अनंतकुमार गवई
मुंबई : आपल्या समस्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बळीराजाने संपाचे हत्यार उपसले आहे. परंतु बळीराजाचे नशिब येथेही त्याच्यावर रूसलेले पहावयास मिळत आहे.राज्यातील बळीराजा संपावर गेलेला असताना परराज्यातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर भाज्यांचा पुरवठा सुुरू केल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवकमध्ये विक्रमी वाढ होवू लागली आहे.
बुधवारी बाजार समितीमध्ये तब्बल १५९३ वाहनांतून भाजी, फळे व अन्य जीवनावश्यक वस्तूंची आवक झाली. कांदाही आता बाजार आवारात मुबलक प्रमाणात उपलब्ध होवू लागला आहे. भाज्यांची आवक वाढल्याने भाज्यांचे दरही गडगडले. फळ मार्केटमध्ये दुपारी १२ वाजेपर्यत ४५८ वाहनातून फळांची आवक झाली. भाजी मार्केटमध्ये ६५७ वाहनांतून भाज्यांची आवक झाली. यामध्ये परराज्यातील भाज्यांचा समावेश असला तरी आता दोन दिवसापासून महाराष्ट्राच्या ठराविक भागातून भाज्या विक्रीसाठी येवू लागल्या आहेत. कांदा बटाटा मार्केटमध्ये १५६ वाहनांतून कांदा आणि ५७ वाहनातून बटाटा विक्रीसाठी आला आहे. मसाला मार्केटमध्ये ९४ वाहनांची तर धान्य मार्केटमध्ये १६८ वाहनातून आवक झाली आहे.
बळीराजाच्या संपामुळे भाज्या, फळांचा व कांदा बटाटासह अन्य वस्तूंचा शहरी भागामध्ये तुटवडा निर्माण होवून राज्य सरकार लवकरात लवकर तोडगा काढेल अशी आशा शेतकरी घटकांकडून संपाच्या सुरूवातीच्या काळात व्यक्त करण्यात येत होती. परंतु परराज्यातील शेतकर्यांनी विक्रीसाठी माल पाठविला आणि महाराष्ट्राच्या काही भागातील शेतकर्यांनी पोलिस बंदोबस्तात भाज्या विक्रीसाठी आल्याने शहरवसासियांना आता गरजेपेक्षा अधिक भाज्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे बळीराजाच्या संपाचे मुंबई, मुंबईची उपनगरे, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली भागात फारसे पडसाद उमटले नाहीत. बळीराजाच्या संपामुळे शहरी भागात निर्माण झालेली ‘दुधबाणी’चे चित्र बुधवारीही कायम राहीले. ८० लाख लीटर दुधाची गरज असणार्या मुंबईकरांना आज जेमतेम २१ लाख लीटर दूध उपलब्ध झाले आहे. दूधबाणीचे चित्र आणखी काही दिवस लांबल्यास बळीराजाच्या संपाची शहरवासियांना दखल घ्यावी लागणार आहे…