नवी मुंबई / साईनाथ भोईर
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जागतिक जलदिनाचे औचित्य साधत २२ मार्च रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये १६ मार्च ते ३१ मार्च या पंधरवडा कालावधीत सर्व जलाशयांची साफसफाई करण्याकरीता विशेष स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे उप आयुक्त तुषार पवार, परिमंडळ-२ चे उप आयुक्त अंबरीश पटनिगीरे व सहाय्यक आयुक्त तुषार बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे.
२४ मार्च रोजी ऐरोली विभाग कार्यक्षेत्रातील सेक्टर-२०, येथील विसर्जन तलाव व परिसरात विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोहिमेवेळी मानवता ग्रुप, एकता ग्रुप, पतंजली ग्रुप, हास्य ग्रुप व स्वच्छाग्रही यांच्या सहकार्याने तलावाची मोठ्या प्रमाणात साफसफाई करण्यात आली तसेच प्लास्टीकच्या पिशव्या व निर्माल्य हे तलावामध्ये न टाकता ते निर्माल्य कलशामध्ये टाकण्यासंबधी मार्गदर्शन केले. या मोहिमेमध्ये ऐरोली विभागातील स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे, स्वच्छता निरीक्षक नितीन महाले, सम्राट कांबळे, विशाल खारकर, उप निरिक्षक गणेश राऊत, भुषण पाटील स्वच्छाग्रही व स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.