अनंतकुमार गवई
मुंबई : मे महिना हा प्रशासन दरबारी विशेषत: मंत्रालयात बदल्यांचा सिझन म्हणून ओळखला जातो. आता जून एक आठवडा उलटला तरी बुधवारी कॅबिनेटच्या दिवशी मंत्र्यांच्या दालनात ग्रामीण व शहरी भागातील अनेक पाहूणे बदल्यांचा अर्ज घेवून आल्याचे पहावयास मिळाले. मे महिन्यात मंत्रालयात बदल्यांसाठी आलेल्या लोकांचाच मोठ्या प्रमाणावर राबता असतो. मंत्रालयातील अधिकांश बदल्या या सचिव पातळीवरच होत असतात. जुन महिना उजाडल्यावर मंत्रालयातील प्रशासकीय अधिकारी बदल्यांबाबत विसावा घेत असतात. परंतु बुधवारी कॅबिनेटचे निमित्त साधून ग्रामीण व शहरी भागातील घटक बदल्यांसाठी मंत्र्यांच्या दालनात आलेले पहावयास मिळाले. विशेष म्हणजे बदल्यांसाठी येणारे घटक आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आमदार व जिल्हा परिषद सदस्यही घेवून आले होते. काही दालनात साखर कारखान्यांशी संबंधित मंडळी आपल्या माणसांच्या बदल्यांसाठी आली होती. ़बदल्यांसाठी आलेली मंडळी मंत्र्यांची भेट घेवून सविचांची भेट घेतात, पुन्हा मंत्र्यांची भेट घेवून मंत्र्यांचा सचिवांना बोलावून त्यांना ते काम सांगण्याची गळ घालतात. बदलीसाठी आलेल्या पाहूण्यांमुळे कॅबिनेटच्या दिवशी अन्य कामे होत नसल्याचे मंत्रालयीन सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.