मुख्यमंत्र्यांना मनसेने पाठवली ३ किलो पारदर्शकता
सुजित शिंदे / नवी मुंबई
राज्य सरकारने २४ मार्च २०१७ रोजी नवी मुंबईचे कार्यक्षम व प्रामाणिक आयुक्त तुकाराम मुंढेंची, कार्यकाळ पूर्ण होण्या आधीच, तडका फडकी बदली केली. याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध केला असून, मुख्यमंत्र्यांना ३ किलोच्या पारदर्शक बरणीत गाजरे टाकून पाठवल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. मुख्यमंत्र्यांनी फक्त राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांपुरता पारदर्शकतेचा फार्स केला होता व आता निवडणुका संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा पारदर्शकतेचा बुरखा गळून पडला असून नवी मुंबईतील भ्रष्ट राजकारणी व अधिकाऱ्यांच्या दबावाला मुख्यमंत्री बळी पडल्याचा आरोप मनसेने प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला कार्यकाळ पूर्ण करण्याधीच मुख्यमंत्र्यांनी राजकीय बळी देऊन सर्व सामान्य नवी मुंबईकरांचा रोष ओढवून भावना दुखावल्या आहेत असे मनसेने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईत त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा पाढा मनसेने मुख्यमंत्र्यांच्या पत्रात वाचला आहे. नवी मुंबईत पाण्याची होत असलेली चोरी थांबवणे. मनपा प्रशासनाला शिस्त लावणे, विविध २३ दाखले मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे, कित्येक नगरसेवकांची अनधिकृत बांधकामे पाडणे, भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन करणे, वॉक विथ कमिशनरच्या माध्यमातून सर्वसामान्य नवी मुंबईकरांशी संवाद साधणे, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून पदपथ मोकळे करणे, महसुली उत्पन्न वाढविणे, वादग्रस्त टेंडर्स रद्द करून मनपाचे ४०० कोटी रुपये वाचविणे अशा एक ना अनेक कामांमुळे आयुक्त तुकाराम मुंढे सर्व सामान्य नवी मुंबईकरांच्या पसंतीस उतरले होते.
जर आयुक्त तुकाराम मुंढेंची बदली रद्द झाली नाही तर मुख्यमंत्री देखील पारदर्शकतेचा नुसता ढोल निवडणुकीपुरता बडवत असतात असा आरोप मनसेने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. याप्रसंगी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, शहर सचिव रवींद्र वालावलकर, महिला सेनेच्या डॉ.आरती धुमाळ, अनिथा नायडू, विद्यार्थी सेनेचे संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेनेचे श्रीकांत माने, भालचंद्र माने, वैभव बारवे, रोजगार विभागाचे आप्पासाहेब कोठुळे, स्वप्नील गाडगे, विभाग अध्यक्ष आशिष कुटे, सचिन कदम, अभिजित देसाई, अमोल ऐवळे, विक्रांत मालुसरे, उपविभाग अध्यक्ष शिवम कवडे, राजेश ढवळे, शाखा अध्यक्ष सिद्धार्थ ढोकळे, विराट शृंगारे, अजय सुपेकर, तुषार कदम, नितीन नाईक, सतीश पडघन, मनीष वाघ, गणेश भोसले, वैभव अभंग, सागर नाईकरे, अमोल भडांगे, वैभव कांबळे व मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.