नवी मुंबई :- स्थापत्याची कामे करणाऱ्या ठेकेदाराची देयके पालिकेने वेळेवर न भरल्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनाचे उद्घाटन लांबणीवर पडले आहे. या वास्तूचे उद्घाटन १४ एप्रिलला होणार होते, मात्र अद्याप अंतर्गत सजावट झाली नसल्यामुळे तसेच घुमटाचे कामही शिल्लक असल्यामुळे उद्घाटनाला विलंब होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे आता या वास्तूचे उद्घाटन डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी म्हणजेच ६ डिसेंबर करण्यात येणार असल्याचे समजते.
नवी मुंबई पालिकेच्या वतीने मुलुंड ऐरोली खाडी पुलाच्या उत्तर बाजूस ऐरोली सेक्टर १६ येथे पाच हजार ७५० चौरस मीटर क्षेत्रफळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मृती भवन उभारण्यात आले आहे. त्यासाठी जवळपास ५२ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. गेली चार वर्षे या भवनाचे काम सुरू असून माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १४ एप्रिल रोजी या स्मृतिभवनाचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेतला होता. तसे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते, मात्र केलेल्या कामाची देयके पालिकेच्या लेखा विभागाकडून ही वास्तू उभारणाऱ्या ठेकेदाराला वेळीच न मिळाल्याने त्याचे स्थापत्य काम काम कासवगतीने सुरू होते.
आता नवीन आयुक्त रामास्वामी एन. स्मृतिभवनाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ठेकेदाराची ही देयके भरली जातील. सध्या स्थापत्याचे काम अंतिम टप्यात असून प्रार्थना स्थळाला खिडक्यांची तावदाने लावण्याचे काम या आठवडय़ात पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर या भव्य वास्तूची अंतर्गत सजावट केली जाईल.
मुंढे यांनी घुमटाला संगमरवर बसविण्यास विरोध केला होता. त्यावरून मुंढे व महापौर सुधाकर सोनावणे यांच्यात मतभेद झाले होते. ज्ञानसंपन्न्ोतेचे प्रतीक म्हणून पेनाच्या निब प्रमाणे निमुळता घुमट उभारण्यात आला आहे. त्यावर संगमवरी लाद्या बसणार नाहीत. शिवाय जवळच्या खाडीमुळे व प्रदूषणामुळे संगमरवर काळा पडेल, असा अहवाल आयआयटीने दिला होता. त्याचा हवाला देऊन मुंढे यांनी १९ कोटींच्या संगमवरी ऐवजी घुमटाला पांढरा रंग देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात होती.
मुंढे यांच्या बदलीमुळे संगमरवर की रंग हा मुद्दा पुन्हा एकदा पुढे येण्याची चिन्हे आहेत. हा मुद्दा सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे. सर्वसाधारण सभा हा प्रस्ताव नवीन आयुक्तांच्या संमतीसाठी पाठवेल. त्यानंतरच्या कामांसाठी पुढील आठ महिने लागणार आहेत, त्यामुळे लोकार्पणासाठी ६ डिसेंबरही तारीख निश्चित करण्यात आल्याचे समजते.
***
स्मृतिभवनाची वैशिष्टय़े
५७५० चौ. मी. क्षेत्रफळ-
४९ मीटर घुमटाची उंची
* सोयी-सुविधा – कला दालन, ग्रंथालय, म्युझियम, प्रार्थना स्थळ, कॅफेटेरिया, चारही बाजूंनी विद्युत रोषणाई असणारे तलाव, कांरजे आणि ५०० आसनक्षमतेचे प्रेक्षागृह.