नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असणारे सुमारे साडेसात हजार कंत्राटी कामगार महापालिका प्रशासनाच्या गलथान
कारभाराविरोधात पुढील आठवड्यात महापालिका मुख्यालयासमोत घंटानाद आंदोलन करणार आहेत, अशी माहिती ‘नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन’ने दिला आहे.
यासंदर्भात ‘नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन’च्या झालेल्या बैठकीनंतर कामगार नेते ऍड. सुरेश ठाकूर यांनी सदर माहिती दिली. सदर बैठकीस ‘युनियन’चे पदाधिकारी बाळकृष्ण खोपडे, नरेंद्र वैराळ, जगदीश म्हात्रे, गजानन अंबोरे आदिंसह कामगार उपस्थित होते.
समान काम समान वेतनचा ठराव नामंजूर करुन किमान वेतन देण्याचा महापालिका प्रयत्न करीत आहे. यामुळे कंत्राटी कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगारांना कामगार विमा आणि सेवाज्येष्ठता फरक मिळालेला नाही. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत असल्याचे ऍड. सुरेश ठाकूर म्हणाले.
परिणामी, महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधून कंत्राटी कामगारांना न्याय मिळण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागात असलेले सुमारे साडेसात हजारहुन अधिक कंत्राटी कामगार पुढील आठवड्यात महापालिका मुख्यालयासमोर घंटानाद आंदोलन करणार असल्याचा इशारा ऍड. ठाकूर यांनी दिला आहे.