सुजित शिंदे
मुंबई : कृषी मालाच्या विक्रीरूपातील अर्थकारणातील व्यापार्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारने शेतकर्यांना थेट कृषी माल विक्री करण्यास परवानगी दिली. शेतकर्यांनी आपला कृषी माल शहरात आणून विकावा यासाठी राज्य सरकारने वाजत गाजत आठवडी बाजार संकल्पनेचा उदोउदो केला. परंतु राज्यात केवळ ९५ ठिकाणीच आठवडी बाजार सुरू असल्याने सरकारने घोषणा करून आपल्यावर वार्यावर सोडले असल्याचा संताप आता शेतकर्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शेतकर्यांनी आठवडी बाजारात माल न विकता शहरात व उपनगरात मिळेल त्या ठिकाणी जागा पकडून आपला कृषी माल सकाळी ६ ते ११ या वेळेत विकण्यास सुरूवात केली आहे.
शेतकर्यांना कृषी माल पिकवून कर्जबाजारी होण्याची वेळ आली असताना दुसरीकडे व्यापारी वर्ग मात्र दिवसेंगणिक श्रीमंत होत चालला होता. हे पाहून कृषीमालाच्या अर्थकारणातील व्यापार्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी थेट शेतकर्यांनी एपीएमसीत माल विक्रीला न आणता स्वत: शहरात व उपनगरामध्ये कृषी माल विक्री करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. ही अंमलबजावणी करण्यापूर्वीच शेतकर्यांच्या कृषीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रशासकीय पातळीवर ‘आठवडी बाजार’ ही संकल्पना राबविण्यास सुरूवात केली आहे.
२९ जुलै २०१४ रोजी कोथरूड येथे राज्य सरकारने सर्वप्रथम आठवडी बाजार सुरू केला. या तीन वर्षात फक्त ९५ ठिकाणीच आतापर्यत राज्य सरकारने आठवडी बाजार सुरू केले आहेत. महाराष्ट्र सरकारने हे आठवडी बाजार मोजक्याच ठिकाणी सुरू केले असून इतर ठिकाणी सुरू करण्याबाबत आजतागायत उदासिनताच दाखविली आहे. या ९५ आठवडी बाजारांमध्ये केवळ एकट्या पुणे, पिंपरी भागातच ४४ ठिकाणी आठवडी बाजार राज्य सरकारकडून सुरू करण्यात आले आहेत. उर्वरित ५१ ठिकांणापैकी २७ ठिकाणी मुंबईत, ७ ठिकाणी नवी मुंबईत, ७ ठिकाणी ठाण्यात, ३ ठिकाणी औरंगाबादेत, ३ ठिकाणी सोलापुरात, ३ ठिकाणी नागपुरात, १ ठिकाणी कोल्हापुरात आठवडी बाजार सुरू करण्यात आले आहेत.
राज्यातील ग्रामीण भागातील कृषी मालाचा आवाका पाहता जेमतेम ९५ ठिकाणी सुरू असलेले आठवडे बाजार म्हणजे शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकर्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आठवडी बाजार हा काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी सांयकाळच्या वेळी भरविण्यात येत आहे.
आठवडी बाजारातील स्थळ पाहता शेतकर्यांनी या आठवडी बाजारावर अवलंबून न राहता मुंबई शहर, उपनगरे, नवी मुंबई, पनवे, ठाने, कल्याण-डोंबिवली भागात पहाटे ५ वाजेपर्यत भाजीचे टेम्पो आणायचे. मॉर्निग वॉकची स्थळे, रेल्वे स्टेशनजवळ, उद्याने आदी ठिकाणी भाजीचे टेम्पो उभे करून दोन-तीन तासात भाजी विकून लगेच गावी रवाना होण्याचे मार्ग अंगिकारला आहे. आठवडी बाजार संकल्पनेचा शेतकर्यांना फारसा फायदा होत नसल्याने राज्य सरकारच्या उपक्रमाला मर्यादा पडल्याचे पहावयास मिळत आहे.