लोकसभा निवडणूक न लढविणार्या मनसेचा पर्यायाने राज ठाकरेंच्या पाठीशी असणारा जनाधार झाकली मूठ या न्यायाने कोणाला समजला नाही. तथापि विधानसभा निवडणूकीत मनसेला दारूण पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची भाषा करणार्या मनसे महाराष्ट्रीयन माणसांनीच नाकारले. त्यानंतर जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व महानगरपालिका निवडणूकांतही मनसेच्या दारूण पराभवाची मालिका कायम राहीली. मनसेला नाशिकची सत्ता गमवावी लागली. राजाला साथ द्या असे प्रचार गीत बनविणार्या मनसेला नाशिककरांनी व मुंबईकरांनी सातच नगरसेवक निवडून देत त्यांच्या प्रचारगीताला खर्या अर्थांने साथच दिली. त्यानंतर पक्षाच्या झालेल्या निवडणूकीत राज ठाकरे व त्यांच्या पदाधिकार्यांमध्ये कलगीतुराही झडल्याचे वृत्त सर्वत्र पसरले. मनसेसुप्रिमो राज ठाकरेंच्या नावाचा आजही जनसामान्यांमध्ये करिश्मा कायम आहे. त्यांच्या सभांना गर्दी जमते. पण या गर्दीचे जनाधारामध्ये रूपांतर होत नाही. मनसेची पडझड सुरू आहे. ही अवस्था पक्षाची कशामुळे झाली, आपले नेमके काय चुकले याचे राज ठाकरेंनी प्रामाणिकपणे आत्मपरिक्षण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फारसे उत्साहाने बोलले जात नाही. उगवत्या सुर्याला नमस्कार करण्याची प्रथा सर्वच क्षेत्रात असते, तोच निकष राजकीय क्षेत्रालाही लागू होत आहे. सध्या राजकीय शिखरावर भाजपाचा बोलबाला असून भाजपाला पावलापावलावर विरोध करणार्या शिवसेनेकडेही चर्चेचा केंद्रबिंदू राहीला आहे. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून, शेतकर्यांचा कैवार घेण्याच्या माध्यमातून विरोधातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आपले अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे कोठेही पहावयास मिळत नसल्याची निराशा मनसैनिकांमध्ये पहावयास मिळत आहे. या प्रकाराला जबाबदार कोण आहे. महाराष्ट्राच्या राजकारणापुरता सिमित असलेला मनसे या राज ठाकरे या एकखांबी तंबूवर आधारित आहे. मनसेच्या यशामुळे राज ठाकरेंच्या नेतृत्वाचा बोलबाला होत असेल तर मनसेच्या अपयशाचेही खापर राज ठाकरेंवरच फोडायला हवे. शून्यातून निर्माण झालेला पक्ष पुन्हा शून्याकडेच वाटचाल करू लागल्याने पक्षसुप्रिमो या नात्याने राज ठाकरेंनी आता स्वत:चे आत्मपरिक्षण करणे काळाची गरज आहे. शिवसेनेत मतभेद निर्माण झाल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीतच राज ठाकरे यांनी दशकभरापूर्वी शिवसेना संघटनेला कायमचाच ‘जय महाराष्ट्र’ केला. राज ठाकरेंनी आपली वेगळी राजकीय चुल मांडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. राज ठाकरेंनी मनसे स्थापन केल्यावर राजकारणातील रथी-महारथींनी त्यावेळी त्यांच्यावर उपहासात्मक स्वरूपाची टीकाही केली. पक्ष काढणे सोपे असते, परंतु पक्ष चालविणे अवघड असते असा न मागता सल्लाही राजकारणातील अनेक वरिष्ठांकडून त्यावेळी राज ठाकरेंना देण्यात आला. राज ठाकरेंनी स्वत:ची पक्ष संघटना नव्याने काढली असली तरी राजकारणात ते नवखे नव्हते. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक उन्हाळे-पावसाळे राजकीय व्यासपिठावर काढले होतेच. शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेना या विद्यार्थी संघटनेचा त्यांना अनुभव होता. महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्याची हाक देत राज ठाकरेंनी मनसेची निर्मिती करताना महाराष्ट्रीयन जनतेच्या भावनेला साद घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महाराष्ट्रातील तरूणाई मोठ्या प्रमाणावर राज ठाकरेंच्या नेतृत्वाकडे आकर्षित झाली. मनसे स्थापनेनंतर 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत मनसेचा महाराष्ट्रात एकही उमेदवार निवडून आला नसला तरी मनसेच्या उमेदवारांनी लाख-दीड लाखापेक्षा अधिक मतदान घेतल्याने मनसेची महाराष्ट्राच्या राजकारणात तत्कालीन परिस्थितीत दखल घेण्यात येवू लागली. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणूकीत मनसेचे महाराष्ट्राच्या विधानसभेत 13 आमदार निवडून गेले. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेला सत्ता मिळाली नसली तरी आपला प्रभाव निर्माण करण्याइतपत मनसेने आपले नगरसेवक सभागृहात पाठविले. नाशिक महापालिकेची सत्ता मनसेने मिळविली. काही जिल्हा परिषदा व पंचायत समितीमध्येही मनसेचे सदस्य निवडून आले. मनसेची ही वाटचाल पाहता मनसे महाराष्ट्राच्या राजकारणात लगेच सत्ताधार्यांच्या भूमिकेमध्ये शक्य नसली तरी प्रभावी विरोधकांच्या भूमिकेत दिसणार असल्याचा आशावाद राजकीय क्षेत्रातून व्यक्त केला जावू लागला. पण नियतीच्या मनात मनसेच्या बाबतीत काही वेगळेच होते. भरतीच्या पाठोपाठ ओहोटी ही ठरलेलीच असते. हा निकष मनसेच्या बाबतीत राजकीय क्षेत्रात तंतोतंत लागू पडला. मनसेच्या ज्या गतीने राजकारणात शिखरे सुरूवातीच्या काळात पादाक्रांत करू लागली, त्याच वेगाने किंबहूना त्याहीपेक्षा अधिक वेगाने मनसेला अधोगती सुरू झाली. मागच्या विधानसभा सभागृहात 13 आमदार असणार्या मनसेचे आज जुन्नरच्या शरद सोनवणेंमुळे किमान अस्तित्व तरी टिकून आहे. लोकसभा निवडणूक मनसेने न लढविल्यामुळे जनाधाराच्या बाबतीत मनसेची अवस्था ‘झाकली मूठ’ दिसून आली नाही. महापालिका निवडणूका व अन्य स्थानिक स्वराज्य निवडणूकांमध्ये मनसेची अधोगती कायम राहीली. नाशिकची सत्ता गमवावी लागली, इतकेच नाही तर नाशिक महापालिकेत मनसेला दुहेरी संख्याबळाचा आकडाही गाठता आला नाही. अवघ्या पाच वर्षात मनसेच्या जनाधार असलेल्या तिजोरीची दुरावस्था का व्हावी याचे राज ठाकरेंनी आजच्या काळात आत्मपरिक्षण करणे आवश्यक आहे. मनसे स्थापनेनंतर मनसेमध्ये ज्या वेगाने अन्य पक्षातील नेतेमंडळी व कार्यकर्ते समाविष्ठ झाले, त्याच वेगाने ते पुन्हा अन्य पक्षात निघून गेले. त्यामुळे सुरूवातीच्या काळात मनसेची दिसून येणारी ताकद ही ताकद नव्हती, तर ती आलेली एक सुज होती हे काळाच्या ओघात स्पष्ट झाले. भाकर का करपली याचे मनसेतील निर्माते शिरीष पारकरही पुढे मनसे संघटनेत डावलले गेले. पदाधिकार्यांमध्ये गटबाजी निर्माण झाली. पक्ष छोटाच राहीला, पण पक्षातील नेतेमंडळी मात्र मोठी होत गेली. अनेक भागामध्ये पक्षसंघटना वाढविण्याऐवजी प्रेस नोट काढून पक्षसंघटनेचे अस्तित्व टिकविण्याऐवजही पदाधिकार्यांना फारशी चमकदार कामगिरी करून दाखविता आलेली नाही. निवडणूका न लढविण्याचा निर्णय राज ठाकरेंचा पक्षसंघटनेसाठी आत्मघातकी निर्णय ठरला. कार्यकर्ते पक्षसंघटनेसाठी जीवाचे रान करतात, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडणूका लढवून आपले अस्तित्व निर्माण करायचे असते, पण पक्षानेच स्थानिक निवडणूका लढविण्याचा निर्णय न घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होते आणि कार्यकर्ते नवीन राजकीय घरोबा शोधण्याचा प्रयत्न करतात. मनसेच्या बाबतीत नवी मुंबई हे जिवंत उदाहरण आहे. मनसेची एकेकाळी नवी मुंबईत ताकद होती. युवकांचा भरणा मोठ्या प्रमाणावर होता. राज ठाकरेंनी महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला व कार्यकर्ते पक्षाला सोडून गेले. कार्यकर्ते व पदाधिकारी पक्षाला सतत सोडून जाणे कोणत्याही पक्षासाठी हितावह बाब नसते. विधानसभा निवडणूकीत नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर या दोनही मतदारसंघामध्ये मनसेला साधा पाच हजाराचाही आकडा ओंलाडता आलेला नाही. राज ठाकरेंच्या भाषणाचे महाराष्ट्रातील जनतेला कमालीचे आकर्षण आहे. लाखोलाखोच्या सभा गाजविण्याचे, सभा खिळवून ठेवण्याची, सभेतील गर्दी जे पाहिजे ते भाषणातून देण्याची राज ठाकरेंची क्षमता आहे. परंतु सभेला आलेला जनधार मतपेटीपर्यत घेवून जाण्यास राज ठाकरेंच्या नेतृत्वाला मर्यादा पडल्या आणि या मर्यादेची फार मोठी किंमत मनसेच्या प्रगतीला मोजावी लागली आहे. मनसे आज अधोगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मनसेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे. अनेक ठिकाणी सभा घेण्याचे आश्वासन देवूनही राज ठाकरेंनी सभा न घेतल्यामुळे त्या त्या भागातील मनसैनिकांमध्ये राज ठाकरेंप्रती नाराजी आहे. शून्यातून निर्माण झालेली मनसे पुन्हा शून्याच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे. मनसेला पुन्हा उभारी देण्याचे अग्निदिव्य राज ठाकरेंना उचलावे लागणार आहे. पण ही वेळ का आली, याला कोण जबाबदार याचे आत्मपरिक्षण स्वत: राज ठाकरेंनी करणे त्यांना स्वत:साठी व मनसेसाठीही उपयुक्त ठरणार आहे.