सध्या फ्री होल्डचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या काही मंडळींनी आकाश पाताळ एक केले आहे. परंतु भाजपातील श्रेय लाटण्यासाठी धावपळ करणारी काही मंडळी फ्री होल्डसाठी ऐरोलीतील युवा आमदार आणि नवी मुंबईचे ओबामा म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखल्या जाणार्या संदीप नाईकांचाच पाठपुरावा अधिक आहे आणि संदीप नाईकांच्याच पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे, हे जाणून आहेत.
विद्यार्थी चळवळ, नगरसेवक, स्थायी समिती सभापती, आमदार, पुन्हा मोदी लाट असतानाही ही लाट चिरडून मिळविेलेली आमदारकी ही केवळ आपल्या जनसंपर्कामुळे आणि करत असलेल्या लोकांच्या कामामुळेच शक्य झाले असल्याचे विनम्रपणे ऐरोलीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ३८ वर्षीय युवा आमदार संदीप गणेश नाईक सांगतात. सकाळी उठल्यावर दोन तास व्यायाम आणि त्यानंतर रात्री ११ वाजेपर्यत मतदारसंघात पायपीट व जनसंपर्क यामुळे नवी मुंबईच्या इतिहासात सर्वाधिक पायपीट करणारा राजकारणी अशी संदीप नाईकांची प्रतिमा आहे. राजकारणी आपल्या फिटनेससाठी व्यायामशाळेत जातात, पण सदोदित आपल्या फिटनेस जोपासण्याकरता फिटनेस ट्रेनरलाच आपला खासगी सचिव संदीप नाईकांनी बनविले आहे. मतदारसंघातील बारसे, वाढदिवस, विवाह व अन्य कौंटूबिक कार्यक्रमात सहभागी होणे, आमदार निधीच्या माध्यमातून मतदारसंघात विकासकामे करणे, समस्यांची पाहणी वाहनांतून नाही तर पायपीट करून करणे, रोजगार मेळावे भरवून बेरोजगारांना रोजगार देणे अशा विविध रूपात ऐरोली मतदारसंघातील लोकांना आमदार संदीप नाईक पहावयास मिळतात. ठाणे-बेलापुर मार्गाची पाहणी दिघा ते कोपरखैरणे पायपीट करून केली होती. सभापती आपल्या प्रभागात, आमदार आपल्या परिसरात अशा विविध अभियानातून पायपीट करत जनसंपर्क करणार्या आमदार संंदीप नाईक आपल्या विधानसभा मतदारसंघातील नाका, कानाकोपरा, गल्लीबोळ, डोंगराळ भाग, खाण परिसर, झोपडपट्टी, माथाडी व सिडको वसाहत संदीप नाईकांना तोंडपाठ आहे. लोकसभा, विधानसभा व पालिका निवडणूकीत ते कार्यकर्त्यांना यामुळेच व्यवस्थित मार्गदर्शन करतात. शारिरीक संपदा जोपासत परिसराचा कायापालट व विविध कार्यक्रमातून जनसंपर्क आणि पायपीट करत समस्यांची पाहणी करणारे आमदार संदीप नाईक हे मतदारसंघातील जनतेला कोठेही. केव्हाही उपलब्ध होत असतात.
संदीप नाईक, वय वर्ष ३८, प्रत्येक क्षेत्रात यशस्वी वाटचाल. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेते गणेश नाईक यांचे धाकटे पुत्र, माजी खासदार संजीव नाईकांचे बंधू इतपत त्यांचा राजकीय परिचय करून देणे म्हणजे त्यांच्या संघर्षमय वाटचालीवर अन्याय करण्यासारखे होईल. क्रिकेटपटू, विद्यार्थी नेता, यशस्वी उद्योजक ते आमदार अशी संघर्षमय वाटचाल करत संदीप नाईकांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.
संदीप नाईकांची अभ्यासू वृत्ती, चिकीत्सक प्रवृत्ती, तळागाळातील घटकांशी समरस होवून काम करण्याची चिकाटी, वाचनाची सवय, उ क्तीपेक्षा कृतीवर नेहमी भर देण्याची सवय यामुळेच संदीप नाईकांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. संदीप नाईक यांनी प्रारंभापासून शालेय वयापासून ते महाविद्यालयीन पर्वापर्यत आपल्या बुध्दीमत्तेचा ठसा उमटवलेला आहे. एमबीपर्यत शिक्षण घेतलेल्या संदीप नाईकांचा क्रिकेट या क्षेत्राकडे कल अधिक होता. त्यांच्या फलदांजीने त्यांनी स्पर्धाही गाजविल्या होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना घरातील उद्योग धंद्याकडे लक्ष देणे भाग पडले. गणेश नाईक हे १९८० पासून नवी मुंबईच्या राजकीय व सामाजिक जडणघडणीमध्ये सहभागी होते. संदीप नाईकांचे मोठे बंधू संजीव नाईक हे महापालिका स्थापनेपासून नवी मुंबईच्या राजकारणाचा एक अविभाज्य घटक बनले होते. त्यामुळे नाईक परिवाराच्या उद्योग व्यवसायाकडे लक्ष देण्यास घरातील कोणाकडेही वेळ नव्हता. संदीप नाईक हे महाविद्यालयीन पर्वापासून आणि शिक्षण संपल्यावरही एका राजकीय पक्षसंघटनेच्या विद्यार्थी संघटनेत सक्रिय कार्य करत होते.नवी मुंबई परिसरात त्या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या समस्या सोडवित होते.घरातील उद्योग, व्यवसायात लक्ष घातल्यावर उद्योग, व्यवसाय तोट्यात का गेले आहेत, याची पाहणी करून त्यांनी अवघ्या तीन ते चार वर्षात त्यांनी घरातील तोट्यात गेलेले व्यवसाय नफ्यात चालून दाखविले.
२००५ साली नवी मुंबई महापालिकेच्या तिसर्या सार्वत्रिक निवडणूकीत पक्षाची गरज व घरचा राजकीय वारसा पुढे चालविण्यासाठी संदीप नाईकांना पालिका निवडणूक लढवावी लागली. तत्पूर्वी मोेठे बंधू संजीव नाईक हे नवी मुंबई महानगरपालिकेेचे प्रथम महापौर होते. तसेच दुसर्या सभागृहात सलग पाच वर्षे संजीव नाईकांनी महापौरपद भूषविले होते. त्यामुळे पालिका राजकारणातून संजीव नाईकांची ‘एक्झिट’ झाल्यावर संदीप नाईकांची पालिका सभागृहात ‘एंट्री’ झाली. पालिकेच्या तिसर्या सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्पष्ट बहूमत होते. त्या सभागृहात दोन्ही वेळा महापौरपद महिलांसाठी आरक्षित असल्याने त्यांना महापौर पदी विराजमान होण्याची संधी मिळाली नाही. संदीप नाईकांना पक्षाने थेट स्थायी समिती सभापतीपद देवू केले असताना त्यांनी ते नाकारले. ज्या समितीचा मला अभ्यास नाही, त्याचा थेट मी सभापती बनू शकत नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. सुरूवातीला दोन वर्षे स्थायी समितीेचे सदस्य बनून त्यांनी समिती क ामकाजाचा जवळून अनुभव घेतला. त्यानंतर त्यांनी सलग तीन वर्षे स्थायी समिती सभापती पद सांभाळत आपल्या कामकाजाचा ठसा उमटवला.
सर्वप्रथम त्यांनी सिडको सदनिकाधारकांना दिलासा देताना कंडोनिअमअर्ंतगत विकासकामे महापालिकेने मोफत करावीत अशी भूमिका घेत तसा ठराव मंजूर करवून घेतला. या ठरावाला मंत्रालयीन पातळीवरही मंजुरी मिळावी यासाठी पाठपुरावा केला. या ठरावाला मंत्रालयीन पातळीवर मंजुरी मिळाल्यावर सिडको वसाहतीमध्ये मल:निस्सारण व जलवाहिन्या मोफत बदली करण्यात आल्या. सिडको वसाहतीमध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. त्यानंतर त्यांनी जनतेशी सुंवाद साधण्याकरता ‘सभापती आपल्या प्रभागात’हे अभियान राबवित नवी मुंबईच्या कानकोपर्यात पायपीट केली. पावसाळीपूर्व कामाचा आढावा त्यांनी प्रत्येक प्रभागात जावून घेतला. २००७ साली मुसळधार पावसामध्ये वाशी सेक्टर १७ मधील नाला तुंबला असताना संदीप नाईकांनी स्वत: पावसामध्ये नाल्यातील गळ्याएवढ्या पाण्यात उतरून नाल्यातील कचरा हटविला होता. अशी विविध कामे पालिका प्रशासनाच्या माध्यमातून करत संदीप नाईक नवी मुंबईकरांमध्ये आपला आगळावेगळा ठसा उमटवण्यात यशस्वी झाले होते. त्याचवेळी बेलापुर विधानसभा मतदारसंघाचे पाच मतदारसंघामध्ये विभाजन झाले. नवी मुंबई कार्यक्षेत्रात ऐरोली व बेलापुर असे दोन स्वतंत्र मतदारसंघ निर्माण झाले. ऑक्टोबर २००९मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये बेलापुर मतदारसंघातून गणेश नाईक आणि ऐरोली मतदारसंघातून संदीप नाईक विजयी झाले.
आमदार झाल्यावर मतदारसंघातील कानाकोपर्यात सातत्याने जनसंपर्क ठेवण्याचा आपला वसा संदीप नाईकांना कायम जोपासला. ऐरोली मतदारसंघात सातत्याने पायपीट केली. जनतेशी सुसंवाद वाढविला. समस्या निवारणासाठी नगरसेवकांना व महापालिकेला आमदार निधी उपलब्ध करून दिला. विधानसभा अधिवेशनात आपल्या मतदारसंघातील समस्यासोबत राज्यातील अन्य महत्वाच्या समस्यांनाही वाचा फोडली. २००९ ते २०१४ यादरम्यान झालेल्या विधानसभेच्या सर्व अधिवेशनामध्ये संदीप नाईकांची १०० टक्के हजेरी होती. त्यांनी या कालावधीत सातत्याने बेरोजगार मेळाव्यांचे आयोजन करून नवी मुंबईतील बेरोजगारांना मोठ्या संख्येने रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. ग्रीन होप या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी नवी मुंबईत लाखोच्या संख्येने वृक्षारोपण केले.
२०१४ साली राजकीय परिस्थितीत परिवर्तन झाले. देशव्यापी निर्माण झालेल्या वावटळीने राजकीय समीकरणात उलथापालथ झाली. खासदार संजीव नाईकांना एप्रिल २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत २ लाख ८४ हजार मतांच्या फरकाने पराभूत व्हावे लागले. अवघ्या सहा महिन्याने झालेल्या विधानसभा निवडणूकीत गणेश नाईकांनाही १२०० मतांनी पराभूत व्हावे लागले. संदीप नाईकांचे काय होणार याची चिंता सर्वाना लागून राहीली होती. ऐरोलीचे मतदार कृतज्ञ आहेत, माझ्या विकासकामांना ते नक्कीच पोचपावती देतील असा विश्वास संदीप नाईक प्रचारादरम्यान वारंवार बोलून दाखवित होते. मतदारांनीही संदीप नाईकांचा विश्वास सार्थ ठरविला. मोदी लाट असतानाही साडे आठ हजाराच्या मताधिक्याने संदीप नाईक विजयी झाले.
आजही त्यांची ऐरोली मतदारसंघात पायपीट कायम आहे. घरटी जनसंपर्कावर व बेरोजगारी हटविण्यावर भर दिला जात आहे. संदीप नाईक राजकारणात आल्यामुळे क्रिडाक्षेत्राला एक क्रिकेटपटू आणि उद्योग विश्वाला एक उद्योजक गमवावा लागला. विद्यार्थी चळवळीच्या मुशीत घडल्यामुळेच संदीप नाईकांचे आजही पाय जमिनीवरच असतात. कार्यकर्त्यांच्या घरी जेवणे, कोणताही बडेजाव न करणे, सर्वसामान्यांशी कौंटूबिक वागणे यामुळे संदीप नाईकांनी मतदारसंघात एक आगळेवेगळे स्थान निर्माण केेले आहे. हा माणूस लाजर्या स्वभावाचा असल्याने संदीप नाईक बोलत नाही, तर त्यांची कामे बोलतात, असे ऐरोली मतदारसंघात पहावयास मिळते.
शब्दांकन :- साईनाथ भोईर