पनवेल :- बाबुराव खेडेकर
शहरातील जुना ठाणा नाका रोडवरील शासकीय वसाहतीची अवस्था भीतीदायक झाली असून शासकीय कर्मचाऱ्यांची ५२ कुटुंबे रामभरोसे राहत आहेत. याबाबत येथील रहिवाश्यांनी अवस्था ”तोंड दाबून बुक्यांचा मार ” अशीच होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे या वसाहतीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. परिसरातील अस्वच्छता,धोकादायक इमारती आणि पाण्याच्या टाक्या,संरक्षण भिंतीचा थांगपत्ता नाही,ड्रेनेजची व्यवस्था नीट नाही ,पाणी व्यवस्थापनातही गोंधळ,भटक्या प्राण्यांचा वावर,सोसायटीचे वीज बिल थकल्यामुळे महावितरणकडून त्रास अशा एक ना अनेक समस्यांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
शासकीय नोकर झाल्यावर राहायला घर मिळते. मात्र ते घर कधी कोसळेल याची शाश्वती नसेल तर ? बहुसंख्य रायगड जिल्हा परिषदेचा कर्मचारी वर्ग राहत असलेल्या पनवेल येथील शासकीय वसाहतीबाबत असाच प्रकार घडला आहे.येथे द्वितीय श्रेणी अधिकाऱ्यांच्या २,चतुर्थ श्रेणी अधिकाऱयांच्या ६ आणि तृतीय श्रेणी अधिकाऱ्यांच्या ३४ व इतर अशा एकूण ५२ खोल्या ६ इमारतींमध्ये आहेत.येथील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. शासकीय अधिकारी असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेविरोधात ते ब्र काढीत नसले तरी महिलांना याठिकाणी फारच त्रास सहन करावा लागत आहे. येथील तरुणांमध्येही येथील दुरावस्थेबाबत चीड आहे. कांही विचारायला किंवा तक्रार करायला गेल्यास ”राहायचे तर राहा नाहीतर निघून जा” असे उत्तर मिळत असल्याचे येथील रहिवाशांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. येथील इमारतींना गेली पाच वर्षे रंग काढलेला नाही.पाण्याची टाकी कधी कोसळेल सांगता येत नाही. पार्किंगची व्यवस्था केलेली जागा वापरण्याच्याच परिस्थितीत नाही. इमारतींच्या भिंतींना तडे गेलेलं आहेत. विशेष म्हणजे येथील नागरिकांनी स्वखर्चाने पंपहाऊस दुरुस्तीचे तसेच ड्रेनेज चॉकअपचे काम केले आहे. वीज बिल न भरल्यामुळे वीज महामंडळाने गेल्या महिन्यात पंपहाऊसची वीज खंडित केल्याचेही समजते. येथील इमारतींच्या जिन्यावर विजेची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे सीसीटीव्ही सारख्या सुविधा तर दूरची गोष्ट आहे.
या परिसरामध्ये धूर फवारणी होत नाही. ड्रेनेजचे पाणी पंपहाऊसमध्ये जाण्याची भीती कायम आहे. डुकरे,साप,भटकी कुत्री यांचा मोकळा वावर यापरिसरात आहे.कंपाउंड नसल्यामुळे पोलिसांनी जप्त केलेल्या गाड्याही या परिसरात उभ्या असतात. या वसाहतीला पालिकेने पाण्याच्या ७ लाईन दिलेल्या आहेत. त्यामुळे दिवसाआड दिवसातून एकवेळ अर्धा तास येथे पाणी येते.नळजोडण्या वाढवून घेण्याचीही नागरिकांची मागणी प्रलंबित आहे.येथील पाण्याच्या टाक्या साफ होत नाहीत त्यामुळेही नागरिक त्रस्त आहेत.पाणी सोडणारे कर्मचारी त्यांच्या सोयीनुसार काम करत असल्याचाही नागरिकांचा आक्षेप आहे. येथे राहणारे बरेच शासकीय कर्मचारी या दुरवस्थेला कंटाळून आपल्या नातेवाईकांना येथे राहायला देऊन अन्यत्र राहायला गेले आहेत.
या सोसायटीमध्ये जेंव्हा सार्वजनिक उत्सव साजरा केला जातो तेंव्हा नागरिक स्वतः परिसराची स्वच्छता करतात. मात्र अन्य वेळी येथील अस्वच्छतेकडे कोणीच लक्ष देत नाहीत.या शासकीय सोसायटीच्या नागरिकांनी पेन येथील विभागीय कार्यालयात सुद्धा वारंवार पाठपुरावा केला. मात्र त्याचा कांही उपयोग झालेला नाही. ”शासनाचे काम आणि सहा महिने थांब” असाच हा सर्व प्रकार समोर येत आहे.आपल्या परिवारासह नव्या शहरात राहणारे शासकीय कर्मचारी यांना होणारा त्रास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याना दिसू नये यासारखे दुर्दैव नसावे अशीच भावना पनवेलमधील नागरिक यानिमित्ताने व्यक्त करीत आहेत.