केली आहे. पालिकेतील पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ यांच्या प्रभागात सुमारे ७५० पेक्षा अधिक ट्रकचालक आणि मालक वास्तव्य करीत असल्याने ट्रक पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सीबीडीतील रायगड भवन समोरील मोकळा भूखंड ट्रक टर्मिनलसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी डॉ. नाथ यांनी केली असून श्री. गगराणी यांनी या मागणीला देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असून सिडकोचे सी.ई.ओ. कोरगावकर यांना पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. सीबीडी येथे ट्रक टॅर्मीनल झाल्यास पार्किंगची मोठी समस्या देखील सुटणार आहे.