साईनाथ भोईर
नवी मुंबई : महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रातील अतिक्रमणांविरोधात धडक मोहिमा हाती घेण्यात आल्या असून अतिरिक्त आयुक्त (शहर) श्री. अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली आज बेलापूर, कोपरखैरणे व घणसोली विभागात धडक कारवाया करण्यात आल्या.
बेलापूर विभागात सहा.आयुक्त श्रीम. प्रियांका काळसेकर तसेच त्यांच्या सहकारी अधिकारी – कर्मचा-यांमार्फत करण्यात आलेल्या कारवाई अंतर्गत सेक्टर 36 करावे येथील अनधिकृतरित्या उभारण्यात येत असलेली दोन मजली आर.सी.सी. इमारत जमिनदोस्त करण्यात आली.
त्याचप्रमाणे सहा.आयुक्त श्री. अशोक मढवी आणि कोपरखैरणे विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्यामार्फत सेक्टर 11 कोपरखैरणे येथील कांचनजंगा या इमारतीवर असलेला अनधिकृत मोबाईल टॉवर कारवाई करून काढून टाकण्यात आला.
अशाचप्रकारे सहा.आयुक्त श्री. अशोक मढवी यांच्यासह घणसोली विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्यामार्फत राबाडागांव येथील बांधकाम सुरु असलेल्या चार मजल्याच्या अनधिकृत इमारतीवर सिडको व महानगरपालिका यांच्या संयुक्त मोहीमेअंतर्गत पोकलनच्या सहाय्याने तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान तेथील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्याने अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांनी रबाले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. तिदार यांच्यासह पोलीस अधिकारी-कर्मचा-यांच्या सहकार्याने कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करीत या इमारतीवर अतिक्रमण विरोधी कारवाई केली.