साईनाथ भोईर
नवी मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेले नवी मुंबई महापालिकेचे तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर एस. रामास्वामी नवे पालिका आयुक्त होणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत असणारे तुकाराम मुंढे यांची सर्वपक्षीय दबावामुळे बदली झाल्याचे बोललं जातं आहे. मुंढे यांनी अनिधिकृत बांधकामविरोधात आक्रमक मोहिम राबवल्यामुळे सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षांनेगी पालिका सभागृहात मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे त्यांची होणारी बदली लांबली. शेवटी मुंढे यांची आज राज्य सरकारकडून बदली करण्यात आली असून त्यांच्याजागी पुणे येथे नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक या पदावर असलेले एन. रामस्वामी यांची वर्णी लावण्यात आली आहे. मुंढे यांच्या बदलीचे येत्या काळात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंढे यांची बदली नेमकी कुठे करण्यात आली, याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई पालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच अनधिकृत बांधकामं, अतिक्रमणे, भ्रष्टाचार यांना वेसण घालण्यासाठी कठोर पावलं उचलली होती. तिथेच वादाची ठिणगी पडली आणि मुंढे यांच्याविरोधात सर्वपक्षीय एकजूट पाहायला मिळाली.
तुकाराम मुंढे यांनी पालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासून ते आजतागायत त्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली आहे. ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कोणत्याही पार्श्वभूमीचा विचार न करता त्यांनी हातोडा चालविण्यास सुरूवात केल्यामुळे सुरूवातीपासून त्यांनी भुमीपुत्रांचा रोष ओढवून घेतला होता. मुंढेंच्या मनमानी कारभाराविरोधात नवी मुंबईकरांनी एक दिवस मुंबई बंदही केली होती. १११ नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या महापालिका सभागृहात भाजपाचे ६ नगरसेवकांचा अपवाद वगळता अन्य सर्व नगरसेवकांनी मुंढे यांच्या विरोधात मतदान केले होते. केवळ मुख्यमंत्र्यांचे लाडके म्हणून आजवर अविश्वासाचा ठराव मंजुर होवूनही ते आयुक्तपदावर टिकून राहीले होते.
आयुक्त म्हणून आल्यावर महापौरांच्या कार्यालयात मी जाणार नाही असा पवित्रा घेत त्यांनी आपल्या हेकेखोर स्वभावाचा आल्या आल्या नवी मुंबईकरांना परिचय करून दिला होता.नगरसेवकांपासून ते आमदारांपर्यत सर्वाचाच अपमान करण्यात धन्यता मानली होती. पालिका अधिकार्यांचा अपमान करण्यातही त्यांनी हात आखडता घेतला नाही. नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामांचे मंजूर झालेले ठरावही त्यांनी रद्द केले. कामांचा दर्जा तपासण्याच्या नावाखाली ठेकेदारांनाही त्यांनी त्रास दिला.
वॉक विथ कमिशनरच्या नावाखाली नवी मुंबईकरांना भेटण्याचे अभियान सुरू केले. तथापि या अभियानात गेलेल्या १० टक्के लोकांच्याही समस्या सुटल्या नाहीत. या अभियानातही भेटावयास आलेल्या लोकांशी मुंढे उर्मटपणे वागत असल्याने अभियानात येणार्या लोकांची वर्दळही कमी होवू लागली. मुख्यमंत्र्यांच्या धोरणाविरोधातच वागण्याचे धोरण मुंढे यांच्या अंगलट आल्याने त्यांची तडकाफडकी बदली झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मुंढे पर्वाचा अस्त झाल्याने नवी मुंबईत कोणी हळहळ व्यक्त करत आहे तर कोणी आनंद साजरा करत आहे. पालिका सभागृहात त्यांच्याविरोधात बोलणार्या नगरसेवकांशीही मुंढे सूडबुध्दीने वागल्याची अनेक उदाहरणे आहेत.