* प्रतिनियुक्तीवर शिंदेंनी तब्बल पावणे चार वर्षे ठोकला मुक्काम
* मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढालीचा संशय
*बदली करण्यासाठी कामगार संघटना झाल्या सक्रिय
नवी मुंबईः महापालिकेत लेखा परीक्षक पदावर पावणेचार वर्षापूर्वी प्रतिनियुक्तीवर आलेल्या सुहास शिंदे यांची बदली होऊन पंधरा दिवस उलटले तरी ते महापालिकेतच ठाण मांडून बसले आहेत.
दरम्यान, आपली बदली रद्द व्हावी यासाठी महापालिकेतील अन्य प्रतिनियुक्तीवरील अधिकारी आणि काही राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि नगरसेवक यांना हाताशी धरुन सुहास शिंदे बदली रद्द करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा सुरु आहे. शिंदे यांची बदली रद्द करण्याकरिता मोठ्या प्रमाणात अर्थकारण असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
नवी मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवर असलेले अंकुश चव्हाण, सुहास शिंदे यांना तीन वर्षाहून अधिक काळ उलटून गेला आहे. तर उमेश वाघ, धनराज गरड, तुषार पवार आणि तृप्ती सांडभोर या प्रतिनियुक्तीवरील अन्य अधिकार्यांची दोन वर्षे उलटून गेली आहेत.
तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गत दहा महिन्याच्या कार्यकाळात महापालिकेत प्रतिनियुक्तीवरील अधिकार्यांची होलसेलमध्ये आयात केली आहे. जवळपास 10 ते 12 प्रतिनियुक्तीवरील अधिकारी नवी मुंबई महापालिकेच्या मुख्य पदांवर आजही कार्यरत आहेत. महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे येण्यापूर्वी सुरुवातीला सदर प्रतिनियुक्तीवरील अधिकारी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या तालावर नाचत होते. मात्र, नंतर ते मुंढेच्या इशार्यावर काम करीत होते. त्यावेळेस सदर अधिकारी लोकप्रतिनिधींना काडीचीही किंमत देत नव्हते. मात्र, मुंढे यांच्या बदलीनंतर प्रतिनियुक्तीवरील अधिकार्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही सदस्यांना हाताशी धरुन नवी मुंबई महापालिकेतच बस्तान मांडण्याचे ठरविले आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात या अधिकार्यांनी आर्थिक रसद राजकारण्यांना पोहोचवली असल्याचे बोलले जाते.
नवी मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवर येणार्या अधिकार्यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी असतो. त्याला देखील महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता लागते. असे असताना सुहास शिंदे, अंकुश चव्हाण, धनराज गरड, उमेश वाघ, तुषार पवार, तृप्ती सांडभोर आदि अधिकारी महापालिकेच्या सेवेत तीन वर्षापेक्षा जास्त काळ बसून आहेत. तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर प्रतिनियुक्तीवरील अधिकारी पुन्हा सत्ताधार्यांचे गोडवे गावू लागल्याचे चित्र महापालिकेत दिसू लागले आहे. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या तालावर नाचणार्या महापालिकेतील प्रतिनियुक्तीवरील अधिकार्यांची तत्काळ उचलबांगडी करावी यासाठी बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे घातल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले होते. त्यानुसार राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेली पावणेचार वर्षे नवी मुंबई महापालिकेत
चिकटून राहिलेल्या सुहास शिंदे यांची पंधरा दिवसापूर्वी बदली केली आहे.
मात्र, स्वतःची बदली रद्द करण्यासाठी सुहास शिंदे आता महापालिकेतील पदाधिकारी, विविध पक्षांचे नेते यांना हाताशी धरुन आर्थिक देवाण-घेवाणीच्या माध्यमातून महापालिकेतच तळ ठोकण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. विशेष म्हणजे सुहास शिंदे यांची बदली रोखण्यासाठी महापालिकेतील अन्य प्रतिनियुक्तीवरील अधिकारी देखील आपले सरकार दरबारी वजन वापरत असल्याचे बोलले जात आहे.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे मात्र प्रतिनियुक्तीवरील अधिकार्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या बदली वरुन लोकप्रतिनिधींमध्ये गट पडले असून सुहास शिंदे यांच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या महापालिका कर्मचार्यांनी देखील आता सुहास शिंदे चले जावचा नारा दिला आहे. कायद्यावर बोट ठेवून चालणारे अधिकारी अशी ओळख असलेले नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या भूमिकेकडे आता कर्मचार्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सुहास शिंदे यांनी लेखा परीक्षण विभागात कार्यरत असताना गत पावणेचार वर्षात लेखा विभाग आणि प्रशासन विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळताना नियमबाह्यरित्या आणि मनमानीपणे कामकाज केल्याने शासनाने त्यांना तातडीने त्यांच्या मूळ विभागात माघारी पाठवावे, अशी मागणी नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनने केली आहे.