नवी मुंबई शहर विकसित झाले, पण हे शहर विकसित करण्यासाठी ज्यांनी त्याग केला, ज्यांची भातशेती गेली, खाडीतील मासेमारी संपुष्ठात आली, त्या स्थानिक भूमीपुत्रांचे काय, याचा सरकारने, सिडकोने आजतागायत गांभीर्याने कधीही विचार केला नाही. आज नवी मुंबईतील गावागावामध्ये भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. ग्रामस्थांना अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. याच गावांच्या मालिकेतील एक सारसोळे गाव. जनता दरबार असो वा महापालिका असो, सिडको असो वा मुख्यमंत्र्यांचे दालन असो, सर्वच ठिकाणी कागदपत्रे चाळल्यास सर्वाधिक पत्रव्यवहार हा सारसोळेच्याच ग्रामस्थांचा आपणास पहावयास मिळतो. गणेश नाईक हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांच्या प्रत्येक जनता दरबारात गावातील मनोज मेहेर या युवकाने सारसोळेची जेटी आणि बामणदेवाचा मार्ग तसेच अन्य समस्यांकरता चपला झिजविल्याचे नवी मुंबईकरांनाही माहिती आहे. सारसोळेचे ग्रामस्थ स्वाभिमानी आहेत. परिस्थितीने गरीब आहेत, पण लाचार नक्कीच नाहीत. परिस्थितीशी संघर्ष करत ते दोन हात करतात, पण लाचारीने कोणापुढे हात पसरत नाहीत, अशी नवी मुंबईतील गावठाणांमध्ये सारसोळे गावाबाबतची ख्याती आहे. समस्या सोडविण्यासाठी व सुविधा पुरविण्यासाठी गेल्या दशकभराच्या कालावधीत अनेक राजकीय घटकांनी आश्वासने दिली, पण आश्वासनांची पूर्तता कोणाकडूनही न झाल्यामुळे राजकीय क्षेत्राबाबत सारसोळेच्या ग्रामस्थांचा भ्रमनिरास झालेला आहे. येथील लोकांना क्रिकेटचा छंद आहे. क्रिकेट येथे जीव की प्राण असल्याने येथे क्रिकेटप्रेमी मोठ्या प्रमाणावर आहेत. केवळ युवकांचेच नाही तर या गावात फोर्टी प्लसचेही काही संघ तयार झाले आहेत. सामाजिक संवेदना या गावाचा अविभाज्य भाग आहे. मागे अण्णा हजारे दिल्लीमध्ये उपोषणाला बसले असतानाया उपोषणाला पाठिंबा देताना सारसोळे कोळीवाड्यातील अधिकांश घरांमध्ये रात्रीच्या वेळी वीज पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. गावामध्ये महापालिकेची शाळा आहे, खासगी शाळा गावामध्ये तसेच नेरूळ सेक्टर सहामध्येही नसल्याने मुलांना शिक्षणासाठी अन्य परिसरात जावे लागते. जेटीवर गाळ व चिखल साचल्याने मासेमारी व्यवसायासाठी अडचणी होतात. भरतीच्या काळात जेटीवर पुरेशा प्रमाणात पाणी येत नसल्यामुळे मासेमारी करून आल्यावर जेटीपासून काही अंतरावर आपल्या छोट्या होड्या उभ्या कराव्या लागता. गाळ-चिखल तुडवित पकडून आणलेले मासे जेटीपर्यत डोक्यापर्यत वाहून आणावे लागतात. त्यामुळे ग्रामस्थांना पायाच्या विशेषत: गुडघ्याच्या व्याधी वाढीस लागल्या आहेत.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात कागदोपत्री विसावलेले हे सारसोळे गाव. प्रामुख्याने आगरी-कोळी समाजाचे प्राबल्य या सारसोळे गावामध्ये आहे. नवी मुंबईमध्ये गाव आहे, पण गावामध्ये शहर दिसत नाही, अशी सर्वत्रच परिस्थिती आहे, सारसोळे गावही त्याला अपवाद नाही. नवी मुंबई शहर विकसित करण्याकरिता भूसंपादनामध्ये जमिनी गेल्या, त्यामुळे सारसोळे गावाचीही हानी झाली. आज नेरूळ सेक्टर सहामधील मेरेडिअन टॉवरपर्यत सारसोळेच्या ग्रामस्थांची भातशेती होती. ज्या गावामध्ये प्रबळ राजकीय नेतृत्व नावारूपाला येते, त्या गावामध्ये समस्या फार काळ टिकून राहत नाही. सारसोळे गावामध्ये नवी मुंबईकरांनी दखल घ्यावी असे राजकीय नेतृत्व जन्माला आलेच नाही. मनोज मेहेर नावाचे युवा नेतृत्व मधल्या काळात सारसोळे गावात नावारूपाला आले खरे, या नेतृत्वाने गावाच्या समस्या सोडविण्यासाठी, सुविधा पुरविण्यासाठी मनपा ते मंत्रालय, सिडको ते जनता दरबार आदी सर्वच ठिकाणी संघर्ष केला, पाठपुरावा केला. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने मनोज मेहेरला ‘आपलेसे’ केल्यामुळे सारसोळे गावच्या भूमीपुत्रांचा आवाज खर्या अर्थांने काही काळ थंडावला आहे.
सारसोळे गावामध्ये आजही बेरोजगारीच भस्मासूर आहे. घराघरामध्ये आपणास बेरोजगार युवक पहावयास मिळतात. सफाई विभागामध्ये सारसोळेच्या मुलांना अन्य कामच मिळत नसल्याचे नेहमीच उपहासाने बोलले जात आहे. हाती झाडू घेवून सफाई केली तरी वेतन विलंबामुळे उपासमारीची वेळ आली आहे. जवळच्याच सेक्टर सहामधील रस्ते सुस्थितीत व सुटसुटीत आहेत. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पेव्हर ब्लॉक बसलेले आहेत. पण सारसोळे गावातील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था आहे. गटारांचे पाणी उघड्यावर वाहताना दिसते. वायरींचे जाळे इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की. ‘स्पायडरमॅन’ खेळही खेळता येईल. गरजेपोटी बांधलेल्या घरांवर अनधिकृत बांधकामाचा शिक्का आहे.
सारसोळे गावाच्या जेटी आणि बामणदेवाचा मार्ग ही समस्या गेल्या काही वर्षापासून आजही ‘जैसे थे’च आहे. सारसोळे गावची युवा पिढी आजही रोजगारासाठी संघर्ष करत आहे. सारसोळे गावच्या युवकांना आज महापालिकेत सफाई विभागातच काम करावे लागत आहे. जेटीवर असणारी सारसोळे ग्रामस्थांची मच्छि पकडण्याची 14 जाळी अज्ञात समाजकंठकांनी जाळली. एका जाळ्याची किमंत 35 हजाराच्या घरात असल्याने पाच लाखाच्या आसपास कोळी लोकांचे नुकसान झाले. सरकारकडून तसेच महापालिकेकडून पाच पैशाचीही नुकसान भरपाई मिळाली नाही. इतकेच काय पण जाळी जाळणार्या नराधमांचाही शोध नेरूळ पोलिसांना आजतागायत लागलेला नाही.
बामनदेवाच्या मार्गाचीही समस्या सोडविण्यास कोणी स्वारस्य दाखवित नाही. या समस्या निवारणाची निवेदने मनपापासून मंत्रालयापर्यत शेकडोच्या संख्येने पडलेली आहे. खाडीअंर्तगत सर्वच रस्त्यांचे महापालिका प्रशासनाने डांबरीकरण केलेले आहे. खाडीतील ढापे पावसाळ्यात चालू बंद करण्यासाठी खाडीअंर्तगत रस्ते सुस्थितीत असणे आवश्यक आहे. बामणदेवाकडील मार्ग ढाप्यांकडे जाण्यासाठी जवळचा असतानाही महापालिका प्रशासन या मार्गाच्या डागडूजीसाठी विशेष स्वारस्य दाखवित नाही. पण पामबीच मार्गालगतच असलेला बामणदेवाचा मार्ग आजही कच्चाच आणि खाचखळग्यांचाच आहे. खाडीअंर्तगत सर्व रस्त्यांचे डांबरीकरण झाले मात्र बामणदेवाकडे जाणार्या रस्त्याचेच पालिका प्रशासनाकडून डांबरीकरण जाणिवपूर्वक टाळण्यात आले असल्याचा आरोप सारसोळेच्या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पूर्वी बामणदेवाकडे जाणार्या मार्गावर ग्रामस्थांची मिठागरे होेती. दररोज अडीच ते तीन हजार लोकांचा या मार्गावर राबता होता. मिठागरे बंद झाल्यावर या मार्गावरील वर्दळ कमी झाली. सारसोळेचे ग्रामस्थ मासेमारी करायला जाण्यासाठी या मार्गाचाही वापर करतात. या ठिकाणाहून गेल्यावर बामनदेवाचे दर्शन करता येते. खाडीमध्ये मासेमारी करण्यास गेल्यावर येणार्या संकटापासून बामनदेवच खाडीमध्ये आपले रक्षण करतो अशी सारसोळेच्या ग्रामस्थांची श्रध्दा आहे.