साईनाथ भोईर
नवी मुंबई : सिडको अधिकारक्षेत्रात पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांना तातडीने मदत मिळून संभाव्य वित्त व मनुष्यहानी टळावी यासाठी आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून हा नियंत्रण कक्ष 1 जून 2017 ते 30 सप्टेंबर 2017 या कालावधीत कार्यान्वित राहणार आहे.
सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनच्या तळमजल्यावर उघडण्यात आलेला हा नियंत्रण कक्ष वरील नमूद कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांसहित शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही 24 तास कार्यरत राहील. या कक्षामार्फत आपत्कालीन स्थितीत अभियांत्रिकी विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग, उद्यान विभाग आदी महत्वाच्या विभागाचे कर्मचारी 24 तास संपर्कात असतील.
1) वृक्षांची पडझड/वाहतुकीस अडथळा ठरणार्या वृक्षांची छाटणी, 2) रस्त्यावरील उघड्या गटारांची झाकणे सुरक्षित करणे, 3) पुर/पुरसदृश्य स्थिती, 4) रस्त्यांची दुरावस्था, 5) रोड व नाल्याजवळील साचलेला कचरा, 6) व्यक्तिंचे पाणीसाठेच्या ठिकाणी बुडणे, 7) आग व आगीचे विविध प्रकार, 8) साथीचे रोग 9) विषारी प्राणी चावण्यासंबंधी बाबी, 10) इमारत कोसळणे, 11) भूस्खलन होणे, 12) शॉर्ट सर्कीट, 13) तातडीचे वैद्यकीय उपचार, मदत व म्ब्युलन्स आदि तक्रारींची आपत्कालीन कक्षाद्वारे खालील तक्रारींची दखल घेण्यात येणार आहे .
नागरिक फोनवरून अथवा वॉट्सपवरून माहिती किंवा तक्रार नोंदवू शकतात. त्यासाठी खालील दूरध्वनी व वॉट्सप क्रमांकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
1. एमटीएनएल क्र. 022-27562999
2. फॅक्स क्र. 022-67918199
3. वॉट्सप क्र. 8879450450
4. नागरीकांसाठी क्लाऊड क्र. 022-39216299
नागरिकांमार्फत फोनवरून अथवा वॉट्सपवरून माहिती किंवा तक्रार प्राप्त झाल्यावर नियंत्रण कक्षातील अधिकारी तातडीने निर्णय घेऊन ज्या नोडमध्ये सदर घटना घडली असेल तेथील प्रमुख अधिकार्यास घटनेसंबंधी माहिती कळवतील व त्यासंबंधी योग्य ते मार्गदर्शन करतील. तसेच नियंत्रण कक्ष आवश्यक असलेल्या अग्निशमन केंद्र, हॉस्पिटल, वाहतुक पोलीस, स्थानिक पोलीस अशा संबंधित विभागाशी तातडीने संपर्क साधून घटनास्थळी आवश्यक ती मदत ताबडतोब पोहोचवण्याची दक्षता घेईल. वरील नमूद कालावधीमध्ये सिडको कार्यक्षेत्रात विभागनिहाय असलेल्या हॉस्पिटलमध्ये आवश्यक संख्येनुसार बेड आरक्षित ठेवले जाणार आहेत.
नागरी संरक्षण दल तसेच सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक यांचेही सहकार्य याकामी घेण्यात येणार आहे. नोडल अधिकारी, सर्व संबंधित सिडकोचे विभाग, तसेच इतर शासकीय विभाग यांच्याशी समन्वय साधण्याची महत्वाची भूमिका हा नियंत्रण कक्ष पार पाडेल. त्या घटनेसंबंधी घेतलेल्या कारवाईची माहिती व सद्यस्थिती नोडल अधिकारी नियंत्रण कक्षास पुरविल. सदर माहिती नियंत्रण कक्षाकडून संपर्क साधलेल्या नागरिकांना दिली जाईल.
दगडखाणी आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जागांवर धोक्याच्या सूचना देणारे फलक लावण्यात येतील. अपघातप्रवण जागांवर सिडकोचे सुरक्षा रक्षक तैनात ठेवले जाणार आहेत. तसेच धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे. अतिवृष्टीच्या वेळी पाणी साठल्यास पाण्याचा उपसा करणारी यंत्रसामुग्री 24 तास उपलब्ध करण्यात येणार आहे.