अनंतकुमार गवई
नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात सर्वच विभागांमध्ये महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विरोधी धडक मोहिमा राबविल्या जात असून अनधिकृत बांधकामांप्रमाणेच फेरीवाले व मार्जिनल स्पेसचा वापर करणा-यांवर विविध विभागांत धडक कारवाई करण्यात आली.
आज अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगीरे यांच्या नियंत्रणाखाली, सिडकोसह संयुक्त मोहिमेत सहा. आयुक्त श्रीम. प्रियांका काळसेकर आणि विभागातील अधिकारी – कर्मचारी यांनी बेलापूर विभागात बालतुबाई नगर येथील मोठ्या प्रमाणावारील झोपड्या निष्कासित केल्या.
घणसोली विभागात सहा. आयुक्त श्री. दत्तात्रय नागरे यांनी सेक्टर 4 व 22 येथील 150 हून अधिक झोपड्या व 2 टपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई केली. वाशी विभागामार्फत विभाग अधिकारी महेन्द्रसिंग ठोके यांनी पदपथांवरील फेरीवाले तसेच मार्जिनल स्पेसच्या वापरावर कारवाई केली , तुर्भे विभागात सहा. आयुक्त श्रीम. अंगाई साळुंखे यांनी तुर्भे येथील एपीएमसी कांदा बटाटा मार्केटजवळील पदपथावर ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर धडक कारवाई करून त्यांचे सामान जप्त केले तसेच मलप्रक्रिया केंद्राजवळील 50 हून अधिक अनधिकृत झोपड्या हटवण्यात आल्या.
कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त अशोक मढवी यांनी सिडकोसह संयुक्त मोहिमेत कोपरखैरणे रेल्वेलगतच्या सिडकोच्या मालकीच्या जागेवरील झोपडपट्टीवरमोठी करवाई करत 250 हून जास्त झोपड्या तोडण्यात आल्या. यामध्ये पक्क्या खोल्या व कच्च्या खोल्यांचा समावेश होता. या मोहिमेमध्ये महानगरपालिकेने रूग्णवाहिका, अग्निशमन वाहन तसेच 2 पोकलेन, 2 जेसीबी अशी यंत्रसामुग्री वापरली. 50 पोलीसांच्या सहकार्याने 30 मजूरांमार्फत सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे मुख्य नियंत्रक श्री. एस.एस.पाटील तसेच श्री. जिने व श्री. राजपूत, श्री.कुसाळकर या अधिका-यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम पार पाडली.