अनंतकुमार गवई
मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेची अधिकांश सूत्रे प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकार्यांच्या हातात आहे. या अधिकार्यांकडे सौजन्यशीलतेचा अभाव असल्यामुळे त्यांच्या अरेरावीमुळे त्यांच्याकडे कामे घेवून येणारे नगरसेवक व नवी मुंबईतील रहीवाशीही त्रस्त झाले आहेत.
महापालिका प्रशासनात दोन अतिरिक्त आयुक्त, शिक्षण विभाग, वित्त विभाग, नवीन परवाने व नोंदणी विभाग यासह अन्य महत्वाच्या ठिकाणांचा कारभार प्रतिनियुक्तीवरील अधिकार्यांच्या माध्यमातून चालविला जात आहे. महापालिका प्रशासनात कामे घेवून येणार्या नगरसेवकांना व रहीवाशांना पूर्वीपासून काम करणार्या अधिकार्यांकडून स्नेहाची व मानाचीॅ एकीकडे वागणूक मिळत असतानाच दुसरीकडे प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकार्यांकडून अनेकदा हेटाळणीची व अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे खुद्द नगरसेवकांकडूनच खासगीत सांगण्यात येत आहे. कार्यालयीन वेळ संपल्यावर आठ वाजेपर्यत अनेकदा प्रतिनियुक्तीवरील अधिकारी काम करत असल्याचे महापालिका मुख्यालयात पहावयास मिळते. या कामामागील अर्थकारण काही वेगळेच असल्याचे महापालिका प्रशासनातील अन्य कर्मचारी व अधिकार्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
नवी मुंबई महानगरपालिका सधन महापालिकांमध्ये गणली जात आहे. त्यामुळे अनेकदा प्रशासकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर येण्यासाठी नवी मुंबई महापालिका मागून घेतात आणि वेळ पडल्यास त्याकरिता मंत्रालयीन पातळीवरील संबंधितांना लक्ष्मीदर्शनही घडवून आणतात. ते गमविलेले लक्ष्मीदर्शन पुन्हा कमविण्याचा एककलमी कार्यक्रम या प्रतिनियुक्तीवरील अधिकार्यांकडून राबविण्यात येतो. संबंधित अधिकारी आपल्या हाताखालील अधिकारी व कर्मचार्यांना एक ‘टार्गेट’ आखून देतात व सांयकाळी ७ नंतर त्या ‘टार्गेट’चा हिशोब महापालिका मुख्यालयात घेण्याचे काम सुरू असते. काही वेळा काही प्रशासकीय अधिकार्यांना ‘शिक्षा’ म्हणून नवी मुंबईत प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येते. अशा वेळी संबंधित अधिकारी आपला राग आपल्या हाताखालील अधिकारी व कर्मचार्यांवर काढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रतिनियुक्तीवरील अधिकार्यांच्या तुलनेत महापालिकेत पूर्वीपासून काम करणारे अधिकारी हे कामे घेवून येणार्या नगरसेवकांशी सौजन्याने वागून कामे लवकर करण्याला प्राधान्य देतात. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी हे आपणास स्वच्छ समजत असून त्यांनी पूर्वीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याच मानसिकतेचेच अनुकरण चालविले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मुंढें यांच्या कार्यप्रणालीमुळे व अरेरावीमुळे काही वरिष्ठ पालिका अधिकार्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती. त्याचधर्तीवर नवी मुंबईतील काही अधिकारी व कर्मचारीदेखील प्रतिनियुक्तीवरील अधिकार्यांच्या मनमानीमुळे नोकरी सोडण्याच्या मार्गावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रतिनियुक्तीवर आलेल्या तीन अधिकार्यांच्या अन्यत्र बदलीकरता महापालिकेतील काही नगरसेवकांनी व पक्षीय पदाधिकार्यांनी मंत्रालयीन पातळीवर दबाव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या तीन अधिकार्यांमध्ये एक महिला अधिकार्याचाही समावेश आहे.